Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 17 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø विद्यार्थ्यांनी फक्त स्वत:शीच स्पर्धा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
Ø
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानात
दुपटीनं वाढ - मुख्यमंत्र्यांची घोषणा
Ø पहिला संत चोखामेळा पुरस्कार
सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना प्रदान
Ø महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं
राज्य - उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांचं प्रतिपादन
आणि
Ø दक्षिण आफ्रिका दौऱ्यात महिला
तसंच पुरुष क्रिकेट संघांचे
दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
*****
विद्यार्थ्यांनी
फक्त स्वत:शीच
स्पर्धा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. नवी दिल्ली इथं
काल देशभरातल्या विद्यार्थ्यांशी परीक्षांच्या अनुषंगानं चर्चा करताना ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा, तसंच मन एकाग्र होण्यासाठी योगाचा मार्ग
अवलंबावा, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी तणावात न राहता सकारात्मकतेनं परीक्षा
द्यावी, पालकांनीही आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करुन त्यांच्यावर दबाव आणू नये,
असं ते म्हणाले. देशभरातून शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून या चर्चेत सहभागी झाले होते.
****
गोदावरी नदीवरील सर्व धरणं पूर्ण
क्षमतेनं भरण्यासाठी नदीजोड प्रकल्प उपयुक्त ठरेल असा विश्वास, केंद्रीय जलसंपदा आणि
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूर इथं ‘लोक सहभागातून
भूजल व्यवस्थापन’ या संकल्पनेवर आधारित भूजल मंथन परिषदेत बोलत होते. पावसाचं वाहून
जाणारं पाणी अडवून त्याचा सिंचन आणि पिण्यासाठी वापर व्हावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत
प्रथमच राष्ट्रीय महामार्ग विकास संस्थेतर्फे शंभर पुल बंधारे बांधण्यात येणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. समुद्रात वाहून जाणारं नद्यांचं पाणी वाचवण्यावर आगामी काळात विशेष
भर द्यावा लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुदानात पुढच्या
वर्षीपासून दुप्पट वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बडोदा इथं आयोजित एक्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी
ते काल बोलत होते. साहित्य संमेलनाला शासनाकडून २५ लाख रूपये अनुदान मिळतं ते पुढील
वर्षीपासून ५० लाख करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या साहित्य
संमेलनात होणाऱ्या ठरावांवर अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. मराठी
भाषा अतिशय
सक्षम असून ती कोणतंही
आव्हान पेलण्यास समर्थ आहे, मराठी भाषा डिजीटल सुसंगत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न
करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केलं. याप्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मराठी भाषा मंत्री
विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे,
मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर
चौधरी उपस्थित होते.
****
दरम्यान, सोलापूर
जिल्ह्यात मंगळवेढा इथं संत चोखोबा यांच्या निर्वाणभूमीत त्यांचं स्मारक उभारण्याची
घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल
गोंदिया इथं सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब
आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभागाचा पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त
खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५१
हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. गोंदिया इथं राईस
क्लस्टरला मान्यता दिली असून लवकरच राईस पार्क उभारण्यात येईल अशी ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
गारपीटीने
झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना
तातडीनं मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी म्हटलं आहे. काल मराठवाड्यात गारपीटग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते. जालना जिल्ह्यासह वाशिम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या
नुकसानग्रस्त शेतीची त्यांनी पाहणी केली. नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारकडे २०० कोटी
रुपयांची मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपुरुषांबद्दल
आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी, अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याची पदावरून
हकालपट्टी करण्यात आली असून, त्याला पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. अहमदनगरचे भाजप जिल्हा शहराध्यक्ष
खासदार दिलीप गांधी यांनी ही माहिती दिली. छिंदम याच्याविरोधात शहरातल्या तोफखाना पोलिस
ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, विविध संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल अहमदनगर इथं छिंदमच्या घर तसंच कार्यालयासमोर
घोषणाबाजी करत, तोडफोड केल्याचं वृत्त आहे.
****
शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण होणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
महिला उद्योजकांसाठी
स्वतंत्र धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल अनुसूचित
जाती आणि जमातीच्या उद्योजकांसाठी एससी एसटी हब या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. . याविषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले,
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही महिला
धोरण आणलेलं आहे.महिला उद्योजकीनं एखादी योजना,एखादा उद्योग, समोर आणला त्याची छाननी
आम्ही जरूर करू. परंतू त्यांना भांडवली अनुदान आहे. व्याजाचं अनुदान आहे. ही फार मोठी
सवलत आहे. राज्य सरकानं ठरवलं आहे तुम्हाला जे वर्षाला व्याज द्यावं लागतं त्यातलं ५० टक्के व्याज सरकार
देईल.
स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नव उद्योजकांसाठी सुर्वणकाळ
आला असून, याचा फायदा महाराष्ट्रातल्या तरूण तरूणींनी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
मॅग्नेटीक महाराष्ट्र, मैत्री योजना, राज्यात सुरु झालेले वेगवेगळे क्लस्टर याबद्दलही
देसाई यांनी यावेळी माहिती दिली.
दरम्यान, औरंगाबाद इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज
आणि ॲग्रीकल्चर - सीएमआयए च्यावतीनं आयोजित चौथ्या ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह 2018 ’ देसाई यांनी मार्गदर्शन केलं,
शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण
झाल्याचं सांगतानाच, देसाई यांनी उपस्थित तरुणांना संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी
पुढाकार घेण्याचं आवाहन केलं.
****
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं
येत्या २४ फेब्रुवारीला औरंगाबाद इथं हस्तकला सहयोग शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरातून
मुद्रा योजनेतून कर्ज देणं,
अत्याधुनिक यंत्र सामुग्री देणं, विमा अशा विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
****
दक्षिण
आफ्रिका दौऱ्यात काल महिला तसंच पुरुष क्रिकेट संघांनी दक्षिण आफ्रिकेवर काल दणदणीत विजय मिळवला.
महिलांच्या टी-ट्वेंटी
क्रिकेट मालिकेच्या काल दुसऱ्या सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा नऊ फलंदाज राखून
पराभव केला. अफ्रिका संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत २० षटकांत सात बाद १४२ धावा
केल्या. भारतीय संघानं हे आव्हान विसाव्या षटकांत पूर्ण केलं. स्मृती मंधवानं ५७ तर
मिताली राजनं नाबाद ७६ धावा केल्या. भारतानं पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत दोन
- शून्य अशी आघाडी घेतली आहे.
शार्दुल ठाकूरची गोलंदाजी आणि कर्णधाराला
साजेसं विराट कोहलीचं झंझावाती शतक या बळावर पुरुष संघानं, एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या
अखेरच्या सहाव्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी
करताना दक्षिण आफ्रिकेनं सर्वबाद दोनशे चार धावा केल्या शार्दुल ठाकूरनं चार, जसप्रीत
बुमराह आणि युजवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन
तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल
खेळताना, विराट कोहलीनं ९६ चेंडूत १२९ धावा करत, ३३ व्या षटकात विजय मिळवला. कोहलीचे
हे एकदिवसीय ३५वं शतक आहे, मालिकेत तीन शतकं झळकावणारा कोहली सामनावीर तसंच मालिकावीर
पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, महिलांच्या मालिकेतला तिसरा
आणि पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या जोहान्सबर्ग
इथं होणार आहे.
****
उद्योगांमधील सुरक्षेसंदर्भात
आजपासून औरंगाबाद इथं दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाळूज
औद्योगिक वसाहतीतल्या मराठवाडा ऑटो क्लस्टर इथं आयांजित या परिसंवादात वीजविषयक अपघात,
कारखान्यांमध्ये होणारे अपघात आणि उपाययोजना आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष जयेंद्र भिरूड यांनी ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment