Thursday, 16 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांची कर्ज माफ करण्याकडे राज्यसरकारचा कल असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना विखेपाटील यांनी मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. विदर्भ-मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट झाल्याचं विखे पाटील म्हणाले. कर्जमाफी झाल्याशिवाय कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील अनेक मंत्री पूर्वी विरोधी पक्षात असताना सात-बारा कोरा करण्याची मागणी करत, मात्र आता सत्तेत आल्यानंतर, शेतकरी कर्जमाफी देण्यात अडचणी असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला अशी टीका विखे पाटील यांनी केली.
राज्यसरकारनं पुढच्या दोन दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करून शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक निधी मिळवावा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेना आमदार अनिल कदम यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत शिवसेनेचा राज्य सरकारला पाठिंबा राहिल, मात्र शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यास सरकार अपयशी ठरलं, तर शिवसेना अर्थसंकल्पाला विरोध करेल, असं कदम म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरुन आजही विधीमंडळाचं कामकाज आजही बाधित झालं, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केल्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरुच राहिली. गदारोळानं सतत व्यत्यय येत राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेतही या मुद्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली.

****

कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या चार गावांना भेट देऊन गारपीट तसंच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. महसूल आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार तातडीनं पंचनामे करणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. पंढरपूर इथंही खोत यांनी आज पाहणी केली. सोलापूरसह मराठवाड्यातल्या बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस झाला. यात शेतीचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या परळी इथं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****

समाजातल्या वंचित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणं, हे राष्ट्रीय आरोग्य धोरणाचं उद्दीष्ट असल्याचं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. लोकसभे ते आज बोलत होते. या धोरणासाठी एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या दोन पूर्णांक पाच टक्के खर्च प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक संरक्षणासाठी या धोरणाअंतर्गत सार्वजनिक रुग्णालयात मोफत औषधं, निदान या सोयी पुरवण्यात येणार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं काल या धोरणाला मंजुरी दिली आहे.

****

सरकार दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेला विशेष प्राधान्य देत असल्याचं, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. या योजनेच्या अंमलबाजवणीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पातळीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळानं ग्रामीण भागात विद्युतीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी ‘गर्व’ नावाचं ॲप तयार केलं असल्याचं गोयल यांनी सांगितलं.  

****

डिजिटल भारत हा उपक्रम राष्ट्र परिवर्तनासाठी क्रांतिकारक पाऊल असल्याचं, संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. पेटीएम सारख्या कंपन्यांना सरकार प्रोत्साहन देऊन त्यांचा लाभ करत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. रोखरहित व्यवहारांमुळे एटीएम कार्ड वापरावर लागणाऱ्या अतिरिक्त शुल्काचा नागरिकांवर भार पडणार असल्याचं मत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश यादव यांनी व्यक्त केलं.

****

गोवा आणि मणिपूर राज्यात भारतीय जनता पक्षानं नियमानुसार आधी बहुमत सिद्ध करुन सत्ता मिळवली असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस विनाकारण भाजपवर आरोप करत असल्याचं ते म्हणाले. दोन्ही राज्यात लोकशाही पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचं ते म्हणाले. 
काँग्रेस पक्षाचे नेते वैफल्यातून आरोप करत असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद २९९ धावा झाल्या. उमेश यादवनं दोन, तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...