Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना
सहकार्य करण्यास सरकार सदैव तत्पर असल्याचं, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं
आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांत भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात सुषमा स्वराज
यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर प्रथमच
सदनात उपस्थित झालेल्या स्वराज यांचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्वच
पक्षाच्या सदस्यांनी स्वागत करत उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षा किंवा
भेदभाव होत असल्याची भावना असेल, तर त्यांना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण निर्माण
करून देण्यात सरकारनं लक्ष द्यावं, असं मत राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांनी
नोंदवलं आहे. आज राज्यसभेत विविध पक्षाच्या सदस्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दलित
विद्यार्थी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला, त्यासंदर्भात उपसभापती बोलत होते. सरकारच्या
वतीनं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणी संपूर्ण चौकशी करून योग्य
ती कारवाई करण्याचं तसंच विद्यापीठात शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचं
आश्वासन दिलं.
त्यापूर्वी राज्यसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेस पक्षाच्या
सदस्यांनी गोवा तसंच मणीपूरमध्ये भाजपच्या सत्तास्थापनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
विरोधी बाकांवरचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी करत असल्यानं,
उपसभापतींनी सदनाचं कामकाज प्रथम दहा मिनिटांसाठी स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू
झाल्यावर सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावरही विरोधी
पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी गोवा आणि मणीपूरमध्ये भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचं
सांगत, या मुद्यावर चर्चेची मागणी केली, सभापतींनी मागणी मान्य न केल्यानं, काँग्रेस
सदस्यांनी पुन्हा हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सभापतीनीं कामकाज पुन्हा
पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
****
राज्य विधीमंडळात आजही शेतकरी कर्जमाफीचा
मुद्दा गाजला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभा तसंच विधान
परिषदेचं कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यात मसाई पठारावर पद्मावती या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी उभारलेल्या सेटचा काही भाग काल रात्री पेटवून देण्यात
आला. जवळपास तीस जणांच्या समूहाने हा सेट पेटवून देत, या ठिकाणच्या काही वाहनांची तोडफोड
केली. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात या चित्रपटाचं
चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेत, राजस्थानातही विरोध झाला
होता, भन्साळी यांना कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर भन्साळी
यांनी या चित्रपटाचं चित्रिकरण राजस्थानऐवजी कोल्हापूर परिसरात सुरू केलं आहे.
****
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मध्यप्रदेशात
खरगोन इथून शेख नावाच्या एका तरुणास इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशयावरून
ताब्यात घेतलं आहे. उच्चशिक्षित असलेला शेख, इसिसच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून
सध्या अटकेत असलेल्या एका आरोपीच्या पूर्वीपासून संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात आलं आहे.
****
अमृतसर विमानतळावर आज एक संशयित बॅग आढळून आल्यानंतर सावधानतेचा
उपाय म्हणून विमानतळ बंद करण्यात आलं. बाँबशोधक पथकानं बॅग आणि परिसराची तपासणी सुरू
केली आहे.
****
भारत आणि पाकिस्तान दरम्यान, काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातून चालणारा
नियंत्रणे रेषेपलिकडचा व्यापार थांबवण्यात आला आहे. पाकिस्ताननं वारंवार केलेल्या शस्त्रसंधी
उल्लंघनानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा व्यापार येत्या शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे.
****
केंद्र सरकार पुरस्कृत कृषी उन्नती योजनेअंतर्गत असलेलं कृषी
यांत्रिकीकरण उपअभियान राज्यात राबवण्यासाठी शेहेचाळीस लाख रूपयांचा निधी मंजूर झाला
आहे. या निधीतून राज्यातल्या अनुसूचित जातींच्या तसंच नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीच्या
यांत्रिक औजारांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
****
कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आणि करूणाभाभी
चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद इथं आज राज्यसभेच्या माजी सदस्य वृंदा करात
यांचं विशेष व्याख्यान होणार आहे. शहरातल्या मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात आज
सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या व्याख्यानात “भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने” या विषयावर
वृंदा करात आपले विचार मांडणार आहेत.
//*******//
No comments:
Post a Comment