Thursday, 3 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५५ रूपयांची आर्थिक मदत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Ø पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणी छोटा राजनसह सर्व नऊ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Ø विधान परीषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अघोषित युती; प्रत्येकी तीन जागा लढवणार

आणि

Ø शंतनु गोयल परभणीचे तर बी. जी. पवार जालन्याचे नवे जिल्हाधिकारी

*****



 ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ५५ रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रीमंडळांच्या आर्थिक व्यवहार समितीनं काल घेतला. २०१७-१८ या वर्षातल्या हंगामासाठी ही मदत असणार आहे. ही मदत कारखान्यांच्या वतीनं थेट शेतकऱ्यांना देण्यात येईल. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने अडचणीत आले होते. मात्र या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे.



ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठीचा एक प्रयत्न म्हणून सरकारनं सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री वय वंदन योजने’ मध्ये गुंतवणुकीसाठी असलेली या आधीची साडेसात लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती पंधरा लाख रुपये करण्यालाही केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेला २०१९-२० पर्यंत मुदतवाढ देण्याला तसंच ‘हरित क्रांती, कृषी उन्नती’ योजनेकरता २०१९-२० या वर्षासाठी तेहतीस हजार दोनशे त्रेहात्तर कोटी रुपये निधी देण्यासदेखील मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.

****



 छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत २० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. ही मुदत १ मे रोजी संपणार होती. एकरकमी  कर्ज परतफेड योजनेची मुदत यापूर्वीच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****



 मुंबईतले पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणी काल मुंबईच्या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा- मकोका विशेष न्यायालयानं प्रमुख आरोपी छोटा राजनसहित सर्व नऊ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्रकार जिग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ या दोन आरोपींची न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं प्रत्येक आरोपीला २६ लाख रूपयांचा दंड देखील ठोठावला आहे. पत्रकार जे.डे यांची जून २०११ मध्ये मुंबईतल्या पवई भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

****



 रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध असून, काँग्रेस प्रकल्प ग्रस्तांच्या पाठीशी राहील, असं आश्वासन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. प्रकल्पाच्या परिसरात सागवे इथं झालेल्या सभेत ते काल बोलत होते. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही, परंतु, लोकांच्या घरांवर नांगर फिरवून केलेला विकास काँग्रेसला नको आहे. सत्तर टक्के लोकांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असेल, तर शासनाचा प्रकल्पासाठी आग्रह का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

****

  राज्यात  मराठा समाज आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं  आठ जिल्ह्यां मधलं सर्वेक्षण पूर्ण केलं असून ऊर्वरित भागात याचं काम सुरु असल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉक्टर  सर्जेराव निमसे यांनी दिली आहे. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी आयोगाचे सदस्य डॉक्टर  दत्ता बाळ सराफ, डॉक्टर  राजाभाऊ करपेंसह सदस्य सचिव डॉक्टर डी. डी. देशमुख उपस्थित होते . राज्यातल्या पाच संस्थांना सर्वेक्षणाचं काम दिलेलं असून या बबत निवेदनं आणि त्यांची सुनवाई घेतली जात आहे असं ते म्हणाले.

****



 महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाश्रमदानामध्ये राज्यातल्या पाच लाख नागरिकांनी सहभाग घेतल्याचं पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाणलोट  विकासाचं काम शास्त्रीय पद्धतीनं करणं गरजेचं असून आपली संस्था यासाठीच प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य करत असल्याच ते म्हणाले. या कामी राज्य सरकारचं सहकार्य मिळत असल्याचंही खान यांनी नमूद केलं.



 दरम्यान, खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी काल वैजापूर तालुक्यातल्या कोल्ही आणि सावखेड –खंडाळा इथं श्रमदान केलं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ तारखेला  होणाऱ्या निवडणुकीत, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात अघोषित युती झाली असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन -तीन जागा लढवणार आहेत. त्यानुसार, रायगड -रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, आणि परभणी-हिंगोली या तीन मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे तर, उस्मानाबाद- लातूर-बीड, अमरावती आणि चंद्रपूर या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

****



 भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश कराड यांनी काल उस्मानाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा जगजीतसिंग पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. उस्मानाबाद-लातूर-बीड या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी घोषित केली  आहे.



राज्यातल्या जनतेच्या मनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड रोष असून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही सरकार बदलाची नांदी ठरणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला प्रवेश हा भाजप आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का असल्याचही ते यावेळी म्हणाले.



दरम्यान, कराड यांनी निवडणुकी साठीचे आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय राज सय्यद अहमद सय्यद नूर आणि अशोक जगदाळे या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.



 भारतीय जनता पक्षांकडून सुरेश धस तर काँग्रेस पक्षाच्यावतीनं राजकिशोर मोदी  आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

****



 परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून कॉग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार सुरेश देशमुख, शिवसेनेकडून विप्लव बाजोरिया यांनी तर अपक्ष म्हणून सुरेश देशमुख यांचे चिरंजिव सुशीलकुमार देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीनं विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.



नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं शिवाजी सहाणे यांना काल उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीनं नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घोषित झाली आहे.

****



 राज्य सरकारनं काल तब्बल २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या आयुक्तपदी आर.ए. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



परभणीच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल यांची नियुक्ती झाली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नाशिक इथं आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून मीरा भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांची नियुक्ती झाली आहे.

****



 दहा रुपये किंमतीची पिण्याच्या पाण्याची बाटली ४० रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी, औरंगाबाद जिल्हा ग्राहक मंचानं औरंगाबाद शहरातल्या आयनॉक्स चित्रपटगृह आणि कोका कोला कंपनीला एकूण  १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

****



ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, यासाठी फेडरेशन ऑफ सिनीअर सिटीझन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र- फेस्कॉम संघटनेच्यावतीनं काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी संघटनेच्यावतीनं प्रशासनाला मागण्याचं निवेदन देण्यात आलं.  

****



 औरंगाबाद महापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या आठ मोठ्या हॉटेलसह २५ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. शंभर किलोहून अधिक कचरा निर्माण होत असल्यास संबंधितांनी प्रक्रिया करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.



दरम्यान, सार्वजनिक ठिकाणांसह, रस्त्यावरच काही नागरिक कचरा टाकत असल्याचं आढळून आल्यानं  अशा नागरिकांकडून दंड वसुल करण्याची सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे.

****

राज्यामध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि सामाजिक घटकांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर निवडणूक साक्षरता राज्य समिती गठीत करण्यात आली आहे. या क्लबमध्ये नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सदस्य म्हणून समावेश असणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची कार्यकारी समिती स्थापन करुन निवडणूक साक्षरता क्लब चालवण्यात येणार आहे.

****



 येत्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाळीस अंश सेल्शियसहून जास्त तापमान राहणार असून, विशेषत: परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवणार असल्याचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिला आहे. येत्या सहा आणि सात तारखेला लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिशय हलका पाऊस होण्याची शक्यताही विद्यापीठानं वर्तवली आहे.



 विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणी येत्या चार दिवसात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...