Wednesday, 15 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 15 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचं, आमदार सुनिल प्रभू यांनी म्हटलं आहे. ते आज विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. उत्तरप्रदेशमधल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का नाही, अस प्रश्न करत, राज्याचा अर्थसंकल्प मंजूर होण्यापूर्वी कर्जमाफी न झाल्यास, विधीमंडळाचं कामकाज सुरळीत चालणार नाही, असा इशाराही प्रभू यांनी यावेळी दिला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधीमंडळाचं कामकाज आजही बाधित झालं होतं.
दरम्यान, याच मुद्यावर आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्याचं वृत्त आहे.

****

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत पुकारलेलं असहकार आंदोलन मागे घेतलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. महासंघाने त्यांच्या मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास असहकाराचा इशारा दिला होता.
दरम्यान, माजी विधानसभा सदस्य चंद्रकांत देशमुख यांना आज विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात शोकप्रस्ताव मांडला होता.

****

पुण्याच्या महापौरपदी भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदा लोणकर यांचा शेहेचाळीस मतांनी पराभव केला. टिळक यांना अट्ठ्याण्णव तर लोणकर यांना बावन्न मतं मिळाली. मनसेनं या मतदानावर बहिष्कार टाकला, एमआयएम पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला, तर दहा नगरसेवक तटस्थ राहिले. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या पणतूंच्या पत्नी आहेत.

****

भारतीय जनता पक्षाचे एन. बीरेन सिंह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. इंफाळमध्ये राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सिंह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाचे वाय.जोयकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय अन्य सात मंत्र्यांचाही यावेळी शपथविधी झाला.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अफरातफर असल्याची तक्रार निवडणूक आयोगानं फेटाळल्यानं, आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात देशभरात आंदोलन करणार असल्याची आणि दर महिन्याच्या अकरा तारखेला “काळा दिवस” पाळणार असल्याची माहितीही मायावती यांनी दिली. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाला अवघ्या १९ जागा मिळाल्या आहेत.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या तेरा ग्रामपंचायतींच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणूक झाली. यामध्ये चार ठिकाणी भाजपाचे, चार ठिकाणी काँग्रेसचे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन ठिकाणी तर एका ठिकाणी भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे सभापती निवडून आले आहेत.

*****

जागतिक क्रिकेट परिषद - आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं, मनोहर यांनी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. मे २०१६ मध्ये मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली होती.

****

आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवल्यास आत्मविश्वास वाढता, असं प्रतिपादन निवृत्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी केलं आहे. साहित्या अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वेदालंकार यांचा उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

****

मराठवाड्यात आज बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीटीसह पाऊस झाला.
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातल्या अनेक गावात गारासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांवरचे पत्रे उडून गेले.
लातूर शहरात सकाळी सहा वाजेपासून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काही भागात गारपीट ही झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यात काही गावात तसंच कळंब तालुक्यात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला.
या पावसाने ज्वारी, गहू, बाजरी, तू, यासह इतर फळपिकांचं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातही पंढरपूर, मंगळवेढा परिसरात पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...