Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 19 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
जम्मू
काश्मीरमध्ये भरकटलेल्या तरुणानं फेकलेला प्रत्येक दगड आणि उगारलेलं प्रत्येक हत्यार
हे राज्य आणि देशाला अस्थीर करत असून राज्यानं या परिस्थितीमधून आता बाहेर यायला हवं,
असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. किशनगंजमध्ये ३३० मेगावॅटच्या ऊर्जा प्रकल्पाचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जम्मू आणि काश्मीरमधील विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे धोरण, ध्येय आणि निर्णय घेण्याची क्षमता असल्याचं
पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
कर्नाटकचे
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी बहुमत शक्तीपरीक्षापूर्वीच राजीनामा दिला आहे.
तत्पूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात त्यांनी, कर्नाटकच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला
सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल आभार मानले आणि बहुमत चाचणीला सामोरं न
जाता राजीनामा देत असल्याची घोषणा केली. काँग्रेस आणि जनता दलाला जनतेनं नाकारलं, तरीही
ते चुकीच्या पद्धतीनं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी
केला. निवडणूक निकालानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला प्रथम सत्ता स्थापनेसाठी
आमंत्रित केलं होतं.
****
विद्यापीठ
अनुदान आयोग - युजीसीनं देशभरातली सर्व विद्यापीठं आणि उच्च शैक्षणिक संस्थांना, त्यांच्या
परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. भारत यंदाच्या जागतिक
पर्यावरण दिन समारंभाचा यजमान असून, प्लास्टिक प्रदुषणावर मात करणं, ही या दिनाची संकल्पना
असल्याचं पत्रक केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं जारी केल्यानंतर युजीसीनं हा निर्णय
घेतला. प्लास्टीक मग, ताटं, वाट्या, जेवणाची पाकिटं, बाटल्या, स्ट्रॉ अशा वस्तूंना
परिसराच्या आत वापरण्यास बंदी घालण्यासंर्भात युजीसीनं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना
पत्र पाठवलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यापीठांनी विविध उपक्रम राबवावेत,
असंही युजीसीनं सांगितलं आहे.
****
राज्यातल्या
धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळण्याबाबत योजना जाहीर करण्यात
आली आहे. वार्षिक ८५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना मोफत उपचार तसंच दुर्बल
घटकातल्या व्यक्तींसाठी सवलतीच्या दरात उपचार मिळणार आहेत. मुंबईच्या सहाय्यक धर्मादाय
आयुक्तांनी ही माहिती दिली.
****
‘गाळमुक्त
धरण आणि गाळयुक्त शिवार’ या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात एक
हजार ९६३ धरणातून एक पूर्णांक चार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून, सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या
शेतात मोफत गाळाचा पुरवठा करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली
स्थापन करण्यात आलेल्या समितीनं सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. येत्या
३१ मेपर्यंत सुमारे दोन हजार धरणांमधून गाळ काढला जाणार असल्याचं, प्रधान सचिव आय.एस.चहल
यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
शहरात गेल्या आठवड्यात उसळलेल्या दंगलीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आज मोर्चा काढण्यात
आला. पैठण गेट इथून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार होता, मात्र पोलीस
प्रशासनानं या मोर्चाला गुलमंडी इथं अडवत हा मोर्चा शहरातल्या सरस्वती भूवन शिक्षण
संस्थेच्या प्रांगणात विसर्जित केला. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील
एका शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर
यांना दिलं.
****
लातूर
जिल्ह्यात चाकूर इथल्या केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात
आज ४३४ प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ पार पडला. प्रशिक्षण केंद्रातल्या शिवाजी
महाराज परेड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात चंदीगडचे उपमहानिरीक्षक कमलनयन चौबे
हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणार्थींनी ४४ आठवड्याच्या मूलभूत
प्रशिक्षणासोबतच शारीरिक क्षमता, अत्याधुनिक शस्त्र चालवणं, आंतरिक सुरक्षा, मानवाधिकार
कायदे यांचं सुध्दा प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं केंद्राचे महानिरीक्षक संजीव भनोट
यांनी सांगितलं.
****
आपत्ती
व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं नांदेडचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत
ते बोलत होते. संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय आणि
तत्परतेनं प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
दक्षिण
कोरियामधल्या दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत
आज भारत आणि यजमान दक्षिण कोरिया संघांमधला सामना एक - एकनं बरोबरीत सुटला. या स्पर्धेचा
अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण कोरिया संघांदरम्यानच होणार आाहे. पाच देशांच्या
या स्पर्धेत भारत दहा गुणांसह पहिल्या क्रमांकावर, तर दक्षिण कोरिया आठ गुणांसह दुसऱ्या
क्रमांकावर आहे.
****
No comments:
Post a Comment