Friday, 17 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 17 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर राष्ट्रपतींचं स्वागत केलं. मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसंच इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राजभवनावर राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेतली.

****

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज आज वारंवार स्थगित करावं लागलं. सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेनेच्या सदस्यांनीही अध्यक्षांसमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे कामकाज दुपारपर्यंत तीन वेळा स्थगित करण्यात आलं.

या गदारोळातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६-१७ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज विधानसभेसमोर सादर केला. आर्थिक वृद्धीदर ९ पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला असून, कृषी क्षेत्रात साडे बारा टक्के वाढ अपेक्षित आहे. तृणधान्यं, कडधान्यं, गळीत धान्य तसचं कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असून, ऊस उत्पादनात मात्र २८ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकलेखा समितीचा अहवालही आज सदनासमोर मांडण्यात आला.

सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळासादर होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीविषयी भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेल्या विधानाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली.

शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा कोणत्या कलमान्वये मांडायचा यावर सरकारनं वेळ न घालवता, उद्या अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कर्ज माफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. 

****

राज्यातल्या सार्वजनिक पाणीपुरवठा आणि उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. अशा वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन दिलं. या कारवाईमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होऊ नये त्यासाठी या ग्राहकांसाठी वीज बिलाची थकबाकी हप्त्याने भरण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरु करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. मूळ थकीत देयकापैकी २० टक्के रक्कम आणि चालू महिन्याचं पूर्ण देयक भरल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत करण्यात येणार आहे.

****

भाजपचे त्रिवेंद्रसिंह रावत उद्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज डेहराडून इथं झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत त्रिवेंद्र सिंह रावत यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. डेहराडून इथं उद्या दुपारी तीन वाजता नव्या सरकारचा शपथग्रहण सोळा होणार आहे.

****

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी परवा रविवारी होणार आहे. राज्यपाल राम नाईक यांनी ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून, विधिमंडळ नेत्याची निवड उद्या होणार आहे.

****

येत्या दोन ते तीन वर्षात राज्यामध्ये संपूर्ण परिवर्तन झाल्याचं दिसून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये ते आज बोलत होते. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यावेळी उपस्थित होते. राज्याचा स्वतंत्र ब्रँड महाराष्ट्र तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करुन मराठवाड्याचा विकास करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. स्वच्छ भारत उपक्रमात मराठवाडा मागे असून, या कामांना गती देण्याचे निर्देश भापकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

सशस्त्र पोलिस शिपाई भरती यंदा ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आज संपत होती, ही मुदत २० तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं सोमवार २० तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद १२० धावा झाल्या आहेत. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांवर संपुष्टात आला. रविंद्र जडेजानं पाच, उमेश यादवनं तीन तर रविचंद्रन अश्विननं एक बळी घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ ३३१ धावांनी आघाडीवर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...