Saturday, 5 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



५ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 केंद्र सरकारनं देशभर राबवलेल्या ‘ग्राम स्वराज अभियाना‘ची आज सांगता होत आहे. केंद्र सरकारच्या सात प्रमुख योजनांचा लाभ देशातल्या सुमारे एकवीस हजार मागास गावांना व्हावा, यासाठी हे अभियान चौदा एप्रिलपासून सुरू करण्यात आलं होतं. राज्यातही एकशे ब्याण्णव गावांमध्ये विविध उपक्रमांद्वारे हे अभियान राबवण्यात आलं. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, इंद्रधनुष योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशातल्या मागास आणि गरीब नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

****



 वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा मालकी हक्क बदलून ती सरकारच्या मालकीची करण्यास जीएसटी परिषदेनं मान्यता दिली आहे. जीएसटी परिषदेच्या काल झालेल्या २७व्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत खासगी मालकीचा असलेला जीएसटी प्रणालीचा ५१ टक्के हिस्सा आता सरकारच्या ताब्यात येईल, तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के वाटा राहील, असं ते म्हणाले.

****



 भिलार या गावाची प्रेरणा घेऊन राज्यातलं प्रत्येक गाव पुस्तकाचं गाव व्हायला हवं, म्हणजे एक दिवस पुस्तकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची कीर्ती देशभर होईल, असं प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. पुस्तकांचं गाव भिलार, या अभिनव प्रकल्पाला काल एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं झालेल्या खुल्या प्रेक्षागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. वर्षपूर्ती निमित्तानं काढण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.

****



 नव्यानं सुरू झालेल्या बिदर कोल्हापूर साप्ताहिक रेल्वेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार ही गाडी दर बुधवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी कोल्हापूरहून निघून उदगीर, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूरमार्गे गुरुवारी सकाळी सव्वादहाला बीदरला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात बीदरहून दर गुरुवारी सकाळी पावणेबाराला निघून रात्री साडेबाराला कोल्हापूरला पोहोचेल.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या नागझरी गावाचा सरपंच संभाजी वंजारी याला दहा हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. सिंचन विहीरीचा कार्यादेश काढून देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...