Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
राज्यात
काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस; वीज पडून सात जणांचा मृत्यू; पिकांच्या नुकसानीचे
पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश
·
शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीवरून विधीमंडळाचं कामकाज ठप्प
·
केंद्रीय
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात दोन टक्के वाढ
आणि
·
परभणी
शहरात आठ ठिकाणी आयकर खात्याच्या धाडी; ९ कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त
*****
सोलापूरसह मराठवाड्यातल्या बीड, लातूर,
उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये काल अनेक ठिकाणी गारांसह
अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान विजा पडून बीड जिल्ह्यात पाच तर लातूर आणि सोलापूर
जिल्ह्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आणि
गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. परळी आणि केज तालुक्यात वीज पडून प्रत्येकी दोन
जणांचा तर आष्टी तालुक्यात एका जणाचा मृत्यू झाला, तसंच या घटनांमध्ये इतर २ जण जखमी
झाले. माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांवरचे पत्रे आणि तावदाने उडून गेले.
लातूर शहरात काही भागात गारपीटही झाली.
वीज पडल्यामुळे ढाकणी इथल्या एका तरूणाचं निधन झालं. उदगीर, शिरूर, निलंगा, उस्तुरी,
मुरूड, औराद शहाजनी, अहमदपूर, देवणी आदी भागात वादळवाऱ्यासह काल अवकाळी पाऊस पडला.
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या
विटा आणि मुदगल परिसरामध्ये गारांसह पाऊस झाला.
उस्मानाबाद तालुक्यातल्या कळंब, देवधानोरा
वाशी तालुका, खामसवाडी, पाडोळी, समुद्रवाणी लासोना, गुंजोटी आणि परिसरात काल वादळी
वारा तसंच गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग, अणदुर, धनगरवाडी,
मानेवाडी, सिदंगाव, नंदगाव, बोरगाव परीसरातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान
वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. उमरग्यात मुसळधार पडला तर उस्मानाबाद तालुक्यातल्या
गुघी, मेंढा, तावराज खेडा, सुंभा आणि परीसरातल्या २० ते २२ गावातही काल अवकाळी पाऊस
पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जिल्ह्यात आंबा, गहू, ज्वारी या पिकांचं
नुकसान झालं असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आयुष प्रसाद
यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, वसमत फाटा,
भोकर फाटा आणि उमरी परीसरात काल अवकाळी पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथंही
पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, मंगळवेढा,
मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि करमाळा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये
विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली तर करमाळा तालुक्यात पडलेल्या विजेमुळे दोन बैल
मृत्युमुखी पडले.
दरम्यान, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे
तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाला दिले
आहेत. काल या संदर्भात त्यांनी मुंबईत बैठक घेतली. महसूल यंत्रणेच्या समन्वयाने या
नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली.
उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह
पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यापार्श्वभूमीवर सतर्कता
बाळगावी, असं आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कालही विधी
मंडळाचं कामकाज होऊ शकलं नाही. दोन्ही सभागृहामध्ये या मागणीवरून सदस्यांनी गदारोळ
केल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं. विधान परीषदेत कामकाज सुरु होताच
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी
कर्जमाफीची मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर
तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढू, अशी
भूमिका मांडली. यावरून
सभागृहात गदारोळ झाल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानसभेतही या मागणीवरून सदस्य आक्रमक
झाले होते. यावरून झालेल्या गदारोळात तीन वेळा कामकाज स्थगित करण्यात आलं. मात्र त्यानंतरही
गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या गदारोळादरम्यान
विधानसभेत पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.
****
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक
महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका
तपासणीबाबत पुकारलेलं असहकार आंदोलन मागे घेतलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
काल विधानसभेत ही माहिती दिली. महासंघाने त्यांच्या मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास असहकाराचा इशारा दिला होता.
दरम्यान, माजी विधानसभा सदस्य चंद्रकांत
देशमुख यांना काल विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी यासंदर्भात शोकप्रस्ताव मांडला होता.
****
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळानं
घेतला. १ जानेवारीपासून हा निर्णय लागू असणार आहे. आता महागाई भत्याचा हा दर एकूण चार
टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात
आली आहे. ४८ लाख ८५ हजार कर्मचारी आणि ५५ लाख ५१ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या
निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात
झालेल्या या भेटीत राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर
उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केल्याचं वृत्त आहे. तसंच साखर उद्योगापुढच्या अडचणी
आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातही चर्चा झाली. आर्थिक विवंचनेत
असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब असून पंतप्रधानांनी
त्यावर तोडगा काढावा असं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
रायगड किल्ला जतन आणि संवर्धन तसंच
पर्यटन विकास आराखडा, औरंगाबाद मधील म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन, नांदेड जिल्ह्यातील
माहूर देवस्थान, आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पर्यटन विकास आराखडा या राज्यातल्या
४ पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत
झालेल्या बैठकीत, काल मंजुरी देण्यात आली. म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन
विकासासाठी चारशे अडोतीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये तर नांदेड जिल्ह्यातल्या माहूर
साठी दोनशे सोळा कोटी तेरा लाख रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याचा यात समावेश आहे.
****
चलनबंदीनंतर केलेले व्यवहार संशयास्पद
असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या आठ ठिकाणी आयकर खात्यानं धाडी टाकून जवळपास
९ कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. धाडी टाकण्यात आलेल्यांमध्ये एका सहकारी
पतसंस्थेचा आणि सात व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण
योजनेअंतर्गत पाच कोटी ६० लाख रूपयांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे.
****
निवडणूक सुधारणा
हे लोकशाही समोरील सर्वात मोठं आव्हान असून या सुधारणांविषयी प्रचार, प्रसार करणं गरजेचं
असल्याचं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी काल औरंगाबाद
इथं व्यक्त केलं. कॉम्रेड चंद्रगुप्त आणि कॉम्रेड करूणा भाभी चौधरी स्मृती समितीच्या
वतीनं ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हानं’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.
संसदीय प्रणालीत उद्योजकांचा हस्तक्षेप वाढला असून सामान्य माणूस संसदीय प्रणालीपासून
दूर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती काल साजरी झाली. औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी विविध पक्ष
संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नांदेड,
उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि लातूरसह सर्वच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना
अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं वाहनफेरी, मिरवणूक, रक्तदान शिबीरासह विविध उपक्रम
राबवण्यात आले.
****
बीड इथल्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप फणसे
आणि व्यवस्थापक अमोल बळे यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. बीड
इथल्या धनश्री कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थेला, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र
देण्यासाठी या दोघांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, परंडा,
उमरगा, तुळजापूर आणि मुरुम या पाच नगरपालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेऊनही, शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध
येत्या ८ दिवसात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ मिशनच्या उपसंचालिका
स्मिता झगडे यांनी काल उस्मानाबाद इथं दिली.
//****//
No comments:
Post a Comment