Wednesday, 16 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०१ दुपारी १.०० वा.

*****



 भारतीय जनता पक्षाच्या आज बेंगलुरु इथे झालेल्या बैठकीत येडियुरप्पा यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी कर्नाटकची जनता आणि भाजपचे कार्यकर्ते यांना निवडणुकीतल्या यशाबद्दल धन्यवाद दिले आहेत. तर, काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला कर्नाटकच्या जनतेनं नाकारलं आहे, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जनता दल सेक्युलर या पक्षाच्या आजच्या बेंगलुरु इथल्या बैठकीत कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाला मान्यता देण्यात आली. काँग्रेस पक्षाची आजची बैठक सुरू होण्यास अगदी थोडा अवधी उरलेला असतानाही  या बैठकीला पक्षाचे काही आमदार गैरहजर असल्याचं वृत्त आहे.

****

 दरम्यान, या राजकीय हालचालींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, जनादेश काँग्रेसच्या बाजूनं नसतानाही हा पक्ष सत्तेसाठी आटापिटा करत असल्याचा आरोप भाजपनं, तर सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

****

 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्देशांसदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला तत्काळ अटक न करता तक्रारीच्या सत्यतेची शहानिशा करूनच अटक करण्याचे निर्देश न्यायालयानं वीस मार्चला दिले होते. यावर केंद्रसरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

****

 उत्तर प्रदेशात वाराणसी रेल्वे स्थानकाजवळ बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे बीम काल संध्याकाळी कोसळून झालेल्या अपघातात अठरा जण ठार आणि बारा जण जखमी झाल्यानंतर, उत्तर प्रदेश पूल महामंडळाच्या मुख्य प्रकल्प व्यवस्थापकासह चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल रात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली, तसंच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी योगी यांनी नेमलेल्या समितीनं आज घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल केंद्रशासित प्रदेशांमधल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी स्मार्ट सिटी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत अर्थात अटल कायाकल्प  योजना आणि स्वच्छ भारत योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या.

****

 देशात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून २०२२ सालापर्यंत एकशे पंचाहत्तर गिगॅवॉट वीज निर्मितीचं उद्दिष्ट केंद्रसरकारनं ठेवलं असून, यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारत सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली आहे. बदलत्या हवामान स्थितीत अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवण्याची गरज असून, त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असंही या अहवालात म्हटलं आहे.

****

 अटल पेन्शन योजनेला तीन वर्षं पूर्ण झाली असून, या कालावधीत या योजनेचा एक कोटी दहा लाख लोकांनी लाभ घेतला आहे. ९ मे २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. ग्राहकांच्या योगदानानुसार, त्यांना वयाच्या साठाव्या वर्षापासून दरमहा एक ते पाच हजार रुपये निवृत्तीवेतनाची हमी या योजनेत आहे. ग्राहकाच्या पती किंवा पत्नीलाही पुढे हे निवृत्तीवेतन मिळू शकतं. आतापर्यंत या योजनेत ग्राहकांच्या योगदानाचे तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये जमा झाले आहेत.

****

 राज्यातली उष्णतेची लाट काहीशी कमी झालेली असतानाच, विदर्भात आज काही ठिकाणी गडगडाटासह वादळी वारे सुटण्याचा इशारा हवामानखात्यानं जारी केला आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...