Friday, 17 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 17.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधीमंडळात गदारोळ कायम

·      सरकार कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा, मदतीसाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन

·      कर्जमाफीसंदर्भात सरकार दिशाभूल करत असल्याची विरोधी पक्षाची टीका

आणि

·      मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं झालेल्या नुकसानींचे वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे कृषि राज्यमंत्र्यांचे निर्देश; नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची विधान परिषदेत मागणी

*****

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून कालही विधीमंडळात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांच्या घोषणाबाजीच्या गदारोळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निवेदन करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नसून, यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारशी चर्चा करून मदत मागणार असल्याचं, ते म्हणाले. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी सुमारे ३० हजार पाचशे कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे, राज्य सरकारनं हे कर्ज माफ केल्यास, इतर विकास कामांसाठी राज्याच्या तिजोरीत निधी शिल्लक राहणार नाही, असं ते म्हणाले. विरोधक या मुद्याचं राजकारण करत असून, बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफीची मागणी करत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. २००९ मध्ये दिलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं नव्हतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

राज्य सरकारनं पुढच्या दोन दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करून शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक निधी मिळवावा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेना आमदार अनिल कदम यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत शिवसेनेचा राज्य सरकारला पाठिंबा राहील, मात्र शेतकरी कर्ज माफी जाहीर करण्यास सरकार अपयशी ठरलं, तर शिवसेना अर्थसंकल्पाला विरोध करेल, असं कदम म्हणाले.

****

शेतकऱ्यांची कर्जमाफीसंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत केलेलं निवेदन दिशाभूल करणारं आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कर्जमाफीची घोषणा करण्याऐवजी सरकार विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करत आहे. कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव मांडायलाही सरकार तयार नाही असं विखे पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

लोकसभेतही काल देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली.

****

ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव इथं आज हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंडित भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

****

रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणारी २२ वैद्यकीय उपकरणं आणि साहित्यांवर कमाल किरकोळ किंमत छापणं राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणानं बंधनकारक केलं आहे. यामध्ये हृदय रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटसह, लेन्सेस, रक्ताच्या पिशव्या आदींचा समावेश आहे.

****

       बीडमधल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संस्था, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरूद्ध विभागीय चौकशी तसंच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

       तंत्रशिक्षण परिक्षेच्या निकालावर संशय व्यक्त करत चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले. नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेशही न्यायालयानं यावेळी दिले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या पिकांचे आणि इतर नुकसानींचे वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. पिक नुकसानीबाबत महसूल आणि कृषि अधिकाऱ्यांची काल लातूर इथं त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. महसूल आणि कृषि यंत्रणेनं संयुक्तपणे पंचनामे करावेत, तसंच एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही खोत यांनी यावेळी केली.

तत्पुर्वी खोत यांनी औसा तालुक्यातल्या चार गावांना भेट देऊन गारपीट तसंच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथंही भेट देऊन खोत यांनी नुकसानची पाहणी केली.

****

िवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांनी काल उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी केली.

      स्मानाबाद जिल्ह्यात अंदाजे ६ हजार ७७२ हेक्टर्सवरील पिक आणि फळबागांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी आमच्या वार्ताहराशी बोलतांना सांगितलं. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा या पीकांबरोबरच कांदा तसंच द्राक्षं, आंबा, टरबूज या फळबागांचंही नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले.

****

दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मराठवाड्यातल्या ३७० गावांना फटका बसला आहे. यादरम्यान वीज पडून ६ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत, त्याचप्रमाणे ३० जनावरं दगावले असल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयानं राज्य सरकारला पाठवला आहे.

****

नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पुन्हा संकट आलं असून नुकसानीचे पंचनामे करुन तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ते म्हणाले.....

मराठवाड्यामध्ये लातूर, बी,ड औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या परिसरात फार मोठ्या प्रमाणात गारपिट आणि वादळ आलं. त्यामुळं लाखो शेतकऱ्यांचं फार मोठं त्या ठिकाणी नुकसान झालं. या भागातील सर्वसामान्य जनतेचं आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाईसुद्धा तात्काळ या सरकारनं द्यावी, तात्काळ या ठिकाणी पंचनामे करावेत, ही मागणी आज आम्ही विधानपरिषदेत केली.



दरम्यान,  लातूर जिल्ह्यात किल्लारी, लामजना परीसरात काल गारांसह पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

      राज्यात कालपासून जलसप्ताहास प्रारंभ झाला असून येत्या २२ मार्चपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. लातूर इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या हस्ते जलसप्ताहाचा शुभारंभ झाला. या सप्ताहानिमित्तानं जिल्ह्यात जलजागृती विषयक व्याख्यानं, चर्चासत्रं, चित्ररथ, लोकजागृती कार्यक्रम, जलजागृती रॅली, चित्रकला तसंच निबंध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणीत जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांच्या हस्ते जलसप्ताहाचं उद्घाटन झालं.

****

विचारांच्या क्षेत्रात अंतिम काही नसतं हे समजलं की विचारांच्या कक्षा रूंदावतात असं संत साहित्याचे लेखक सुभाष देशपांडे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार काल त्यांना औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ‘चिंरतनाचा ज्ञानदिप : संत नामेदव’ या ग्रंथास ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि अकरा हजार रूपये रोख, असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. संत साहित्य हा मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद इथल्या मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा मिलिंद समता पुरस्कार आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांना काल प्रदान करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्या काल पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद २९९ धावा झाल्या. उमेश यादवनं दोन, तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

लातूर जिल्ह्यात आज रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात मद्य विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.

//*****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...