Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø २०१८
-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार
Ø मालवाहतुकीसाठीची नवीन ई वे बिल प्रणाली आजपासून लागू
Ø मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटी शुल्कात ट्रायकडून सुमारे
७९ टक्के कपात
Ø लातूर
जिल्ह्यात उपनगरी रेल्वे तसंच मेट्रो बोगी कारखाना उभारण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता
आणि
Ø नाफेडमार्फत आधारभूत दराने तूर खरेदीला आजपासून
प्रारंभ
****
२०१८
-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली प्रथम लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत अर्थसंकल्प
सादर करतील. विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा,
चालू कार्यकाळातला हा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प सर्वसामान्य अर्थसंकल्पात समाविष्ट केल्यामुळे, या वर्षीही रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प
सादर केला जाणार नाही.
****
वस्तू आणि सेवा कराअंतर्गत मालवाहतुकीसाठीची
नवीन
ई वे बिल प्रणाली आजपासून लागू होत आहे. या प्रणालीनुसार ५० हजार रुपयांपेक्षा अधिक
किमतीचा माल दहा किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर पाठवताना, ई वे बिल सोबत बाळगणं आवश्यक
आहे. देशभरात मालवाहतुक सुगम व्हावी, यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण - ट्राय ने मोबाईल क्रमांक
पोर्टेबिलिटी शुल्कात सुमारे ७९ टक्के कपात केली आहे. आता मोबाईल क्रमांक कायम ठेवून,
सेवा देणारी दूरसंचार कंपनी बदलण्यासाठी जास्तीत जास्त चार रुपये शुल्क आकारलं जाईल.
यासंदर्भातली अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपासून हे दर लागू होतील, असं प्राधीकरणानं
सांगितलं आहे.
****
नौदलाच्या, स्कॉर्पियन श्रेणीतल्या
आय एन एस करंज या पाणबुडीचं काल मुंबईतल्या माझगाव बंदरात जलावतरण करण्यात आलं. अत्याधुनिक
शस्त्रं वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी पूर्णपणे भारतीय बनावटीची असून, या
पाणबुडीमुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ झाली आहे.
****
शहिदांच्या कुटुंबियांना शासनाकडून
दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत पाच लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या
सन्मानार्थ काल मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही
घोषणा केली. यापूर्वी ही मदत २० लाख रुपयांपर्यंत होती. वीर जवानांच्या शौर्याच्या गाथा
अतुलनीय असल्याचं नमूद करत, युवा पिढीनं त्यापासून
प्रेरणा घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उपनगरी
रेल्वे तसंच मेट्रो बोगी कारखाना उभारण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे. रेल्वेमंत्री
पियुष गोयल यांनी काल मुंबईत सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
भेट घेऊन ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या रुपात मराठवाड्यासाठी मोठी योजना प्राप्त
होत असून, लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या तरुणांना
मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्याचे
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला
होता. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानत,
निलंगेकर यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्रातला दारिद्र्य
निर्मुलनाचा लढा तीव्र
करण्यात आला असून, या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २७ तालुके रोजगारयुक्त करण्यात येणार
आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या योजनेसाठी नियोजन विभागात
उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ॲक्शन रुमचं उद्घाटन काल दोन आदिवासी विद्यार्थ्यांच्या हस्ते
करण्यात आलं, त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातल्या
२७ तालुक्यांमध्ये मराठवाड्यातल्या परतूर, भोकरदन, हिंगोली, औंढा नागनाथ, कळंब या तालुक्यांचा
समावेश आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या या ॲक्शन रुमच्या
माध्यमातून कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य, आदी मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं जाणार
आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
अर्ज करण्याची मुदत आता येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठीचे अर्ज
आता विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेणार आहे, त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या
सहायक आयुक्तांकडे दाखल करायचे आहेत. या योजनेअंतर्गत, दहावीनंतरच्या व्यावसायिक आणि
बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जातींच्या तसंच नवबौद्ध
प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात
जातात.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
चालू हंगामासाठी
आधारभूत दराने तूर खरेदीला आजपासून प्रारंभ होत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहकार तसंच पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. नाफेडमार्फत होणाऱ्या या खरेदीसाठी राज्यात १५९ खरेदी केंद्रं उघडण्यात आली असून, मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ केंद्रं, जालना,
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी नऊ केंद्र, नांदेड ८, परभणी ६, हिंगोली ५, तर औरंगाबाद
जिल्ह्यात
चार केंद्र उघडण्यात आली आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित
बँकेशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी, असं आवाहन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते. बँकांनी शासनाला सादर केलेल्या
माहितीशी, शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत नसल्यानं, ५५ हजार ४१ शेतकऱ्यांची माहिती
अशा २४ बँकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या
दरात काल सुमारे ५०० रुपयांनी घसरण होऊन, सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल
भाव मिळाला. निर्यात मंदावलेली असताना, कांद्याची आवक वाढल्यानं, दरावर परिणाम झाल्याचं,
सांगितलं जात आहे.
****
येत्या ९ फेब्रुवारीपासून “स्वच्छ मराठवाडा” अभियान
हाती घेण्यात येणार असून, देवगिरी किल्ल्यापासून त्याची सुरूवात होईल, विभागीय आयुक्त
डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती
दिली. मराठवाड्यात जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर या पाच जिल्ह्यातली वैयक्तिक
शौचालयांची बांधकामं १०० टक्के पूर्ण झाली असून शहरी भाग उघड्यावर शौचापासून मुक्त
झाल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यातली कामंही
लवकरच पूर्ण होतील, “स्वच्छ मराठवाडा” अभियानामुळे येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण
मराठवाडा स्वच्छ होईल अशी अपेक्षा आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान सुरक्षित
मातृत्व अभियानामुळे माता मृत्यू आणि बाल मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. याविषयी
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर……
जिल्हयात एप्रिल
२०१७ ते डिसेंम्बर २०१७ पर्यंत २६ हजार ५८ गरोधर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी
२८३ अतिजोखमीच्या महिला आढळ्या. या मातांची
नियमित मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध उपच्चार केल्यानं माता मृत्यु आणि बाल मृत्यु
यांच्या प्रमाणात घट झाली. शासकीय आरोग्य संस्थातील प्रस्तुतीचे प्रमाण सन २०१३ ते
२०१४ मध्ये हे प्रमाण ६९ टक्के होत. ते प्रमाण सन २०१६-२०१७ मध्ये ९९ टक्के पर्यत पोहचलं.
त्यामुळे जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांची पंतप्रधान सुरक्षित मातृत्व
अभियानाची यशस्वीता जनमानसातील
प्रतिमा उंचावण्यास मदत झाली आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहार,उस्मानाबाद.
****
नवी
दिल्ली इथे सुरू असलेल्या इंडिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत सायना
नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि आकर्षी कश्यप यांनी तर पुरुष एकेरीमध्ये बी.साईप्रणितनं
दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सहा एकदिवसीय
सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. मालिकेतला पहिला सामना आज डर्बन इथं
खेळवला जाईल. याआधी झालेली कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेनं दोन - एक अशी जिंकली आहे.
****
राष्ट्रीय वैद्यकीय परिषद कायद्याच्या
समर्थनार्थ परभणी जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीनं, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं एक
निवेदन देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment