Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 5 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. विधिमंडळाच्या संयुक्त
सभागृहासमोर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल.
त्यावर आठ आणि नऊ मार्चला सभागृहात चर्चा होईल. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प
१८ मार्चला सादर होणार आहे. सात एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री
गिरीश बापट यांनी सांगितलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांपैकी प्राथमिक परिक्षा १८ जूनला होणार आहे. आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. भारतीय प्रशासन, परराष्ट्र आणि पोलिस सेवांसाठी या परीक्षा लोकसेवा
आयोगामार्फत घेतल्या जातात. या माध्यमातून यावर्षी ९८० अधिकारी नियुक्त करण्याचं सरकारनं
ठरवलं आहे. परीक्षेसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्याला जवळचं परिक्षा केंद्र मिळेल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. १७ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
दरम्यान, नागरी
सेवेत महिलांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग महिलांना प्रोत्साहन
देत आहे. समाजात स्त्री-पुरुष समानतेसाठी सरकार
प्रयत्न करत असून, लोकसेवा आयोगही महिलांना या परिक्षा देण्यास प्रोत्साहित करणार असल्याचं
आयोगानं म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच
शहरांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचा
समावेश आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं या योजनेत आतापर्यंत ६० शहरांना मंजुरी
दिली आहे. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर नागपूरसह इंदूर, सूरत,
बडोदे आणि
उदयपूर या शहरात जलद गतीनं काम सुरु असल्याचं निदर्शनास आलं आहे. या शहरांचं गुंतवणुकीचं
प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत गेलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे
शेअर बाजारातील भागभांडवल १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्यासंबंधी धोरण निश्चित
करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय लवकरच केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक बोलावणार
आहे. कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी नवी दिल्ली इथं बोलताना ही माहिती
दिली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या मोठ्या परताव्यामुळे कामगार संघटना
आणि मालकवर्गाकडून हा भाग वाढवण्याची मागणी होत होती, असं ते म्हणाले.
****
आधार
कार्डसाठी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं
म्हटलं आहे. आधारवरील बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर होत असल्याचा आरोप फेटाळून लावत
प्राधिकरणानं ही माहिती सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं. मागील पाच वर्षात आधारच्या
माध्यमातून ४०० कोटी व्यवहार झाले असून, यातून गैरव्यवहाराची एकही घटना घडली नसल्याचं
प्राधिकरणानं म्हटलं आहे. आधारद्वारे प्राप्त झालेली माहिती गोपनीय ठेवली असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गेल्या वर्षी
सात वर्षातील उच्चांकी पाऊस झाल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये ४४ टक्के
इतका जलसाठा शिल्लक आहे. यात गंगापूर धरणात ५९ टक्के, पालखेड ३०, दारणा ५९, नांदूर
मधमेश्वर ९८, ओझरखेड ६०, मुकणे १६, चनाकापूर ६३, हरणाबारी ३९,
गिरणा ४३, तर पुनद प्रकल्पात ९२ टक्के इतका
पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या सिंचनासाठी पाणी राखीव ठेवण्यात आलं असलं, तरी भविष्यात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तनाची मागणी
वाढण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यात मात्र टँकरने पुरवठा सुरु झाला आहे.
****
नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी
भारतीय जनता पक्षाच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत
जिचकार यांनी काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांचा ८२ मतांनी पराभव केला. जिचकार यांना
१०८, तर निकोसे यांना २६ मतं मिळाली. तर बहुजन समाज पक्षाच्या वंदना चांदेकर यांना
१० मतं मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपचेच दिपराज पर्डीकर विजयी झाले.
****
तरुण वकिलांनी निरंतर अभ्यास केला पाहिजे, असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वि.नलवडे यांनी केलं.
हिंगोली इथं जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामाचं भूमिपूजन आज नलवडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विधी अभ्यासक्रमात
महापुरुषांच्या चरित्राचा समावेश व्हायला पाहिजे,
असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया
दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या
सहा बाद २३७ धावा झाल्या. भारताकडून रविंद्र जडेजानं तीन, तर इशांत शर्मा, उमेश यादव
आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
No comments:
Post a Comment