Monday, 19 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.03.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****



विरोधकांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग अकराव्या दिवशीही बाधित झालं. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. 

 लोकसभेत आज कामकाज सुरु होताच तेलगु देसम पक्ष, वाय एस आर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्या लाऊन धरत, अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.

 राज्यसभेतही तेलगु देसम पक्ष आणि एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्या करत घोषणाबाजी सुरु केली. या सदस्यांनी सभापतींमोर फलक झळकावले. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

 दरम्यान, तेलगु देसम पक्ष आणि वाय एस आर काँग्रेसच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा आणि अतिरिक्त निधी देण्याची मागणी करत, संसद भवन परिसरात आजही निदर्शनं केली.

****

 विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाला सामोरं जाण्यास सरकार तयार असल्याचं, संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार विश्वास मत बहुमतानं जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही सदनांचं कामकाज होत नाही, याला मुख्य विरोधी पक्ष जबाबदार असल्याचं ते म्हणाले.

****

 सध्या देशात उद्भवलेलं कृषी संकट हे कॉंग्रेसच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराचा परिणाम असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर टीका करत सितारामन यांनी, हे भाषण एक अपयशी वक्तृत्व असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचा पारदर्शी व्यवहारावर विश्वास नाही, म्हणून सरकारच्या तंत्रज्ञानावर आधारित धोरणांना काँग्रेसकडून टीका केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

****

 देशात विविध राज्यात असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या शिबिरांच्या परिस्थितीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या शिबिरांमध्ये स्वच्छता राखली जात नसल्यामुळे, अस वातावरण आरोग्याला हानिकारक होत असल्याचं, याबाबत दाखल याचिकेत म्हटलं आहे. हरियाणा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या या शिबिरांमध्ये अस्वच्छतेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचंही याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे. म्यानमार मधल्या राखिने राज्यात हिंसा भडकल्यानंतर रोहिंग्या मुस्लिम भारतात आले आहेत.

****

 हिंसा ही कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, असं धार्मिक नेते दलाई लामा यांनी म्हटलं आहे. ते काल जम्मू काश्मीर केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. सध्याची जागतिक वादाची परिस्थिती पाहता भारताकडे असलेल्या शांतता, अहिंसा आणि निधर्मीपणा सारख्या गुणांची महती वाढते, असं दलाई लामा म्हणाले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा, नैतिक मुल्यांची जोपासना करून स्वतःचं चारित्र्य घडवावं असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणीचे दाखले दिले.

****

 मुंबईत आज ओला आणि उबेर टॅक्सी चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतल्या रस्त्यावर वाहनांची संख्या कमी झाली आहे. मुंबई शहरात सुमारे तीस हजार टॅक्सी असून, या संपामुळे अनेक भागातील नागरिकांचे हाल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संपुकारला आहे.

****

 वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या खांडगेदरा या गावानं राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातलं अतिक्रमण आणि अवैध चराई, यावर वनव्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्रतिबंध करण्यासोबतच वनांच्या रक्षणासाठी प्रभावी काम केल्यामुळे खंडगेदरा गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

****

 शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीतर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी 'अन्नत्याग' आंदोलन करण्यात येत आहे. १९ मार्च, १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या चिल गव्हाण गावातले शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आत्महत्या केली होती, ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. यापार्श्वभूमीवर शेतकरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. औरंगाबाद इथं पैठण गेट समोर हे आंदोलन होत असून, यात शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते तसंच विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...