आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कर्नाटक विधानसभा
निवडणुकीच्या, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न देणाऱ्या निकालानंतर राजकीय हालचालींना
वेग आला असून, भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांच्या
आज बेंगलुरु मध्ये बैठका होत आहेत. भाजपचे नेते बी.एस येडियुरप्पा यांनी काल राज्यपाल
वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. भारतीय जनता पक्ष एकशे चार जागा जिंकत सर्वात मोठा
पक्ष ठरल्यानं आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी, असं येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते एच.डी.कुमारस्वामी
यांनीही राज्यपालांची भेट घेऊन युतीचं सरकार स्थापण्याचा दावा केला. राज्यपालांनी दोन्ही पक्षांना, निवडणूक आयोगाकडून
निकालाची औपचारिक घोषणा होईपर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगितलं आहे.
****
पश्चिम बंगालच्या
वीस जिल्ह्यांच्या पाचशे अडुसष्ठ पंचायत मतदान केंद्रांवर आज पुन्हा मतदान होत आहे.
सोमवारी झालेल्या या निवडणुकी दरम्यान या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याच्या
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पुनर्मतदानाचे आदेश दिले होते. या
निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे.
****
स्वच्छ भारत
उन्हाळी इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
देशभरातल्या लाखो तरुणांना स्वच्छ भारत अभियानाशी जोडून घेणं, हा या योजनेचा उद्देश
असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय
क्रिकेट परिषद आयसीसीच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची ही निवड बिनविरोध झाली. २०१६ साली मनोहर यांनी पहिल्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा
कारभार स्वतंत्रपणे सांभाळला होता. गेल्या काही वर्षांमध्ये मनोहर यांनी जागतिक क्रिकेट
मध्ये बरेच बदल घडवून आणले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्षपद सोपवण्यात
आलं आहे.
****
शेतकऱ्यांना
दिवसा मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनानं ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना‘
ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पथदर्शी प्रकल्प
यवतमाळ तालुक्यातल्या मांजर्डा इथे लवकरच सुरू होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment