Wednesday, 16 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø कर्नाटक विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही; १०४ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा 

Ø ज्येष्ठ लावणी साम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर तसंच प्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचं निधन

Ø पाण्याचं जतन आणि वापर यासाठी जलसाक्षरता आवश्यक - जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांचं मत

Ø मराठवाड्यात काल वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

आणि

Ø उच्च शिक्षणाच्या पुनर्रचनेची गरज, अणूशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्याकडून व्यक्त

*****



कर्नाटक विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. १०४ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनं ७८, धर्मनिरपेक्ष जनता दलानं ३८, तर दोन जागी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षानं, धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा जाहीर केला आहे.



विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, त्यावेळी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला.



भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बी एस येडियुरप्पा यांनीही राज्यपालांची भेट घेऊन, सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या दोन्ही पक्षांनी आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी, राज्यपालांकडे वेळ मागितला आहे.  

****



 बॅकिंग, विमा आणि इतर सेवा क्षेत्रांमध्ये वृद्धीसाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. सेवाक्षेत्रांविषयीच्या एका जागतिक प्रदर्शनाचं उदघाटन काल मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचं प्रमुख केंद्र आहे असं ते म्हणाले. देशभरातली २५ राज्यं आणि शंभर देश या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. राष्ट्रपतींनी काल भाभा अणुसंशोधन केंद्राला भेट देऊन अणू ऊर्जा विभागाच्या दक्षता केंद्रांचं उद्घाटन केलं.

****



 ज्येष्ठ लावणी साम्राणी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं काल सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं वृद्धापकाळानं निधन झालं, त्या १०२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पद्मश्री आणि टागोर रत्न या दोन महत्वाच्या पुरस्कारांसह इतर बावीस राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज वाई इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****



वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करुन देणारे ख्यातनाम चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचं काल पालघर इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. डहाणुतल्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या म्हसे यांना १९७६ मध्ये आदिवासी कलेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं, तसंच २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

****



यमुनाबाई वाईकर तसंच म्हसे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेनं प्रयत्न करणारे निस्सिम कलोपासक आपण गमावले, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****



विधान सभेवर राज्यपाल नियुक्त सदस्य डेसमंड नॉर्मन रॉस येट्स यांनी काल विधान भवनात सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना शपथ दिली.

****



मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दिवंगत अध्यक्षांच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये मंदाताई देशमुख साहित्य पुरस्कार कवी प्रा.दासु वैद्य यांना, डॉ. शैला लोहिया पुरस्कार कवयित्री निशा चौसाळकर यांना, तर डॉ. संतोष मुळावकर पुरस्कार विश्वंभर खराट यांना जाहीर झाला आहे. आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



नद्या जिवंत करूनच पाणीप्रश्न सोडवावा लागेल, पाण्याचे जतन आणि पाण्याचा वापर यासाठी जलसाक्षरता व्हायला हवी असं मत मॅगसेस पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली इथं कयाधू नदी पुनरूज्जीवन संबंधी कार्यशाळेत ते  काल बोलत होते. राज्यात जलसाक्षरतेसाठी शासनानं चार विभागीय जलसाक्षरता केंद्र सुरू केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले..



 जब तक जनमानस के मन में जल की समझ नही होंगी तो जल के महत्त्व को नही समझेगा. और जल की हेल्थ और उसकी खुद की हेल्थ का रिश्ता है. इस रिश्ते को समझकर वो इसका सम्मान नहीं करेंगा तब तक ये काम आगे नही जा सकता. इसलिये उस समझ को बढाने के लिये हम ने जल साक्षरता शुरु की है. इस काम की शिक्षा देने के लिये पूरे महाराष्ट्र में चार जलसाक्षरता केंद्र बनायें है. पहिला है यशदा, फिर है वाल्मी औरंगाबाद, अमरावती रावन्यू ॲकॅडमी, चौथा है फॉरेस्ट ॲकॅडमी चंद्रपूर.

****



मराठवाड्यात काल तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आई आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला. या दोघी, लातूर जिल्ह्याच्या नागरसोगा गावच्या रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातही एका तरुणाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. तिसरी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं घडली, पूर्णा नदीत पोहण्यासाठी उतरलेला तरुण बुडून मरण पावला.



अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातही एका आजी आणि नातवाचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एका आठ वर्षाच्या बालिकेची प्रकृती गंभीर आहे.

****



उच्च शिक्षणाची पुनर्रचना करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ अनिल काकोडकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ काल काकोडकर यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पदवी, पदव्युत्तर तसंच पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना, यावेळी पदवी देऊन गौरवण्यात आलं.

****



औरंगाबाद शहरात चार दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलग्रस्त भागाची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काल पाहणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गुप्तचर खात्यानं यासंबंधी दोन महिन्यापूर्वी माहिती देऊनही, वरिष्ठांनी माहिती दाबली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मुंडे यांनी केली.



दरम्यान, या दंगल प्रकरणी विशेष तपास पथकाच्या पोलिसांनी काल राजेंद्र जंजाळ आणि फिरोज खान या दोन नगरसेवकांना अटक केली. या दोघांना अठरा मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****



राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकविजेत्या मल्लांना उपजीविकेसाठी नोकरी देण्याची व्यवस्था करायला हवी, असं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे यानं म्हटलं आहे. काल लातूर तालुक्यता साई इथं राहुल याचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यानं ही भावना व्यक्त केली. आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते राहुल आवारे याला एक लाख एक हजार रुपयांची थैली आणि मानाचा फेटाबांधून सन्मानित करण्यात आलं.

****

 परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पंडितराव चोखट पाच मतांनी विजयी झाले. चोखट यांना ११ तर विजय जामकर यांना सहा मतं मिळाली. या निवडणुकीत बॅंकेचे संचालक लक्ष्मण गोळेगवाकर हे तटस्थ राहीले. या निवडणुकीसाठी चोखट, जामकर आणि सुरेश वरपुडकर यांनी अर्ज भरला होता.

****



 औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ निपुण विनायक यांनी काल पदभार स्वीकारला. डी एम मुगळीकर यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपण्यात आला होता.



 रम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेचे कनिष्ठ लिपीक विजय पाटील यांनी रस्त्यावर कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे पुंडलिकनगर परिसरात त्यांना मारहाणीचा प्रकार घडला. या संबंधी पाटील यांनी काल पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

****



 औरंगाबाद इथं, प्रतिबंधात्मक कारवाईचा धाक दाखवून सहा हजार रुपये लाच घेणाऱ्या सहाय्यक फौजदार राजेंद्र खंडागळे याला काल अटक करण्यात आली. लाचलुचबत प्रतिबंधक विभागानं काल ही कारवाई केली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...