Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 17 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
आजपासून
सुरु झालेल्या रमजान महिन्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा
दिल्या आहेत. सुसंवाद, दया आणि दानाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या मोहम्मद पैगंबरांचं
स्मरण करण्याचा हा महिना असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. रमजान
हा इस्लामी दिनदर्शिकेतला नववा महिना असून, या महिन्याच्या अखेरीला ईद-ऊल-फित्र साजरी
केली जाते.
****
पर्यावरण
मंत्रालयानं आज नऊ समुद्र किनाऱ्यांवरच्या राज्यांमध्ये किनारे, नद्या आणि आसपासचा
परिसर तसंच तलाव स्वच्छ करण्यासाठी १९ गट तयार केले आहेत. हे गट स्वच्छतेच्या कामात
त्या त्या परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी करुन घेणार असल्याचं, मंत्रालयानं
यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक गटाला १० लाख
रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
आयुर्वेदिक
उपचार घेण्यासाठी भारतात येणाऱ्या रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासंदर्भात
आणि त्यांना भारतात येण्यासाठीचे अडथळे दूर करण्यासाठी वाणिज्य, उद्योग विभाग आणि आयुष
मंत्रालय एकत्रितरित्या उपाययोजना करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग विभागाचे सहसचिव
सुधांशू पांडे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज भारतातल्या आयुर्वेद क्षेत्रातील गुंतवणूक
आणि वैद्यकीय सेवा प्रवास मूल्य या विषयावर सेवाविषयक जागतिक प्रदर्शनात आयोजित चर्चासत्रात
ते बोलत होते. आयुर्वेदासंदर्भातील सर्व शिक्षणक्रम विद्यापीठाअंतर्गतच सुरू रहावेत
आणि त्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, या संदर्भात प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी
सांगितलं.
****
मुंबई
कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातली महत्त्वाची बाजारपेठ असून, इथल्या बाजार
समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे
निर्देश सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले आहेत. मुंबई इथं आज व्यापाऱ्यांच्या
समस्यांबाबत देशमुख यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
महाराष्ट्र
साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ यंदा लोकसाहित्य
आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक डॉ.प्रभाकर मांडे यांना जाहीर झाला आहे.
रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २७ मे रोजी परिषदेच्या
एकशे बाराव्या वर्धापनदिन समारंभात डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ.गो.बं.देगलूरकर यांच्या
हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी
आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यातल्या
बौद्ध समाजासाठी ‘बौद्ध मंगल परिणय कायद्या’चा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टीच्या संकेतस्थळावर एक महिन्याकरता
प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना
असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याचं आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या अपर सचिवांनी
केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात लोहा तालुक्यातील ३६ गावातल्या कापूस पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे
नुकसान झालेल्या नऊ हजार ४७१ शेतकऱ्यांना पावणे तीन कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात
जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तातडीनं अर्थिक मदत देण्यात लोहा तालुका हा नांदेड
जिल्ह्यात अव्वल ठरला असल्याची माहिती तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी दिली.
****
हिंगोलीचे
जिल्हाधिकारी अनिक भंडारी यांनी आज हिंगोली तालुक्यातल्या सावा आणि चोरजवळा या गावात
जलयुक्त शिवार अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. ही कामं निकृष्ट दर्जाची
करण्यात आल्याचं, तसंच नाला बांधमध्ये पिचिंग आणि खोलीकरणाचं काम व्यवस्थित झालं नसल्याचं
यावेळी निदर्शनास आलं. ही कामं करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून त्याचे देयक
अदा न करण्याचे, तसंच शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्यानं संबंधित अभियंत्यावर कार्यवाही
करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
****
धुळे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सार्वजनिक बांधकाम विभागातल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याविरुध्द
अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिनकर पाटील असं त्यांचं नाव असून,
१९७८ ते १९९१ या कालावधीत स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे ज्ञात स्त्रोतांपेक्षा ६५ पूर्णांक
१५ टक्के इतकी अपसंपदा धारण केल्याचं चौकशीत समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
दक्षिण
कोरियामधल्या दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेच्या महिला हॉकी
सामन्यांमध्ये भारतानं आज मलेशियाचा तीन-दोन असा पराभव केला. या स्पर्धेतला हा भारताचा
तिसरा विजय असून, भारतीय संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. यापूर्वीच्या
सामन्यात भारतीय संघानं चीनचा तीन-एक असा, तर जपानचा चार-एक असा पराभव केला होता.
****
No comments:
Post a Comment