आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
६ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे मुंबईत
राहत्या घरी निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. चार मे १९३४ रोजी मध्य प्रदेशात इंदूर
इथं जन्मलेले दाते यांनी, प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांच्याकडे संगीताचे प्राथमिक
धडे गिरवले. १९५५ मध्ये आकाशवाणीवरून त्यांच्या सांगितिक प्रवासाला प्रारंभ झाला. ६०
च्या दशकात त्यांनी गायलेल्या शुक्रतारा मंद वारा या गाण्याला गानरसिकांचा मोठा प्रतिसाद
मिळाला. याच नावाने त्यांनी भावगीत गायनाचे देश विदेशात सुमारे अडीच हजाराहून अधिक
कार्यक्रम सादर केले. भातुकलीच्या खेळामधली, शतदा प्रेम करावे, अखेरचे येतील माझ्या,
येशील येशील येशील राणी, ही त्यांनी गायलेली इतर गाणीही प्रचंड गाजली. त्यांचे मराठी
तसंच उर्दू भाषेतल्या गाण्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध आहेत.
भावगीत गायनात मानाचा समजल्या जाणाऱ्या पहिल्या गजानन
वाटवे पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी दाते यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या
पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
राज्यातल्या उद्योग क्षेत्रात
महिलांचा वाटा सध्या नऊ टक्के आहे, पुढील पाच वर्षात तो २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासन
प्रयत्न करत असल्याचं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं
“उद्योजकता, महाराष्ट्राचं अर्थकारण आणि व्यापाराच्या संधी” या
विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. महिला उद्योजकांना शासन भांडवल उपलब्ध करून देणार असून, या भांडवलात
राज्य शासन निम्मा वाटा उचलणार आहे, विदेशात उद्योग विषयक प्रदर्शन भरविण्यसाठी महिला
उद्योजकांना ५० लाख रूपयांचं अनुदान शासन देणार आहे, तसंच वीज दरातही सवलत देण्यात
येईल अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश पात्रता चाचणी - एन
ई ई टी 'नीट' आज देशभरात होत आहे. राज्यात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर,
अहमदनगरसह सतरा शहरांमध्ये ही परीक्षा होत आहे.
****
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला बीड जिल्ह्यातल्या
पाटोदा इथला कुस्तीपटू राहुल आवारे याचं काल पाटोदा मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात
आलं. फुलांनी सजवलेल्या रथात बसवून त्याची मिरवणूक काढण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment