Thursday, 1 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०१ दुपारी .००वा.

****

राज्यातले शेतकरी आज संपावर गेले आहेत. भाजीपाला तसंच दुधाची विक्री शेतकऱ्यांनी बंद केली असून, शहरं तसंच महानगरांकडे जाणारा शेतमाल आज सकाळपासून थांबला गेला. बाजार समित्या तसंच अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत, लासलगाव सह कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणलेला नसल्यानं बाजार समित्याध्ये शुकशुकाट आहे. मध्यरात्री चांदवड- मनमाड चौफुलीवर दुधाच्या टँकर मधल्या ८०० पिशव्या फोडून रस्त्यावर दूध ओतण्याचा प्रकार घडला.

निफाड तालुक्यातल्या नैताळे इथं संपाला हिंसक वळण लागलं असून, शेतकऱ्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. आंबे, चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे ट्रक जप्त करत ते रस्त्यावर फेकून देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील मह्रळ खुर्द येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून निषेध केला.

सातारा जिल्ह्यातल्या सर्व पथकर नाक्यांवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातल्या मोठ्या पथकर नाक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध बाजारात आणले नाही, तर भूम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संकलन केलेलं दुध रस्त्यावर ओतून दिल्याचं वृत्त आहे.

अहमदनगर इथंही मुंबईकडे जाणारा शेतमाल टाकळी ढोकेश्वर इथं अडवण्यात आला असून, रस्ता बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

राज्यात इतरत्रही संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

****

विमुद्रीकरणाचा निर्णय हे भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं मोठं पाऊल असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षात अर्थ मंत्रालयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला. वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यावर देशात मोठा बदल घडून येईल, असं ते म्हणाले.

****

देशाचा आर्थिक विकासाचा दर २०१६-१७ या वर्षात सात पूर्णांक एक दशांश टक्के इतका झाला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं ही माहिती प्रसिद्ध केली. विमुद्रीकरणानंतर कृषी क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्राच्या विकासात अडथळे निर्माण झाल्याचं या महितीत म्हटलं आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीचा दर सहा पूर्णांक एक दशांश टक्के राहील्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे. या वर्षात ८७ टक्के चलनाचं विमुद्रीकरण झालं आहे.

****

आधार कार्ड धारकांची बायोमॅट्रीक माहिती सुरक्षित असून, कोणत्याही सायबर हल्ल्याचा त्यावर परिणाम झाला नाही, असं भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आधारबद्दलच्या अत्याधुनिक सायबर सुरक्षा संकलनाची माहिती द्यायला प्राधिकरणानं नकार दिला आहे. माहितीच्या अधिकाराखाली याबाबत विचारणा करण्यात आली होती.

****

औरंगाबाद शहरालगत असलेल्या हर्सुल तलाव परिसरात जांभूळवन विकसित केलं जात असून, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं पालकमंत्री रामदास यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जांभुळवनास भेट दिली. याठिकाणी मसाला पीके घेण्यात यावी, आणि त्याचं योग्य नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कदम यांनी आज औरंगाबाद शहरातल्या महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ६० किलोमीटर लांबीच्या नालेसाफई कामांची पाहणीही केली.

****

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा आजपासून लंडन इथं सुरु होत आहे. पहिला सामना आज इंग्लंड आणि बांग्लादेश दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतासह आठ देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. येत्या रविवारी एजबेस्टन इथं भारत - पाकिस्तान सामना होणार आहे.

****

पॅरीस इथं सुरु असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांनी पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि तीची कझाकिस्तानची जोडीदार यारोस्लाव्हा श्वेडोव्हा यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला.

****

ग्रामीण घरकुल योजनेतल्या घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या कुटुंबांना, ५०० चौरस फुट जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सुटला असून, जर गावात जागा नसेल, तर गावाबाहेर जागा घेऊन त्या ठिकाणी एकत्रित सर्व जाती धर्मांचे लोक राहणार असल्याचं, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...