आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भाजप नेते बी एस येडियुरप्पा यांनी आज तिसऱ्यांदा
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि
गोपनियतेची शपथ दिली. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला १५ दिवसांची मुदत
दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ १०५ वर पोहोचलं
आहे, त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी सात आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, येडियुरप्पा यांना शपथ घेण्यापासून थांबवण्यास
नकार देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात, तसंच येडियुरप्पा यांच्या
शपथविधीच्या निषेधार्थ काँग्रेसनं कर्नाटन विधानभवनाबाहेर निदर्शनं केली.
****
दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला
निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक शहरात मध्यरात्री
अडीच वाजता शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल,
केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
****
रमजानच्या उपवासाचा महिना
आजपासून देशभरात सुरु झाला. चंद्रदर्शन झाल्याचं जाहीर होताच मुस्लिम बांधवांनी
काल रात्री मशिदीमध्ये जाऊन विशेष प्रार्थना अदा केली. इफ्तारच्या
खरेदीसाठी स्थानिक बाजारांमध्ये गजबज वाढली आहे. रमजान
हा इस्लामी दिनदर्शिकेतला नववा महिना असून, या
महिन्याच्या अखेरीला ईद-ऊल-फित्र साजरी केली जाते. अरब
देशामध्ये देखील आज रमजानचा पहिला दिवस आहे.
****
ग्रामीण
भागातल्या पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचं जीवनमान
उंचावेल, तसंच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असं कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत एक दिवसीय
परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची पारंपरिक कृषी पध्दती जपून कृषी
पर्यटनाला वाव देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
*****
***
No comments:
Post a Comment