Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जुलै २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
चार
कोटी वृक्ष लागवड मोहिमेला राज्यात प्रारंभ
·
विमुद्रीकरणानंतर
देशभरात तीन लाख कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद तर ३७ हजारांपेक्षा अधिक बनावट कंपन्या
उघडकीस
·
निवडणूक
आयोगाची देशभरात विशेष मतदार नोंदणी मोहीम
·
औरंगाबाद
इथं मृद आणि जलसंधारण आयुक्तालय सुरू
आणि
·
महिला
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानविरूद्ध सामना
****
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेला कालपासून राज्यभरात प्रारंभ
झाला. ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. जल, जंगल आणि जमीन या पर्यावरणाशी निगडित
तीनही बाबींसाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पावलं उचलली असून, येत्या काही वर्षांत याचे
फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय परिवहन मंत्री
नितीन गडकरी यांच्या हस्तेही यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं.
अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीनं हाती घेतलेल्या
या मोहिमेचं अनुकरण इतर राज्यांनी देखील करावं, असं आवाहन गडकरी यांनी केलं. राज्याचे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त झाडं लावण्यासह
पुढच्या तीन वर्षांत ५० कोटी झाडं लावण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या राज्यभरातल्या
रोपवाटिकांमध्ये १६ कोटी ६० लाख रोपटी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वृक्षलागवडीसाठीचे संत तुकाराम वनग्राम पुरस्कार या कार्यक्रमात
प्रदान करण्यात आले. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या लांबोटा आणि सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला पाच लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार
विभागून देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला
एक लाख ५१ हजार रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आलं.
काल सायंकाळपर्यंत राज्यभरात ६४ लाख ६२ हजार ३७२ वृक्ष
लागवड करण्यात आली. विधानभवनात विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आलं. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज औरंगाबाद
जिल्ह्यात औरंगाबाद - पुणे महामार्गावर तसंच फुलंब्री तालुक्यात वृक्षारोपण होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात माहूर इथं दत्तशिखर परिसरात पालकमंत्री
अर्जून खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून, या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. उपवनसंरक्षक
आशिष ठाकरे यांनी या मोहिमेत जिल्हाभरात १७ लाख ५२ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार
असल्याचं सांगितलं. वृक्षारोपणानंतर माहूर शहरातून निघालेल्या वृक्षदिंडीला, पालकमंत्री
खोतकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. शालेय विद्यार्थी या दिंडीत उत्साहानं
सहभागी झाले होते.
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात रेवली इथं पालकमंत्री
पंकजा मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या वृक्षारोपण सप्ताहात, जिल्ह्यात
बारा लाख ७६ हजार वृक्षलागवडीचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं असल्याची माहिती वनाधिकारी
अमोल सातपुते यांनी दिली.
उस्मानाबाद इथं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री
महादेव जानकर यांच्या हस्ते, भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते
वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ झाला. वन सप्ताहानिमित्त तुळजापूर इथं काढण्यात आलेल्या
वृक्ष दिंडीत शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता.
लातूर जिल्ह्यात काल दिवसभरात साडे तीन लाख ५८ हजारावर
झाडं लावण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी आर जी मुदमवार यांनी दिली. जिल्ह्यासाठी
सात लाख ७६ हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट दिलं असल्याचं, मुदमवार यांनी सांगितलं. लातूर
महापालिकेच्या वतीनंही शहरात रस्त्यांच्या दुतर्फा तसंच संरक्षित हरित पट्ट्यांमध्ये
कडुलिंब, करंज तसंच गुलमोहराची झाडं लावण्यात आली.
जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते काल
वनमहोत्सवाचा शुभारंभ झाला, या वृक्ष लागवड सप्ताहा दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ७५ हजार
वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातही कालपासून वृक्षारोपण मोहिमेला
प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
विमुद्रीकरणानंतर देशभरात तीन लाख कंपन्यांचे व्यवहार
संशयास्पद आढळले असून, ३७ हजारांपेक्षा अधिक बनावट कंपन्या समोर आल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल सनदी लेखापाल दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी, बेकायदा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर
कारवाईचा इशारा दिला आहे. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाचं पंतप्रधानांच्या
हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
****
ज्या पात्र नागरिकांनी अद्याप मतदार नोंदणी केली नाही,
त्यांच्यासाठी निवडणूक आयोगानं देशभरात विशेष मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. आयोगानं
सर्व राजकीय पक्षांना या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. जुलै महिन्यात चालणाऱ्या
या मोहिमेत नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी तसंच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक
सहा भरण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
औरंगाबाद इथं मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाचं, जलसंधारण
मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. शहरातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन
संस्था – वाल्मीच्या परिसरात हे आयुक्तालय सुरू झालं आहे. यावेळी कृषी दिनानिमित्त
त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. शिंदे यांनी वाल्मी परिसराची पाहणी करुन आयुक्तालयाच्या
संरचनेसंदर्भात आढावा बैठकही घेतली.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची आज इंग्लडमधल्या
डर्बी इथं पाकिस्तानच्या संघासमवेत लढत होणार आहे. या स्पर्धेत भारतानं यापूर्वीचे
दोन्ही सामने जिंकले आहेत.
दरम्यान. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या
पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
चौथा सामना आज होणार आहे. या मालिकेत भारतानं यापूर्वी दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी
घेतली आहे.
****
परभणी इथल्या एका उर्दू शाळेत शिक्षकाचा पगार देण्यासाठी
२० हजार रूपयांची लाच घेतांना मुख्याध्यापिकेसह शाळेचा सचिव आणि शिपायाला लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. कामेल उर्दू शाळेत एका शिक्षकाच्या सहा महिन्यापासूनच्या
पगारातली २० टक्के रक्कम देण्याची मागणी शहाना बेगम या मुख्याध्यापिकेनं केली होती,
त्यापैकी २० हजार रूपयांचा हप्ता शाळेजवळच्या एक घरात शिपायाकडे देत असतांना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं या शिपायासह मुख्याध्यापिका आणि लिपिकाला अटक केली.
****
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे प्रणेते
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन
करण्यात आलं. विधानभवनात विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी तर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथगृहात नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी
नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठवाड्यात सर्वत्र नाईक
यांना आदरांजली अर्पण करण्यात आलं.
****
दळणवळणाची सुविधा चांगली असेल तर त्या जिल्ह्याचा विकास
होण्यास मदत होते असं मत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं
आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी इथल्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन
तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण मुंडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्ह्यात रस्ते विकासाची कामे मोठयाप्रमाणात हाती घेण्यात आले असल्याची माहिती मुंडे
यांनी दिली.
****
शेती आणि शेतकऱ्याप्रती समाजानं संवेदनशीलता बाळगण्याची
आवश्यकता असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल
लातूर इथं ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांच्या शेतीविषय लेखन संग्रहाच्या 'शिवारगाथा'
पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु ड़ॉ बी व्यकंटेश्वरल्लू हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची
माहिती वेळेत मिळायला हवी असं प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. माणिक गुरसळ यांनी केलं आहे, लातूर इथं कृषि दिनाच्या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात
ते काल बोलत होते. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि पिकांची उत्पादकता वाढवली
जात आहे, मात्र ते वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं त्यांचं नुकसान होत असल्याचं
गुरसळ यांनी पुढं सांगितलं.
****
ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानात बीड जिल्ह्यातल्या आठ
गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये विकासाच्या सर्व योजना राबवण्यासाठी
अधिकाऱ्यांनी गावाचा विकासात्मक आराखडा तयार करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्राम सामाजिक
परिवर्तन अभियान आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते काल बोलत होते.
****
No comments:
Post a Comment