आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
भारत
आणि रशिया दरम्यान बारा महत्वपूर्ण करार करण्यात आले. संरक्षण, दहशतवादाचा सामना, व्यापारात
पुढाकार आणि आण्विक ऊर्जा आदी क्षेत्रांच्या सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि रशियाचे राष्ट्रपती व्लाव्दिमिर पुतीन यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारत आणि रशियाचे संबंध अधिक दृढ झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान आज पहिल्यांदाच
सेंट पीटर्सबर्ग इथल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक फोरम इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राहणार आहेत.
****
जागतिक
तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या पॅरिस
हवामान करारातून अमेरिकेनं माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल
अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. पॅरिस हवामान करारातून माघार घेत
असलो तरी, नव्या तरतुदींसह पुन्हा करारामध्ये सहभागी होऊ किंवा नव्याने करार करु असं
ट्रम्प यांनी म्हटलं आहे. २०१५ मध्ये झालेल्या या करारावर जगातल्या १९५ देशांनी स्वाक्षऱ्या
केल्या होत्या.
****
देशातलं
दुग्धोत्पादन वाढण्यासाठी राष्ट्रीय-गो उत्पादकता अभियान राबवलं जाणार असून यासाठी
केंद्र सरकारनं साडे आठशे कोटी रुपये मंजुर केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी
कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे. जागतिक दुग्ध दिवसानिमित्त नवी दिल्ली
इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशी गायींची पैदास वाढण्यासाठी, त्यांचं
वाण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ अभियानही सुरु केल्याचं ते म्हणाले. आपला देश
दुग्धोत्पादनात अग्रेसर असून गेल्या तीन वर्षात यात विक्रमी वाढ झाली आहे, त्याद्वारे
शेतकऱ्यांचही उत्पन्न वाढल्याचं सिंह यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद
जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ साठी अतिरिक्त २० कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी शासनानं
मंजूर केल्यानं, आता एकूण २४४ कोटी ४७ लाख एवढ्या खर्चाचा नियतव्यय मंजूर झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या काल झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
//******//
No comments:
Post a Comment