Wednesday, 16 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.05.218 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत, सूक्ष्म सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्ड मार्फत पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेमध्ये पुरवठा केंद्रक उभारण्यासाठी एक हजार तीस कोटी रुपयांच्या निधीलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. जैव इंधन धोरण २०१८ ला आणि होमिओपॅथी परिषदेसंदर्भातल्या अध्यादेशाला आजच्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****

राज्य शासनातल्या छत्तीस हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. कृषी क्षेत्राचा विकास, तसंच ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती.

या भरतीमध्ये कृषी, पशुसंवर्धन, जलसंपदा, जलसंधारण, गृह, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास विभागांमधली रिक्त पदं प्राधान्यानं भरण्यात येणार आहेत.

****

सार्वजनिक प्रकल्पांसाठीच्या जमीन संपादनाला वेग देण्यात येणार असून, शासकीय जमिनींवर ताबा असणाऱ्यांनी या जमिनी सोडाव्यात, यासाठी मोबदला म्हणून पर्यायी भूखंड किंवा एक सदनिका किंवा सदनिकेच्या बांधकामासाठीचा खर्च, देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला.

****

जालना जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीपैकी ७३ टक्के जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ६८५ शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यासाठी आजपर्यंत ३५२ कोटी ९६ लाख रुपये देण्यात आले असल्याची माहिती, रस्ते विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए.व्ही.अरगुंडे यांनी दिली. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या गुंतवणुकदारांची सुमारे चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी उद्योसमूहाच्या पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या दीड हजार कोटी रुपयांच्या एकशे चोवीस मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांची २७१ बँकखाती गोठवण्यात आली असून शेहेचाळीस आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत. सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुलकर्णी दांपत्याची चौकशी पूर्ण झाल्याबरोबर कोल्हापूर पोलिस त्यांना ताब्यात घेणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

‘मिशन शौर्य’ या धाडसी उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या देवाडा आणि जिवती इथल्या आदिवासी आश्रमशाळांमधले उमाकांत मडावी, परमेश आले, मनीषा धुर्वे आणि कविदास काठमोडे या चार विद्यार्थ्यांनी आज माऊंट एव्हरेस्ट सर केलं आहे. आणखी दोन विद्यार्थी येत्या दोन दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील अशी अपेक्षा आहे. दहा आदिवासी विद्यार्थी या मोहिमेवर गेले आहेत.

****

पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सहून जास्त रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि इतर सतरा जणांवर आज मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये चोकसीवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हट्टा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सिध्दोधन जोंधळे याला १० हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज रंगेहाथ पकडलं. अपघातातल्या ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्यासाठी जोंधळे यानं लाचेची मागणी केली होती. हट्टा पोलीस ठण्यातच ही कारवाई करण्यात आली.

****

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज केलेल्या चोवीस उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता अठरा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येत्या अट्ठावीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीसाठी, निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी ठेवल्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी विशेष अभियान राबविलं जाणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...