Tuesday, 15 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 15 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं काँग्रेस पक्षानं, संयुक्त जनता दलाला पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, १०२ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनं ७३, संयुक्त जनता दलानं ३८, तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. काँग्रेसनं पाठिंबा दिल्यामुळे संयुक्त जनता दलाचं सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जेडीएससोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगिलतं. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी थोड्या वेळापूर्वीच राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. 

दरम्यान, संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर भाजप पुढची रणनीति ठरवेल, असं पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

****

लोकपालच्या नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची एक विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. रोहतगी यांच्या नियुक्तीबाबत ११ मे रोजी निर्णय घेण्यात आल्याचं महान्यायवादी के के वेणुगोपाल यांनी सांगितलं.

****

बॅकिंग, विमा आणि इतर सेवा क्षेत्रांमध्ये वृदधीसाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. सेवाक्षेत्रांविषयीच्या एका जागतिक प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचं प्रमुख केंद्र आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. सेवाक्षेत्राच्या विकासाकरता सरकार जागतिक व्यापार संघटनेबरोबर चर्चा करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. देशभरातली २५ राज्यं आणि शंभर देश या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रपतींनी आताच थोड्या वेळापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्राला भेट देऊन अणू ऊर्जा विभागाच्या दक्षता केंद्रांचं उद्घाटन केलं.

****

ज्येष्ठ लावणी साम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं आज सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं वृद्धापकाळानं निधन झालं, त्या १०२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पद्मश्री आणि टागोर रत्न या दोन महत्वाच्या पुरस्कारांसह इतर बावीस राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या वाई इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेनं प्रयत्न करणारा एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला, सं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  

****

औरंगाबाद शहरात चार दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलग्रस्त भागाची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गुप्तचर खात्यानं यासंबंधी दोन महिन्यापूर्वी माहिती देऊनही, वरिष्ठांनी माहिती दाबली, अस आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मुंडे यांनी केली.

दरम्यान, या दंगल प्रकरणी पोलिसांनी आज शिवाजीनगरचे शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे शिवाजीनगर आणि टीव्ही सेंटर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या परिसरातल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ आज झाला. शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पदवी, पदव्युत्तर तसंच पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत पदव्या प्रदान करण्यात आल्या.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पंडितराव चोखट पाच मतांनी विजयी झाले. चोखट यांना ११ तर विजय जामकर यांना सहा मतं मिळाली. या निवडणुकीत बॅंकेचे संचालक लक्ष्मण गोळेगावकर हे तटस्थ राहीले. या निवडणुकीसाठी चोखट, जामकर आणि सुरेश वरपुडकर यांनी अर्ज भरला होता.

****

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातल्या निमखेड आणि पिंपळखुटा महादेव, देऊळगाव राजा तालुक्यातल्या गोंधनखेड, सिंदखेडराजा तालुक्यातल्या सावरगांव माळ, बुलडाणा तालुक्यातल्या दत्तपूर आणि मोताळा तालुक्यातल्या भोरटेक इथल्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरता टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकरनं केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी, नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी, निविदाधारकानं टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावं, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...