Friday, 3 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित

·      वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवण्यास केंद्र सरकारची मंजुरी

·      सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना स्वतःचं हक्काचं घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि

·      मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री

*****

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू  या अन्य राज्यांसह एकूण ५६ हजार ८२५ चौरस किलोमीटरच्या क्षेत्राचा यात समावेश आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशिल क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे या क्षेत्रामध्ये खनिजासाठी खोदकाम करता येणार नाही, नवीन औष्णिक विद्युत प्रकल्प उभारता येणार नाही तसंच कोणतही बांधकामदेखील करता येणार नाही. केंद्र सरकारनं यापूर्वी सप्टेबर २०१५ मध्ये यासंदर्भात एक अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेत दुरूस्ती करत नव्यान ही अधिसूचना जारी केली आहे.

****

        केंद्र सरकारनं देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयं आणि रूग्णालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवण्यास काल मंजुरी दिली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून या जागा उपलब्ध होणार आहेत. ही विक्रमी जागा वाढ असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितलं. जागा वाढविण्याच्या उद्देशानं सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातल्या रोग निदान - क्लिनिकल विषयांमधलं शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं नड्डा म्हणाले.  केवळ या एका निर्णयामुळं ७२ वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार १३७ जागा वाढल्या असल्याचं ते म्हणाले.

****

सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना स्वतःचं हक्काचं घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं तसंच पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या नियोजित निवासस्थानांचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पोलिसांना स्वस्तात मालकी हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलिस आयुक्तांनी योजना हाती घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले …

      पोलिस क्वॉर्टर सोडल्यानंतर त्याला स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे, याची योजना आता आपण तयार करायला सुरूवात केली आहे. आणि मी सगळ्या आयुक्तांना सांगितलंय, की विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये आयुक्तायल जिथे असतील, त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांना आपल्याला मालकीची घरं कशी देता येतील, याच्या योजना तयार केल्या पाहिजेत. जमिनीच्या किंमती कशा कमी होतील, जास्त एफएसआय देऊन तुमच्या घराच्या किंमती कशा कमी करता येतील, त्यासोबत पोलिसांना कर्ज वगैरे जे आहे, ते त्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, आणि या माध्यमातून मी अमितेश कुमारजींना अशी विनंती करतो की,  औरंगाबादमध्ये देखील आपण ही योजना हातामध्ये घ्या, जे पोलिस आपले इतकी वर्ष सेवा करतात, ते सेवानिवृत्त झाल्यानंतर दुर्लक्षित राहू नये, अशा प्रकारचा आपला हा एक प्रयत्न आहे.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना पोलिस दलात सामावून घेण्याच्या निर्णय अद्याप झाला नसल्याच्या बाबीकडे मुख्यमत्र्यांचं लक्ष वेधलं. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुस्ती आणि कबड्डी या देशी क्रीडा प्रकारातल्या पात्र खेळाडूंना नोकरीत सामावून घेण्यासंदर्भात एक धोरण निश्चित केलं असल्याचं सांगितलं, ते म्हणाले …

महाराष्ट्र केसरी तीन वेळा झाले आणि त्यांना आपण पोलिस दलामध्ये नोकरी देण्याचा निर्णय केला होता. पण आता त्यांना थेट आपल्याला क्लास वन मध्ये घ्यायचंय. त्यामुळे पोलिस नियमातही आपल्याला बदल करावे लागतील. त्यामुळे त्याला विलंब झाला तो टेक्नीकल विलंब आहे. तो दूर करून लवकरच तेदेखील आपण त्याठिकाणी देणार आहोत. आणि त्यासोबतच पोलिस दलामध्ये अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त असलेल्या लोकांना विविध स्तरावर विशेषतः देशी खेळ असतील, आपले कुस्तीसारखे कबड्डी सारखे तर अधिक प्राधान्य आपल्याला कसं देता येईल, यासंदर्भातली एक पॉलिसी आपण तयार केलीय. आणि त्या पॉलिसीच्या अनुषंगाने निश्चित तोही विषय तात्काळ आम्ही निकाली काढू.  

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

       मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणीचं काम केलं जाईल असं, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या काल औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आगामी वर्षात तीस हजार कोटी रूपये खर्च करून नव्याने रस्ते उभारण्यात येणार आहेत, असं ते यावेळी म्हणाले. मराठवाड्यातलं दळणवळण गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी दोन हजार चारशे किलोमीटर रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून यासाठी येत्या दोन वर्षात ७ हजार दोनशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात येअसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचं अनुदान ऑनलाईन पद्धतीनं लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. औरंगाबाद विभागातल्या सामाजिक न्याय विभाग आणि विविध मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मागासवर्ग विकास महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थ्यांकडील वसुली मोहीम गतीमान करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. औरंगाबाद विभागातल्या जातपडताळणी समित्यांचा आढावाही बडोले यांनी यावेळी घेतला.

****

प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रीयांना स्वावलंबी बनविण्याचा शासनाचा निर्धार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं सिध्दा महोत्सवाचं उद्घाटन काल त्याच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. आगामी तीन वर्षात १० लाख बचत गटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं सांगून शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केलं.

****

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचं स्वयं सहाय्यता बचत गटांना काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि महिला आणि बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यात पैठण तालुक्यातल्या विहामांडवा इथल्या श्री. स्वामी समर्थ महिला बचत गटाला विभागस्तरारचा प्रथम पुरस्कार, लातूर तालुक्यातल्या रामेगाव इथल्या अहिल्यादेवी होळकर महिला बचतगटाला व्दितीय पुरस्कार, तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नंदगावच्या गृहलक्ष्मी महिला बचतगटास तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती तसंच कृषी पंपाच्या जोडण्या देण्याची कामं त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. परभणी जिल्हास्तरीय विद्युत वितरण समिती आढावा बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. शासनामार्फत उर्जा क्षेत्रात विविध योजना आणि प्रकल्पांअंतर्गत भरीव निधी उपलब्ध करून दिला जात असून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असं पाटील यावेळी म्हणाले. जिल्हा वार्षिक योजना आणि जलयुक्त शिवार अभियानातर्गंत झालेल्या कामांचाही काल  त्यांनी आढावा घेतला.

****

सतत गैरहजर राहिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुध्द अंबाजोगाई न्यायालयानं काल अटक आदेश जारी केलं आहेत. २००८ साली परप्रांतीयांविरुध्द केलेल्या भाषणामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शहरात बस गाड्यांवर दगडफेक केली होती. यामुळे बसगाड्यांचं नुकसानही झालं होतं. याच संदर्भातील न्यायालयीन खटल्यासंदर्भात हे आदेश जारी करण्यात आलं आहेत.

****

लातूर शहरातले बेकायदेशीर फलक ७२ तासाच्या आत काढून टाकण्याचे आणि यासंदर्भातला अहवाल सादर करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं नियुक्त केलेले कोर्ट कमिशनर ॲड. जगन्नाथ चिताडे यांनी पालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सध्या लातूर शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा फलक, लावण्यात आले असून याचे पुरावे उपलब्ध असल्याचं या नोटिसीमध्ये म्हटलं आहे.

****

            औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शहरात उघड्यावर प्रातर्विधीला जाणाऱ्या ३३ जणांना पकडण्यात आलं. या सर्वांना प्रत्येकी ४०० रूपये दंड न्यायालयानं ठोठावला.

****

परभणी आकाशवाणी केंद्रात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ उद्घोषिका जयश्री लांबडे या नुकत्याच प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. त्यांनी काही काळ औरंगाबाद आकाशवाणी केंद्रातही काम केलं होतं.

//*****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...