Friday, 18 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.05.2018 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ मे २०१ सकाळी .५० मि.

****

·      कर्नाटक सरकार स्थापनेबाबत आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी.

·      सिंचन विहीरी तसंच फळबाग लागवड योजनेचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.

·      यंदाचा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.प्रभाकर मांडे यांना जाहीर.

·      लातूर-उस्मानाबाद-बीड या विधान परिषदेच्या निवडणुकीत पूर्ण खबरदारी - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश.

****

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या सत्ता स्थापनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना, राज्यपालांनी, कमी संख्याबळ असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, याविरोधात या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, न्यायालय आज या संदर्भात भाजपसह इतर पक्षकारांची बाजूही ऐकणार आहे. भाजपनं संख्याबळाच्या दाव्यावर राज्यपालांकडे सादर केलेलं, सत्ता स्थापनेच्या दाव्याचं पत्र, सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीरी तसंच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी आता थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित दोन दिवसीय बैठकीनंतर ते काल बोलत होते. या आधी सिंचन विहीरीसाठीच्या साहित्य खरेदीची रक्कम संबंधित विकेत्याला, तर फळबाग लागवडीचा निधी हा रोपवाटिकेला दिला जात होता, मात्र आता हा निधी शेतकऱ्यांना मिळेल, असं रावल यांनी यावेळी सांगितलं. राज्यभरात सध्या ७६ हजार विहीरींचं बांधकाम सुरू असून, ते लवकरच पूर्ण करण्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलं.

****

पर्यावरण मंत्रालयाच्या जलस्रोत स्वच्छता मोहिमेत शाळा तसंच महाविद्यालयांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. या मोहिमेत किनारपट्टीलगतच्या नऊ राज्यांमध्ये समुद्र किनारे, नद्या आणि तलाव स्वच्छ केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी प्रत्येक गटाला १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पाच जूनपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत महाराष्ट्रातल्या कृष्णा, मुळा-मुठा या नद्या तसंच गणपती पुळेसह दोन समुद्र किनारे स्वच्छ केले जाणार आहेत.

****

राज्यातल्या बौद्ध समाजासाठी ‘बौद्ध मंगल परिणय कायद्या’चा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या संकेतस्थळावर एक महिन्याकरता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याचं आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या अपर सचिवांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक, संशोधक डॉ.प्रभाकर मांडे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या २७ मे रोजी पुण्यात, परिषदेच्या एकशे बाराव्या वर्धापनदिन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

लातूर-उस्मानाबाद-बीड या विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वकीयांकडून धोका होणार नाही, यासाठी खबरदारी घेत असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या उपाध्यक्ष माजी खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष पूर्णपणे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत असेल, असं रजनी पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

‘श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानां’तर्गत येणाऱ्या गावांचा एकत्रित कृषि विकास आराखडा तयार करुन ही गावं स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या आहेत. या अभियानाच्या नियामक समितीची बैठक काल औरंगाबाद इथं घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाळूज, जोगेश्वरी, घाणेगांव, एकलहरा आणि कासोडा या ५ ग्रामपंचायतींसह एकूण १२ गावांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. गावांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं चौधरी यांनी यावेळी नमूद केलं.

****

हिंगोली तालुक्यात सावा आणि चोरजवळा या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत चार सिमेंट नाला बांधाची कामं, निकृष्ट दर्जाची झाल्याचं आढळलं आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी काल केलेल्या पाहणीत ही बाब निष्पन्न झाली. ही कामं करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावं तसंच त्याचं देयक अदा करु नये, किंवा देयक अदा केलेलं असल्यास वसूल करुन घ्यावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या नऊ हजार ४७१ शेतकऱ्यांना पावणे तीन कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तातडीनं अर्थिक मदत देण्यात लोहा तालुका हा नांदेड जिल्ह्यात अव्वल ठरला असल्याची माहिती तहसिलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावानं नुकसान झालेल्या भोकरदन तालुक्यातल्या बाभुळगाव आणि सिपोरा बाजार, तसंच जाफ्राबाद तालुक्यातल्या बोरगाव या गावातल्या शेतकऱ्यांशी काल केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. भोकरदन, जाफ्राबाद भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते, परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावानं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती तिन्ही गावातल्या शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

****

लातूर शहराला दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी काल जलशुद्धीकरण केंद्रावर नेऊन ही बाब स्पष्ट केली. जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेतून पाणी नमुने तपासून घेण्यात आले असून, सदरील पाणी रंगीत असलं तरी दूषित नाही, असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

****

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. मराठवाड्यातलं परभणी शहर ‘नागरिकांचा प्रतिसाद’ या श्रेणीत उत्कृष्ट ठरलं आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधितांचं अभिनंदन केलं आहे. या यशासाठी महापालिकेच्या वतीनं संबंधित अधिकारी, कर्मचारी, यांचा सत्कार करण्यात आला.

****

नांदेड शहरात, माळटेकडी परिसरात असलेल्या फळ भाजीपाला बाजारासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली आहे. महापालिकेनं या परिसरातलं अतिक्रमण काढल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी केली होती.

****

लातूर इथल्या सुरताल संगीत महाविद्यालयात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा ११८ वा वर्धापन दिन साजरा झाला. संगीतोपासक पंडित शांताराम चिगरी गुरुजींचा यावेळी मंडळाचे सचिव पंडित पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. चिगरी गुरुजींनी आपला सुमारे साडे सहा हजार चौरस फुटाचा भूखंड गांधर्व महाविद्यालय मंडळास दिला आहे.

****

कर्नाटकात भाजपनं सरकार स्थापन केल्याच्या निषेधार्थ नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते बारा या वेळेत हे आंदोलन होणार आहे.

****

जालना महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यशासन आणि महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन आज संध्याकाळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. २२ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सार्वजनिक बांधकाम विभागातल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याविरुध्द अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिनकर पाटील असं त्यांचं नाव असून, १९७८ ते १९९१ या कालावधीत स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे ज्ञात स्त्रोतांपेक्षा ६५ पूर्णांक १५ टक्के इतकी अपसंपदा धारण केल्याचं चौकशीत समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

येत्या २४ मे पासून ७ जूनपर्यंत देशभरात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालवधीत होणाऱ्या विविध उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केलं आहे. पीक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेणं तसंच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे या मोहिमेचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...