Saturday, 5 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे  २०१ दुपारी १.०० वा.

****



 जम्मू काश्मीरमधल्या छत्ताबल भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक अधिकारी जखमी झाले. या भागात अजून एक दहशतवादी लपला असून, गोळीबार सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्रीनगरमधली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

****



 मनुष्यबळ विकास मंत्रालयानं उच्च शिक्षण क्षेत्रातल्या पंधरा लाख शिक्षकांच्या ऑनलाईन व्यावसायिक विकासासाठी ‘स्वयंम’ या खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात ७५ राष्ट्रीय संसाधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, या केंद्रांना या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी सध्याचे नवे प्रवाह, शैक्षणिक सुधारणा, अभ्यासक्रमाच्या अद्ययावत पद्धतीबाबत माहिती तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. या अभ्यासक्रमा मधून या शिक्षकांना उच्च शिक्षण क्षेत्रातल्या सध्याच्या घडामोडीं बाबत माहिती देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. या राष्ट्रीय केंद्रांमध्ये केंद्रीय, राज्य, खुले विद्यापीठ, तंत्र शिक्षण क्षेत्रातल्या राष्ट्रीय संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.

****



 विकसनशील जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना कृत्रीम बुद्धीमत्तेच्या सहाय्यानं पिकांबाबत वास्तववादी सल्ला देण्यासाठी नीति आयोग आणि आय बी एम कंपनीमध्ये एक करार करण्यात आला. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि आय बी एम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक करण बाजवा यांच्या समक्ष या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात आसाम, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मधल्या १० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर काम करण्यात येणार असून, या प्रकल्पा मध्ये हवामान आधारित माहिती बरोबर शेती तंत्रज्ञान आणि रोगराई बाबत इशारा देणारं तंत्रज्ञान विकसीत करण्यात येणार आहे. 

****



 राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना - एन पी एस च्या सदस्यांना आता उच्च शिक्षण अथवा नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्या खात्यात जमा रकमेपैकी काही भाग काढून घेता येणार आहे. निवृत्ती वेतन कोष आणि विनिमय प्राधिकरणाच्या काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एनपीएस हा सरकारचा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे. भाग भांडवला अंतर्गत ऐच्छिक गुंतवणूक ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करण्यास देखील प्राधिकरणानं मंजूरी दिली आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या याबाबतच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले.

****



 केंद्रीय गृहमंत्रालयानं उत्तराखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. केरळ, आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस पडेल, तर राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 उत्तर रेल्वे, उत्तर-मध्य, उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व रेल्वेची प्रवासी आरक्षण यंत्रणा विद्युत प्रणालीच्या देखभालीकरता आज आणि उद्या एकूण तीन तासांकरता तात्पुरती खंडित केली जाणार आहे. आज पाच मे रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत तर उद्या सहा मे रोजी सकाळी पाच वाजून १५ मिनिटांपासून सहा वाजून २५ मिनिटांपर्यंत ही सुविधा बंद राहील, असं रेल्वे प्रशासनानं नवी दिल्ली इथं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

****



 मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य शासनाची सकारात्मक कारवाई सुरू झाली असल्याचं महसूल मंत्री आणि यासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातल्या, वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं, निम्म शुल्क राज्य शासन, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षणाबरोबरच मराठा समाजातला तरुण व्यवसायात पुढे यावा, यासाठीही राज्य शासनानं तीन योजना आखल्या असून, त्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य मिळावं, यासाठी केंद्राच्या योजनांतून सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात आला आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

****



 न्युझीलंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेत भारतीय बॅडमिंडनपटू बी साई प्रणितला पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज पराभव पत्करावा लागला. आज झालेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीन यानं प्रणितचा पराभव केला. प्रणितनं काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेचा २१ - सात, २१ - नऊ असा पराभव केला होता. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि सुमित रेड्डी यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...