Thursday, 17 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ मे २०१ सकाळी .५० मि.

*****

Ø कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी एस येडियुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Ø छत्तीस हजार पदांची भरती करण्यास राज्य सरकारची मान्यता

Ø राज्यातल्या चार विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर 

Ø राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत परभणी शहर ‘नागरिकांचा प्रतिसाद’ या श्रेणीत सर्वोत्कृष्ट

आणि

Ø शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे निर्देश

*****



 कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते बी एस येडियुरप्पा यांना शपथ घेण्यापासून थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती ए के सिकरी, न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठानं, आत्ता पहाटे हा निर्णय दिला. कनार्टकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी, येडियुरप्पा यांना सत्ता स्थापन करण्यासाठी काल आमंत्रण दिलं, त्या विरोधात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल जेडीएसनं काल रात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मध्यरात्री दोन वाजेनंतर सुरू झालेल्या सुनावणी दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी,  आजचा नियोजित शपथविधी पुढे ढकलून, येडियुरप्पा यांना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्यास सांगावं, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयानं शपथविधीस स्थगिती देण्यास नकार दिला, मात्र येडियुरप्पा यांच्यासह सर्वच पक्षकारांना यावर उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या सकाळी होणार आहे.



 येडियुरप्पा आज सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांना पंधरा दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

****



 प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत, सूक्ष्म सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्ड मार्फत पाच हजार कोटी रुपये देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेमध्ये पुरवठा केंद्रक उभारण्यासाठी एक हजार तीस कोटी रुपयांच्या निधीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. जैव इंधन धोरण २०१८ ला आणि होमिओपॅथी परिषदेसंदर्भातल्या अध्यादेशाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****



 राज्य शासनातल्या छत्तीस हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. कृषी क्षेत्राचा विकास, तसंच ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती.

****



 सार्वजनिक प्रकल्पांसाठीच्या जमीन संपादनाला वेग देण्यात येणार असून, शासकीय जमिनींवर  ताबा असणाऱ्यांनी या जमिनी सोडाव्यात, यासाठी मोबदला म्हणून पर्यायी भूखंड किंवा एक सदनिका किंवा सदनिकेच्या बांधकामासाठीचा खर्च, देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला.

****



 पर्यावरण हा विषय प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिकवल्यास, मुलांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती वाढीस लागेल, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते काल मंत्रालयात आयोजित राज्य पर्यावरण सेवा योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. पर्यावरण सेवा ही योजना राज्यातल्या ६ प्रशासकीय विभागातल्या, आणि प्रदुषित १२ जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. त्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

 मिशन शौर्य, या धाडसी उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या देवाडा आणि जिवती इथल्या आदिवासी आश्रमशाळांमधले उमाकांत मडावी, परमेश आले, मनीषा धुर्वे आणि कविदास काठमोडे या चार विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. आणखी दोन विद्यार्थी येत्या दोन दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील, अशी अपेक्षा आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. मराठवाड्यातलं परभणी शहर ‘नागरिकांचा प्रतिसाद’या श्रेणीत उत्कृष्ट ठरलं आहे. या स्पर्धेत सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले असून, नागपूर, बृहन्मुंबई, नवी मुंबई, भुसावळ सह राज्यातली ९ शहरं स्वच्छ ठरली आहेत. यातल्या ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार तर ३ शहरांना विभाग स्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे.

****



 शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख, अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. औरंगाबाद तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकानं काल थेट संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. या पथकानं औरंगाबाद जिल्ह्यात गाढे जळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातल्या डोंगरगाव कवाड आणि पाथरी तसंच जालना जिल्ह्यात जाफ्राबाद आणि भोकरदन तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी काल संवाद साधला .

****



 कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या हिवर्डा कालवा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना, भरपाई देण्याची प्रक्रिया, जलद गतीनं राबवण्यात यावी, अशी सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल रावते यांची भेट घेतली. या ३६ गावातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७५ कोटी रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

****



 जालना जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीपैकी ७३ टक्के जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ६८५ शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यासाठी आजपर्यंत ३५२ कोटी ९६ लाख रुपये देण्यात आले असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. व्ही. अरगुंडे यांनी दिली. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****



 नांदेड जिल्ह्यात वनविभागाचा निवृत्त लिपिक आणि त्याच्या पत्नीविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम पांचाळ असं या निवृत्त कर्मचाऱ्याचं नाव असून, त्याच्याकडे ७७ लाख ७१ हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली. सेवाकाळातल्या उत्पन्नापेक्षा १०५ टक्के अधिक मालमत्ता पांचाळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आढळल्यानं, काल ही कारवाई करण्यात आली.

****



 हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हट्टा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सिध्दोधन जोंधळे याला दहा हजार रुपये लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ पकडलं. अपघातातल्या ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्या साठी जोंधळे यानं लाचेची मागणी केली होती. हट्टा पोलीस ठण्यातच ही कारवाई करण्यात आली

****



 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल परभणी जिल्ह्यात पीक विम्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू आदी भागात सुमारे दोन तास हे आंदोलन करण्यात आलं.

****



 राज्यातले बंद पडलेले साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी आणि नळेगाव इथले साखर कारखाने येत्या तीन महिन्यात सुरु होतील असं जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल सांगितलं. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. हे कारखाने सुरु व्हावेत याकरीता आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात यावी अशा सूचना सहकार मंत्री  देशमुख यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २१९ लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी १५ पूर्णांक ९२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमधल्या फक्त ११ खाजगी विहीरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.

****



 दरम्यान, उस्मानाबाद सह लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काल पावसाच्या सरी कोसळल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग तालुक्यात अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाचं वृत्त आहे. 

****



 परभणी जिल्ह्यात जिंतूर नजिक खडकपाटी इथं बस आणि दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...