Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 16 February 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करायला पाहिजे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज देशभरातल्या विद्यार्थ्यांशी
परीक्षेवर चर्चा करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा, तसंच
मन एकाग्र होण्यासाठी योगाचा मार्ग अवलंबावा, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी
तणावात न राहता सकारात्मकतेनं परीक्षा द्यावी, पालकांनीही विद्यार्थ्यांवर दबाव आणू
नये, तसंच पाल्याची इतरांशी तुलना करु नये, असं ते म्हणाले. देशभरातून शालेय तसंच महाविद्यालयीन
विद्यार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या चर्चेत सहभागी झाले होते.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी हीरे व्यापारी नीरव
मोदी आणि मेहुल चोकसी यांचे पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं चार आठवड्यासाठी
निलंबित केले आहेत. मंत्रालयानं त्यांना एका आठवड्यात यासंदर्भात उत्तर मागितलं आहे,
निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यास, तर त्यांचं पारपत्र कायमचं रद्द केलं जाणार आहे.
सक्तवसुली संचालनालयानं नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या पाच मालमत्तांवरही टाच आणली
आहे.
****
पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी न्यायालयाची
फसवणूक केली असून, त्यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण मागे घेत असल्याचं, मुंबई उच्च
न्यायालयानं आजच्या सुनावणीत सांगितलं आहे. डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती
कुलकर्णी देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून विमानतळ प्राधिकरणास हायअॅलर्ट जारी करण्याचे
निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. कुलकर्णी यांनी ठराविक रक्कम जमा करण्याचा शब्द पाळला
नसल्यामुळे न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला
होणार आहे.
****
राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी,
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, पक्षातून
बडतर्फ करण्यात आलं आहे. अहमदनगरचे भाजप जिल्हा शहराध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी
ही माहिती दिली. छिंदम याच्याविरोधात शहरातल्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
करण्यात आली आहे. दरम्यान, विविध संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या
घर तसंच कार्यालयासमोर घोषणाबाजी करत, त्यांचं कार्यालय तसंच वाहनांची तोडफोड केल्याचं
वृत्त आहे.
****
धुळे तालुक्यातल्या लामकानी महसूली विभागातल्या आठ गावातल्या
शेतकऱ्यांना ५६ लाख २२ हजार रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे. हे शेतकरी खरीप हंगाम
सन २०१६-१७ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित झाले होते. बोरीस इथल्या सेंट्रल
बँक शाखेनं विम्याच्या हप्त्यापोटी पैसे भरुनही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या
चुकीमुळे शेतकऱ्यांना झटका बसला होता. यामुळे माजी आमदार शरद पाटील यांनी ग्राहक मंचात
दाद मागितली होती.
****
उद्योगांमधील सुरक्षेसंदर्भात उद्या औरंगाबाद इथं दोन
दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष जयेंद्र
भिरूड यांनी ही माहिती दिली. वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या मराठवाडा ऑटो क्लस्टर इथं
या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. वीजविषयक अपघात, कारखान्यांमध्ये होणारे अपघात
आणि उपाययोजना, सेफ्टी ऑडीट , सुरक्षा धोरण या संदर्भातील कायदे, नियम, प्रशिक्षण आदी
विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
****
औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या
२०१८ वर्षासाठीच्या तीन सुट्ट्या आज जाहीर केल्या आहेत. नऊ मार्च रोजी संत एकनाथ कालाष्टमी
उत्सव, सहा नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि २७ नोव्हेंबरला खुलताबादच्या ऊरुसानिमित्त
औरंगाबाद जिल्ह्याला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातले सर्व राज्य सरकारी
कार्यालयं, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना या सुट्ट्या
लागू राहतील.
****
औरंगाबाद इथल्या श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल
दिगंबर जैन मंदिराचा वार्षिक महोत्सव परवा रविवारी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडे
सात ते दुपारी साडे तीन या वेळात होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह
महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांना लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यात तापमानात किंचित वाढ झाली आहे. आज सर्वात कमी
११ अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी १४ पूर्णांक नऊ, औरंगाबाद १५
पूर्णांक दोन, तर नांदेड इथं १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढच्या २४
तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या सहा एकदिवसीय
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना सेंच्यूरियन इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक
जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या
अकराव्या षटकांत दोन बाद ४५ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment