Saturday, 18 March 2017

text - AIR News Bulletin, Aurangabad 18.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शैक्षणिक संस्थांमध्ये असहिष्णूता, भेदभाव आणि द्वेषभावनेला स्थान असू नये, - राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; आर्थिक वृद्धीदर ९ पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज; २०१७-१८ चा अर्थसंकल्प आज सादर होणार

·      शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊन त्यांना संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी - मुख्यमंत्र्यांची मागणी

·      पैठण इथं नाथषष्ठी उत्सवाला प्रारंभ

आणि

·      अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते नारायणडोह मार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी

****

शैक्षणिक संस्थांमध्ये असहिष्णूता, भेदभाव आणि द्वेषभावनेला स्थान असू नये, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मानद डी.लीट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी एकविशेष टपाल तिकीटजारी करण्यात आलं.

****

राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल विधीमंडळासमोर सादर करण्यात आला. राज्याचा आर्थिक वृद्धीदर ९ पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला असून, कृषी क्षेत्रात साडे बारा टक्के वाढ अपेक्षित आहे. तृणधान्यं, कडधान्यं, गळीत धान्य तसंच कापूस उत्पादनात वाढ तर, ऊस उत्पादनात २८ टक्के घट होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन ते एक लाख ४७ हजार ३९९ रुपये झालं असल्याचं यात म्हटलं आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. या अहवालात सरकारनं केलेल्या विकासाच्या दाव्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. महिला आणि बालकांवरच्या अत्याचारात वाढ, कृषी उत्पादनात घट आणि सिंचन क्षमता निर्मितीत सरकारचं अपयश या अहवालातून दिसत असल्याचं, मुंडे म्हणाले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं.



दरम्यान, २०१७-१८ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण होणार आहे.

****

शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊन त्यांना संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि कृषी मंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेऊन ही मागणी केली. यासाठी केंद्रानं एक योजना सुरू करावी, महाराष्ट्रही त्यात सहभाग देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीच्या मुद्यावर केंद्रीय मंत्र्यांकडून अनुकूल प्रतिसाद मिळाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सीबीआय आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं एकत्र प्रयत्न करावेत, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय तर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचं विशेष तपास पथक करत आहे. या दोन्ही तपास यंत्रणांनी त्यांच्या तपासाचा स्थिती अहवाल काल न्यायालयापुढे सादर केला. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या २० एप्रिलला होणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यशासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना काल जळगाव इथं प्रदान करण्यात आला. ५ लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

पैठण इथं आजपासून नाथषष्ठी उत्सवाला प्रारंभ होत आहे. संत एकनाथांच्या वाड्यातील श्रीखंड्याचा रांजणही पाण्यानं भरला असल्याची माहिती नाथवशंजांनी दिली. नाथषष्ठीसाठी राज्यभरातून हजारो वारकरी पैठणनगरीत दाखल झाले आहेत. भाविकांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली असून जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. परवा, कालाष्टमीला या उत्सवाची सांगता होणार आहे.

दरम्यान, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपेगाव इथं वारकरी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बहुप्रतिक्षित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते नारायणडोह मार्गावर काल रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सात डब्यांची ही गाडी १५ किलोमीटर धावली. या मार्गावर अन्य रेल्वेस्थानकं टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहेत. एकूण २६१ किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी २८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

****

रेल्वे अर्थसंकल्पात घोषीत झालेला नांदेड - लातूर रोड हा अहमदपूर चापोली मार्गे जाणारा नवीन रेल्वे मार्ग लवकरच होणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड, यांच्यासह रेल्वे संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी काल नवी दिल्ली इथं रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परवा २० मार्चपासून २७ जूनपर्यंत या गाडीच्या ३० फेऱ्या होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

****

बीड जिल्हयात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. काल त्यांनी परळी आणि केज तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. परळी तालुक्यात वीज पडून ठार झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीनं प्रत्येकी ४ लाख रुपये मदतीचे धनादेश मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनचे लाभ देण्याच्या सूचनाही मुंडे यांनी यावेळी केल्या.

****

परभणी जिल्ह्यात गारपीटीमुळं सुमारे २२ हजार हेक्टर्सवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

****

खरीप अनुदानातील अनियमितता प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांना निलंबित करण्यात आलं. २०१५ मध्ये तालुक्यातील नुकसानभरपाईपोटी दिलेल्या निधी प्रकरणी केलेल्या चौकशीत अनियमितता आढळून आल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल नांदे यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

****

अपंग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीपासून महापालिका स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निर्देश राज्याचे अपंग आयुक्त नितीन पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला.

****

नांदेड इथल्या रास्तभाव दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल नांदेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आंदोलकांच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार किरण अंबेकर यांना सादर करण्यात आलं.

****

रंगपंचमीचा सण राज्यात काल अनेक ठिकाणी साजरा झाला. लातूर इथं अनेकांनी कोरड्या रंगाचा वापर करत पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात साजरी केली.

****

सशस्त्र पोलिस शिपाई भरती यंदा ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २० तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं सोमवार २० तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

****

पैठण इथल्या नाथषष्ठी महोत्सवात कालाष्टमी उत्सवानिमित्त परवा २० मार्च रोजी औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादिवशी औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. मात्र उद्या रविवारी १९ मार्चला बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार असल्याचं रुग्णालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्राधान्यानं अंमलबजावणी करुन मराठवाड्याचा विकास करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केली आहे. औरंगाबाद इथं विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. विभागीय हातमाग कापड स्पर्धेचं बक्षीस वितरणही भापकर यांच्या हस्ते काल झालं, पैठणी उत्पादकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र फोरम स्थापन करणार असल्याचं भापकर यांनी सांगितलं.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...