Wednesday, 2 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

·      डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर कामं पूर्ण करण्याची सूचना

·      काँग्रेसच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप

·      दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे सीबीआय आदेश

आणि

·      मुंबईत सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक

****

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं फक्त संकलन न करता तिचा लोकहितासाठी उपयोग व्हावा, तसंच या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने कार्यरत राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्री उपक्रमांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.

****

केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपीची रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमधे साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचनाही सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत केली.

****

‘बीड-पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच ‘बीड-पुणे’ आणि ‘बीड-मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

‘बीड-पुणे’ आणि नियोजित ‘बीड-मुंबई’ ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी ठरणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

****

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्तीसाठी नाशिकमधील घेण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाला. गेल्या २४ ऑगस्ट पासून हे शिबिर सुरु होते. गांधी यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद तसंच समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला संगठन विस्तार आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएसच्या औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी वैयक्तिक आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं” भीमनवार यांनी पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक भरती प्रक्रियेत लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य आहे, त्यामुळे अशा संवेदनशील विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी विनंतीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

****

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने देशभरात १४ ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दरम्यान, परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजीप्रकरणी ईडीने विविध राज्यांमध्ये १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात पाच ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये चार तर राजस्थानमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

****

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजे भोसले यांच्या पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र, तपासादरम्यान, सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता.

****

आगामी गणेशोत्सवात मुंबईत सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी २८१ कृत्रिम तलावांव्यतिरिक्त ४४ समुद्र किनारे आणि जेट्टी तसंच २४ नैसर्गिक तलावांची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे एकूण ३४८ विसर्जन स्थळं असतील. नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती क्यूआर कोड आणि गूगल मॅपच्या आधारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****

राज्यातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या इस्त्रायलला रवाना होणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ‘महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर’ या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या या कामगारांशी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील एक हजार ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटनस्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसेच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणं आवश्यक असल्याचं, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी म्हटलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे तसंच समन्वयाने काम करण्याचं आवाहन गौडा यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक तसंच वारसास्थळांच्या परिसरात पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असेही गौडा यांनी नमूद केलं.

****

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख नरवडे यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं.

****

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या चि यु जेनला त्यांने २१-१६,२१-१५ असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लाय कडून पराभव पत्करावा लागला. ध्रूव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो जोडीने मिश्र दुहेरीत २१-८, २१-९ असा विजय मिळवत तर तन्वी शर्मानेही महिला एकेरीत २१-१६, २१-१७ असा विजय मिळवत, पुढची फेरी गाठली. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही २१-११, २१-१६ असा विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...