Saturday, 1 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.07.2017 - 06.50

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·      वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आजपासून देशभरात लागू
·      आधार क्रमांकाशिवाय प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नसल्याचं आयकर विभागाकडून स्पष्ट
·      राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वन महोत्सव; मराठवाड्यात ७४ लाख वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट निर्धारित
आणि
·      तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर ९३ धावांनी विजय
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आजपासून देशभरात लागू झाला. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घंटानाद करून, ही करप्रणाली लागू झाल्याचं सूचित केलं. 
केंद्र आणि राज्य सरकारांच्या परस्पर सहमतीमुळे कररचनेचं नवं पर्व उदयास आल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं. हे कोणत्याही एका सरकारचं यश नसून, भारतीय संघराज्याचं यश असल्याचं, राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जीएसटी म्हणजे गुड आणि सिंपल टॅक्स असल्याचं सांगत, यामुळे व्यापार व्यवस्थेतलं असंतुलन दूर होईल, तसंच केंद्र आणि राज्य एका दिशेनं काम करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. विमुद्रीकरण निर्णयाप्रमाणे संस्थात्मक तयारीशिवाय जीएसटीची अंमलबजावणी होत असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटी कर प्रणाली देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे, मात्र अर्धवट तयारीवर त्याची अंमलबजावणी होत असल्याची टीका त्यांनी केली.
****
जीएसटीमुळे एक देश, एक कर, एक बाजारपेठ ही रचना अस्तित्वात येऊन देशाच्या विकासात आमुलाग्र परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, वस्तू आणि सेवा कर प्रणालीत त्रास होणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. काल मुंबईत, उद्योग जगतातल्या प्रतिनिधींशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीएसटीबाबतच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विक्रीकर विभागानं हेल्पलाईन सुरु केली आहे. १८०० २२५ ९०० या क्रमांकावर फोन करून कोणीही आपल्या शंका विचारू शकतील, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
आय करदात्यांना आधार क्रमांकाशिवाय आजपासून प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नाही, असं आयकर विभागानं सांगितलं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पॅन रद्द होणार नाही, असं विभागानं नमू्द केलं आहे. आधार क्रमांक पॅनशी जोडू न शकलेल्या नागकरिकांना ई प्राप्तीकर विवरणपत्र भरताना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दिलेल्या क्रमांकाचा उल्लेख करण्याचा पर्याय असेल, आणि ते या दोन्ही विशिष्ट क्रमांकांना जोडण्याचं वैध माध्यम मानलं जाईल, असं प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यापुढे पॅन साठी अर्ज करताना मात्र आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. 
****
लोकशाहीत मतांपेक्षा विचारधारा महत्वाची आहे असं मत राष्ट्रपती पदाच्या विरोधी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराच्या बुद्धीमत्तेची, शिक्षणाची, सामाजिक कामाची चर्चा न होता जातीची चर्चा अधिक होत असल्याची खंत मीरा कुमार यांनी व्यक्त केली.
****
मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीनं काल राज्य शासनाला सादर केला. या मसुद्यावर संबंधीत विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर सदर मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळानं या धोरणास मंजुरी दिल्यानंतर मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नांदेड इथं पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित ‘प्रकाश पर्व’ या विशेष कार्यक्रमा मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
****
राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वन महोत्सव सप्ताह राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या सप्ताहाअंतर्गत प्रामुख्यानं शासकीय पडीक जमीन, गायरान, टेकड्या, शेतांचे बांध, रस्ते तसंच लोहमार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. यासाठी वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करुन दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात आठ जिल्ह्यातल्या शहात्तर तालुक्यांत २७७ रोपवाटिकांमध्ये एक कोटी ३४ लाख रोपं तयार करून लागवडीसाठी तयार ठेवली आहेत.   
जालना जिल्ह्यात आठ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यात बारा लाख ८० हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कालच्या तिसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर ९३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात चार बाद २५१ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला वेस्ट इंडीज संघ ३९ व्या षटकात १५८ धावांवर सर्वबाद झाला. मालिकेत चौथा सामना उद्या खेळवला जाणार असून, भारत सध्या दोन शून्यनं आघाडीवर आहे.
****
हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून आज राज्यभरात साजरी केली जात आहे. सर्वत्र या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर इथं जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि  शेतकरी उत्पादक गटांचा कृषी दिनानिमित्त गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेनं जोडल्या जाणार असल्याचं, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नांदेड परिमंडळाअंतर्गत सोळा वीज उपकेंद्रांचं भूमीपूजन बावनकुळे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. सन २०३० पर्यंत राज्याला शाश्वत वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना लक्षात घेता, चार हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याचं, ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीची मूळ रक्कम भरण्याचं आवाहनही बावनकुळे यांनी केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात जून महिन्यात एकूण सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाला असून ा पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २३० मिलीमीटर तर ळंब तालुक्यात सर्वात कमी १३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …..
 जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ३० टक्के इतका पाऊस झाल्यामुळं बळीराजा सुखावला. जिल्ह्यातलं ४ लाख ६२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील विविध पिकांसाठी कृषी क्षेत्रानं निर्धारित केलं होतं. त्यापैकी दोन लाख ५१ हजार ४६४ म्हणजे ५१ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर जिल्ह्यातले २१९ मोठे, लघु, मध्यम सिंचन प्रकल्पात २० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. राज्य शासनानं जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातल्या जवळपास ७९ हजार शेतकऱ्यांना १५५ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
आषाढी एकादशी येत्या मंगळवारी चार जुलै रोजी साजरी होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं आदिलाबाद, नगरसोल आणि अकोला इथून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. आदिलाबाद - पंढरपूर ही गाडी तीन जुलैला सकाळी नऊ वाजता आदिलाबाद इथून सुटून दुपारी एक वाजता नांदेड इथं आणि परभणी, परळी, मार्गे चार तारखेला पहाटेच्या सुमारास पंढरपूरला पोहोचेल.
नगरसोल - पंढरपूर ही गाडी नगरसोलहून संध्याकाळी साडेपाचला सुटून औरंगाबाद, परभणी, परळी, लातूर मार्गे पंढरपूरला सकाळी १० वाजता पोहोचेल.
****

No comments: