Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 17
February 2018
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०१८
दुपारी १.०० वा.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयनं बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांच्यासह हेमंत भट आणि
मनोज खरात या दोघांना आज मंबईतून अटक केली आहे. या तिनही आरोपींना सीबीआयच्या विशेष
न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे.
****
दरम्यान, इतर बँकांना दिलेल्या हमीपत्राअंतर्गत दिलेली कटिबद्धता पूर्ण करावी, अशा स्वरूपाचे कुठलेही निर्देश पंजाब नॅशनल बँकेला दिले नसल्याचं
भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेनं हमीपत्राअंतर्गत इतर बँकांची
देय असलेली रक्कम अदा करावी, अशा स्वरुपाचे निर्देश दिले असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी
दिलं होतं. पंजाब नॅशनल बँकेमध्ये उद्भवलेली परिस्थिती काही कर्मचाऱ्यांच्या अनियमीततेमुळे
निर्माण झाली असून, बँकेला
आपल्या अंतर्गत व्यवस्थापनावर अंकुश ठेवण्यात
अपयश आल्यानं ही स्थिती निर्माण झाली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हंटल आहे. पंजाब नॅशनल
बँकेच्या कारभारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक निरीक्षक म्हणून
काम करत असून, आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही
बँकेनं सांगितलं आहे.
****
भारताच्या दौऱ्यावर आलेले इराणचे अध्यक्ष हसन रुहानी हैदराबाद इथल्या दोन दिवसांच्या
मुक्कामानंतर काल रात्री नवी दिल्लीत पोहोचले असून, त्यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रुहानी यांच्यात सध्या द्विपक्षीय चर्चा सुरु आहे. या बैठकीदरम्यान अनेक करारही होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या, जोडीदाराच्या तसंच कुटुंबात त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर
सर्वांच्या उत्पन्नाचे स्रोत जाहीर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यानुसार आता उमेदवाराला
केवळ स्वतःच्या मालकीच्याच नव्हे, तर कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या संपत्तीची माहितीही सार्वजनिक करावी लागणार आहे.
या संदर्भात एका स्वयंसेवी संघटनेनं जनहित याचिका दाखल केली होती. लोकसभेतल्या २६ तर राज्यसभेतल्या ११ खासदारांच्या आणि २५७ आमदारांच्या
संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असल्याचा दावा या याचिकाकर्त्यानं केला होता. सध्या असलेल्या
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, उमेदवारालाच संपत्तीची माहिती जाहीर करणं बंधनकारक आहे, मात्र त्याचा स्रोत जाहीर करण्याची तरतूद कायद्यात नाही, असंही याचिकेत म्हटलं आहे.
****
'चांद्रयान - दोन' या माहिमेअंतर्गत चंद्रावर जाणारा देशातला दुसरा उपग्रह येत्या एप्रिलमध्ये अवकाशात
सोडला जाईल,
अशी
माहिती,
केंद्रीय
अणुऊर्जा आणि अवकाश विभाग मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली
इथं वार्ताहरांशी बोलत होते. या मोहिमेसाठी एकूण ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यात ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हरसाठी
लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल, असं त्यांनी सांगितलं. भारत अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी
करत असून,
वीजनिर्मिती, कृषी आणि आरोग्यासारख्या
अनेक विधायक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होत असल्याचं ते म्हणाले.
****
रंगमंच ऑलिम्पिकच्या आठव्या भागाचं उद्धाटन आज नवी दिल्लीत लाल किल्ला इथं उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. भारत पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं यजमानपद भूषवत असून, २५ हजाराहून अधिक परदेशी कलावंत यात सहभागी होणार असल्याचं सांस्कृतिक
मंत्रालयानं म्हटलं आहे. आठ एप्रिलपर्यंत देशभरातल्या १७ शहरांमध्ये ऑलिम्पिकचं सादरीकरण होणार असून, यात मुंबईसह अहमदाबाद, भोपाळ, पाटणा, कोलकाता, गुवाहाटी आणि जम्मू या शहरांचा समावेश आहे. ‘मैत्रीचा ध्वज’ ही या सोहळयाची संकल्पना आहे.
****
पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पुणे पोलिसांच्या
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं दिल्लीतून अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं डी.
एस. कुलकर्णींना अटकेपासून दिलेलं संरक्षण मागे घेतल्यानंतर दिल्लीतल्या एका हॉटेलमधून
पोलिसांनी आज पहाटे त्यांना आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना अटक केली. या दोघांविरोधात
पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात
आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
पोत्रा इथले रहीवासी आणि कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातले अधिष्ठाता डॉ. दशरथ
कोठूळे यांचं आज पोत्रा इथं निधन झालं. त्यांनी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहिलं होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी
तीन वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चेन्नई खुल्या एटीपी
चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज भारताचा युकी भांबरी आणि ऑस्ट्रेलियाच्या
जॉर्डन थॉम्पसन यांच्या दरम्यान होणार आहे. उपान्त्य फेरीच्या सामन्यात भाबरीनं कोरियाच्या
डुखी ली याचा पाच - सात, दोन - सहा असा पराभव केला होता.
*****
***
No comments:
Post a Comment