Wednesday, 19 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 तिहेरी तलाक संबंधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मान्यता दिली. संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनांपासून हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलेलं नाही. या मुद्यावर आपण काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विधेयक संमत होऊ शकलं नाही, असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं.

****



 राफेल लढाऊ विमान खरेदी करार करताना पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमीटेड तसंच भारतीय वायुसेनेचं हित लक्षात घेतलं नाही असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. त्या नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या. वरिष्ठ कॉग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी सरकार राफेल कराराविषयीची माहिती दडवत असल्याचा आरोप सीतारामन यांनी फेटाळून लावला.

****



 ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात दुबईतल्या न्यायालयानं कथित दलाल क्रिश्चियन मिशेलच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. तीन हजार ६०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तपासणीच्या आधारे, भारतानं अधिकृतरित्या यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार काल न्यायालयानं हे आदेश दिले. जून २०१६ मध्ये संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात मिशेलनं जवळपास २२५ कोटी रुपये मिळवल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, तपास यंत्रणांकडून मिशेलविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी करण्यात आली होती.

****



 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून नेहमीच दूर राहिला असून, सरकारच्या कारभारात संघानं कधीही ढवळाढवळ केली नाही, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.  `भविष्यातला भारत - संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर संघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या तीन दिवसी व्याख्यान मालिकेतलं दुसरं पुष्प गुंफताना ते काल बोलत होते. संपूर्ण समाजाचं एकत्रीकरण करणं, हे संघाचं ध्येय, असून संघ स्वयंसेवकाला राजकीय पक्षात जबाबदारी दिली जात नाही, या कडे सरसंघचालकांनी लक्ष वेधलं.

****



 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्मन्न दुप्पट करण्यास कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उदयपूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. मृदा आरोग्य पत्रिका आणि पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ, यासारख्या शेतकरी कल्याणकारी योजना सरकार राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 भाभा अणुसंशोधन केंद्राचे महानिदेशक नीलकंठ व्यास यांची अणु ऊर्जा विभागाचे सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०२१ पर्यंत या पदावर काम करतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****



 दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून बँक खात्यांची माहिती प्राप्त न झाल्यानं, दूध दरासाठीच्या अनुदानापोटी आलेला सुमारे २२५ कोटी रुपये निधी शासकीय पातळीवर वितरणाअभावी पडून आहे. राज्य सरकारनं गेल्या एक ऑगस्टपासून दूध उत्पादक तसंच दूध भुकटी कारखान्यांना लीटरमागे पाच रुपये अनुदान जाहीर केलं आहे.



 हे अनुदान संबंधितांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार असल्यानं, संबंधितांनी आपल्या बँक खात्याची माहिती जमा करण्याचं आवाहन दुग्धविकास विभागाकडून करण्यात आलं आहे.

****



 राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंधराव्या वित्त आयोगाचं पथक आज आपल्या दौऱ्याच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. काल या पथकानं विविध राजकीय पक्ष आणि उद्योग समुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

****



 मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उद्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं नवोदित कथालेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे. कथालेखनाचं तंत्र - परंपरा आणि प्रयोग, तसंच कथा सुचण्यापासून लिहिण्यापर्यंत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

****



 आकाशवाणी औरंगाबाद केंद्र आज आपला ४२ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आकाशवाणी औरंगाबाद केंद्र आपली विश्वासार्हता जपून असल्याचं, अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून म्हटलं आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल स्पर्धेत काल भारतानं पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा २६ धावांनी पराभव केला.

****



 स्लोव्हाकियात ट्रन्वा इथं सुरु असलेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या साजन भानवालनं ७७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...