Saturday, 1 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जुलै  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर बशीर लष्करी सह दोन दहशतवादी ठार झाले. हे दोघे दहशतवादी १६ जून रोजी दक्षिण काश्मीरमधल्या अचबल भागात पाच पोलिसांच्या हत्येमध्ये सामिल होते. सुरक्षा जवानांनी आज ब्रेंती भागाला चहुबाजूंनी घेरून या भागात शोधमोहिम सुरू करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एका महिलेसह एक दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

****

१८ ते १९ वर्ष वयोगटातल्या ज्या नागरिकांनी मतदार नोंदणी केली नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगानं देशभरात विशेष मोहीम सुरू केली आहे. आयोगानं सर्व राजकीय पक्षांना या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. जुलै महिन्यात चालणाऱ्या या मोहिमेत नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी आणि नाव वगळण्यासाठी फॉर्म सहा भरण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

****

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री अतिथगृह इथं, तर विधानभवनात विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

****

जल, जंगल आणि जमीन या पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या तीनही बाबींसाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पावलं उचलली असून, यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोली इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीनं हाती घेतलेल्या या मोहिमेचं अनुकरण इतर राज्यांनी देखील करावं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

यावेळी वृक्ष संवर्धनासाठी दिला जाणारा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार नागपूर जिल्ह्यातल्या सोनपूर या गावाला, तर आणखी दोन पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातल्या अंजनवाडा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या नवटोला या गावांना देण्यात आले. 
विधानभवनात विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
उस्मानाबाद इथं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते, भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ झाला. 

****

वन सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं वृक्ष दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

बुलढाणा शहरातूनही वृक्षदिंडी काढण्यात आली. 

****

पॅरीस इथं झालेल्या ग्लोबल स्कील समिटमध्ये राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाला ‘उत्कृष्ट कौशल्य व्यवस्थापन पुरस्कार’ मिळाला आहे. शासकीय आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी राज्य शासनाचा थेट निधी खर्च न करता सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केला जात आहे. यामुळे विभागाची या पुरस्कारासाठी निवड झाली. राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज बंडी शेगावला मुक्कामी जाणार आहे. पालखीचं तिसरं गोल रिंगण ठाकुरबुवांच्या समाधीजवळ पार पडलं. संत तुकाराम महाराजांची पालखी आज तिराची पुरोली इथं जाणार आहे. तर पैठणहून निघालेली एकनाथ महाराजांची पालखी करकंब इथं पोहोचली. या तिनही पालख्या उद्या वाखरी इथं एकत्र येऊन, पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

****

आषाढी वारीसाठी बिदरहून पंढरपूरला जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी तीन जुलैला दुपारी पावणे चार वाजता बिदरहून सुटेल आणि उदगीर, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी मार्गे रात्री एक वाजून १५ मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चार जुलैला सकाळी सात वाजता पंढरपूरहून निघेल आणि दुपारी दोन वाजता बिदरला पोहोचेल. चार आणि पाच तारखेलाही ही रेल्वे बिदरहून पंढरपूरला जाणार आहे.

****

औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दुसरा हेरीटेज वॉक आज भडकल गेट परिसरातल्या नौखंडा पॅलेस इथं पार पडला. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रमजान शेख यांनी यावेळी परिसराची माहिती दिली. औरंगाबाद शहराचं ऐतिहासिक महत्व कळण्याच्या उद्देशानं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी हा उपक्रम राबवला जातो.

****

No comments: