Saturday, 5 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 5 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात कुपोषणाला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत आदिवासी भागातल्या ३०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार एका याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं कुपोषणावर मात करण्यासाठी काही दिशानिर्देश जारी केले होते. त्याच्या अंमलबजावणीबाबतही न्यायालयानं आज राज्य सरकारकडे विचारणा केली. मेळघाट आणि नंदुरबार सारख्या आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आणि डॉक्टरांची संख्या याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ छत्ताबल परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या तीन झाली आहे. आज सकाळी ही चकमक झाली. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली, त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक अधिकारीही जखमी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमधली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आज सकाळी हा हल्ला झाला.

****

वनेत्तर क्षेत्रातल्या वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आलं असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात एक जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी राज्यातल्या अध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या मुंबई इथं झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी यावेळी केलं. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात वनेत्तर क्षेत्रात २७३ चौरस किलोमीटरची वाढ झाली असून, याचं सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद तालुक्यातल्या बेंबळी इथं महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं तीन आरोपींना २२ वर्ष सक्तमजुरी, तर एका आरोपीला २७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आणि प्रत्येकी ५२ हजार रुपये दंड ठोठावला आहे. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. 

****

औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय वाहतूक विभागाच्या वतीनं २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत राबवण्यात आलेल्या वाहतूक संरक्षण जनजागृती पंधरवड्याचा आज विविध कार्यक्रमांनी समारोप करण्यात आला. यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजुला रुग्णवाहिका, अग्निशामक, पोलीस वाहन, ग्रीन कॅरीडॉरसाठी सोडण्यात येणाऱ्या आपत्कालानी मार्ग - इमर्जन्सी लेनबाबत जनजागृती करणाऱ्या फलकाचं उद्घाटन, वैद्यकीय तपासणी शिबीर, हेल्मेट तपासणी शिबीर आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तसंच शहरात हेल्मेट जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या पंधरवड्यात नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात आली असून, इमर्जन्सी लेन संदर्भात वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे द्यावेत आणि बोंडअळीचे अनुदान मिळावं या आणि अन्य मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. तसंच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सुमारे दोन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उल्हास माने याला आज कर्जत तालुक्यात अटक करण्यात आली. पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे यांनी ही माहिती दिली. या हत्या प्रकरणानंतर तो फरार होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. माने याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जामखेड इथं गेल्या महिन्यात योगेश आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

****

बीड जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्यामुळे उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आल्या आहेत. उष्माघातापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना हाती घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...