Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 18 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§ मॅग्नेटीक महाराष्ट्र, या जागतिक गुंतवणूक
परिषदेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत उदघाटन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं
भूमिपूजनही करणार
§ पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी तीन
बँक कर्मचाऱ्यांना तर ग्राहकांना फसवल्याप्रकरणी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस
कुलकर्णी यांना पत्नीसह अटक
§ बडोदा इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप
आणि
§
संवैधानिक अडचणी दूर झाल्यावरच धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण
देणं शक्य होईल- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
****
मुंबईत आज मॅग्नेटीक महाराष्ट्र, या जागतिक गुंतवणूक परिषदेचं
उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी एमएमआरडीएच्या
मैदानावर ते उद्योजकांशी संवादही साधणार आहेत. २०२५ सालापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था
एक ट्रिलियम अमेरिकन डॉलर्स करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार परदेशी गुंतवणूक
आकर्षित करणं, रोजगार निर्मिती, कुशल मनुष्यबळ अशा बाबींना चालना देणं हे या परिषदेचं
उद्दिष्ट आहे. याबरोबरचं १६ हजार सातशे कोटी रूपयांची गुंतवूणक करून उभारण्यात येत
असलेल्या, नवी मुंबई आणि परिसराचा कायापालट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजनही
पंतप्रधान आज करणार आहेत. वर्ष २०२० मध्ये इथून विमान उड्डाणांना प्रारंभ करण्याचं
सरकारचं उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या टर्मिनल कंटेनरचं उद्घाटनही
पंतप्रधान करणार आहेत. यामुळे ट्रस्टच्या कंटेनर वाहतुकीची क्षमता जवळपास दुपटीनं वाढणार
आहे.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयनं बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांच्यासह हेमंत
भट आणि मनोज खरात यांना काल अटक केली. दरम्यान, बँकेला आपल्या
अंतर्गत व्यवस्थापनावर अंकुश
ठेवण्यात अपयश आल्यानं ही स्थिती निर्माण झाली असल्याचं भारतीय रिझर्व्ह
बँकेनं म्हटलं आहे. काही कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली
असून, बँकेच्या कारभारावर रिझर्व्ह बँक
देखरेख आणि नियंत्रण ठेवून असल्याचं, बँकेनं म्हटलं आहे. इतर बँकांना दिलेल्या
हमीपत्राअंतर्गत कटिबद्धता पूर्ण करावी, अशा स्वरूपाचे कुठलेही निर्देश पंजाब
नॅशनल बँकेला दिले नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम जामिनचं संरक्षण काढून
घेतल्यानंतर पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना काल दिल्ली इथं पत्नीसह
अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांना पुणे इथं आणण्यात आलं असून जिल्हा सत्र न्यायालयानं
येत्या २३ तारखेपर्यंत दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. कुलकर्णी यांनी, घरं बांधून
देण्यासाठी सात प्रमुख भागीदार संस्थांच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात
ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
****
कामगारांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेबाबात
“शून्य अपघात धोरण” राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं, कामगार कल्याण
मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद नजीक वाळूज इथल्या मराठवाडा
ऑटो क्लस्टर मध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य सुरक्षा सेवा अधिकाऱ्यांसाठीच्या चर्चासत्र
आणि औद्योगिक सुरक्षा आणि सुरक्षा साधनांच्या प्रदर्शनात ते बोलत होते. राज्यात चार
कोटी कामगार कारखान्यामध्ये काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच कुटूंबातल्या इतर
पाच सदस्यांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेणार असून यासाठी लवकरच धोरण तयार करण्यात
येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
बडोदा इथं सुरु असलेल्या एक्याणवाव्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय
गायनानं झाली. त्यानंतर सुनील देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनाचं आयोजन करण्यात
आलं होतं. ज्येष्ठ लेखक गंगाधर पानतावणे तसंच शाम मनोहर यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद’ या विषयावर
परिसंवाद झाला. तर संध्याकाळी ‘मराठी साहित्याचा केंद्रबिंदू नागर ते नांगर’ या विषयावर
मुक्त चर्चा झाली. आज या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते काल मुंबईत
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७
या तीन वर्षांच्या क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. क्रिकेटपटू अंकित बावणे, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे यांच्यासह राज्यातले
क्रीडापटू आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा यावेळी
गौरव करण्यात आला. यात मराठवाड्यातल्या २१ जणांचा समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
धनगर आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून, संवैधानिक
अडचणी दूर झाल्यावरच आरक्षण देणं शक्य होईल, असं राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद नजीक पडेगाव इथं ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि
शेळी विकास महामंडळा’मार्फत ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजने’चा शुभारंभ आणि शेळ्या
मेंढ्या खाद्य बनवण्याकरता फिड मिलचं उद्घाटन जानकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते
बोलत होते. मेंढी पालन या पारंपारिक व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना संपूर्ण राज्यात
राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या
सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी १९ शेतकऱ्यांना प्रत्येकी २० मेंढ्या
आणि एक मेंढा अशा मेंढी गटांचं ७५ टक्के अनुदानानुसार वाटप करण्यात आलं.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, जानकर यांनी चारायुक्त
शिवार योजना राबवण्या मागची भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले...
शेतकऱ्यांना गाई म्हशी संभाळायचं
का परवडत नाही तर त्या चाऱ्यामुळे दुधातलं पैसं त्यात भरपूर जातात जर आपण सायलेस दिलं,ग्रेन
पावडर वगैरे दिलं आणि वाळलेली वैरण दिली.तर त्यामुळे तो शेतकरी काय करेल तर दुधाचा
धंदा वाढवू शकेल,जनावरांचं पशुधन वाढवू शकेल त्यादृष्टीनं आम्ही ती योजना आणतो आहे
चारा युक्त शिवारची.
****
तिहेरी तलाकवर बंदी घालणाऱ्या विधेयकास विरोध दर्शवत, जालना
इथं काल मुस्लीम पर्सनल मंडळाच्या इस्लाहे माशरा महिला समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात
आला. गांधीचमन चौकापासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचं ईदगाह मैदानावर सभेत रूपांतर
झालं. या ठिकाणी समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीन तलाक विधेयक मागे घ्यावं, या मागणीचं
निवेदन तहसीलदार विपिन पाटील यांना दिलं.
****
बारावीच्या परीक्षेला येत्या बुधवारी २१ तारखेपासून सुरुवात होणार आहे. औरंगाबाद
विभागात एकूण ३७४ परीक्षा केंद्र असून, एक लाख ६४ हजार ८७७ परीक्षार्थी आहेत. ही परीक्षा
कॉपीमुक्त तसंच तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार
असल्याची माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली आहे. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार
आढळल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार असल्याचंही पुन्ने यांनी सांगितलं.
****
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून या शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई मिळणार असल्याचं आश्वासन बबनराव लोणीकर यांनी दिलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या
पालम तालुक्यातल्या नाव्हा, तांदुळवाडी, पोरवणी देवी या गावांना त्यांनी काल भेट दिली
आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी तांदुळवाडी इथं झालेल्या
जाहीर सभेत ते बोलत होते. वॉटर ग्रेडच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन
प्रयत्नशील असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे आठ
हजार ५४६ हेक्टर शेतीला मोठा फटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या ३५ गावांमधल्या
पाच हजार ०५३ हेक्टर शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे
झाल्याबरोबर १५ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल
अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. हिंगोली इथं आयोजित पत्रकार
परिषदेत काल ते बोलत होते.
****
औरंगाबाद इथल्या श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर
जैन मंदिराचा वार्षिक महोत्सव आज आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडे सात ते दुपारी
साडे तीन या वेळात होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं
आयोजन करण्यात आलं असून भाविकांना लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था
यांच्या संयुक्त विद्यमानं परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं आयोजित ‘महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील
उच्चशिक्षण : एक तौलनिक अभ्यास’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राचं उद्घाटन कुलगुरु
डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. शिक्षणाचा स्तर उंचावण्याची
गरज कुलगुरुंनी यावेळी व्यक्त केली. या चर्चासत्रात मराठवाड्यातल्या विविध महाविद्यालयाच्या
प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या पोत्रा इथले रहीवासी आणि कोल्हापूरच्या
वैद्यकीय महाविद्यालयातले अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठूळे यांचं काल पोत्रा इथं निधन झालं.
त्यांनी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणूनही
काम पाहिलं होते.
//*********//
No comments:
Post a Comment