आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ फेब्रुवारी २०१८
सकाळी ११.००
****
श्रीनगरच्या एस एम एच एस रुगणालयातून
पाकिस्तानी दहशतवादी नाविद जट पलायन प्रकरणात सहभागी पाच आरोपींना राष्ट्रीय तपास पथकाच्या
न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे पाचही जण पुलवामा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. या
घटनेत दहशवाद्यांनी सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर
केलेल्या गोळीबारात दोन कर्मचारी शहीद झाले होते.
****
नांदेड इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते
आणि वाघलवाडाच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव पाटील हस्सेकर
यांचं आज पहाटे नांदेड इथं निधन झालं, ते ६२ वर्षांचे होते. आज संध्याकाळी चार वाजता
त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राज्यशासनाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेला
आज औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. बंदीस्त मेंढीपालनाला चालना देणं, हा मुख्य उद्देश
असलेल्या या योजनेत ७५ टक्के अनुदानावर मेंढी गटाचं वाटप केलं जाणार आहे. औरंगाबाद
नजीक पडेगाव इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास केंद्रात सकाळी साडे अकरा
वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
लातूर महानगरपालिकेचं २०१७ - १८ आर्थिक वर्षाचा सुधारित
तसंच २०१८ - १९ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी पाच लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक काल स्थायी
समितीसमोर सादर करण्यात आलं. या अंदाज पत्रकात अमृत योजनेअंतर्गत मलनि:स्सारण प्रकल्पासाठी
१३९ कोटी ४२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत १
हजार ४६४ घरकुलास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४४२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याची
तसंच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र वातानुकूलित करण्यासाठी ३७ लाख रुपये तरतूद
केल्याचं, या अंदाज पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
प्रादेशिक पर्यटन योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
कळंब तालुक्यात डिकसळ इथलं गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान तसंच मलकापूर इथलं दत्त
मंदिर संस्थान इथं बहुउद्देशिय इमारत तसंच पर्यटक निवास इमारत बांधण्यासाठी पर्यटन
मंत्री जयकुमार रावल यांनी तीन कोटी ५३ लक्ष ४० हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय
मंजूरी दिली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment