Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२
ऑक्टोबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
डिसेंबर
२०१९ अखेरपर्यंत राज्यातल्या ग्रामीण भागात सर्वांना घरं देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§
प्लॅस्टिक
बंदीचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्याविरूद्ध कारवाई करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाचे निर्देश
§
राफेल
विमान खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली नसल्याचं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं स्पष्टीकरण
आणि
§
महात्मा
गांधी जयंती निमित्त देशभरात आदरांजली, स्वच्छ भारत दिवसाचं आयोजन
****
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्य उघड्यावर शौचापासून
मुक्त झाल्यानंतर आता सर्वांसाठी घरं उपलब्ध करून देण्याऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेवर
लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत राज्यातल्या ग्रामीण भागात
सर्वांना घरे मिळतील यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं. दिल्लीत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत ‘स्वच्छ
भारत अभियान आणि शाश्वत विकास’ या विषयावर काल ते बोलत होते. आतापर्यंत ग्रामीण भागात
४ लाख घरं बांधण्यात आली असून सध्या ६ लाख घरं बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे
पाठवला आहे. येत्या वर्षात आणखी दोन लाख घरं बांधण्यास मंजुरी घेऊन डिसेंबर २०१९ पर्यंत
१२ लाख घरं बांधण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ या देशव्यापी
सर्वेक्षणामध्ये राज्यातल्या सातारा जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला असून सोलापूर
आणि नाशिक या जिल्ह्यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे. आज नवी दिल्ल्ली इथं होणाऱ्या
कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव केला जाणार
आहे. तर सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांना केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री उमा
भारती यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे अशी माहिती स्वच्छता तसंच पाणीपुरवठा मंत्री
बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना दिली. भारत सरकारच्या पेयजल
आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण - २०१८ या
अंतर्गत सर्व जिल्ह्यांचं गुणांकन करण्यात आलं होतं.
दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियानामध्ये सर्व समाज घटकांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही लोणीकर यांनी यावेळी केलं.
****
या वर्षीचा पावसाळा संपल्याचं भारतीय हवामान खात्यानं
घोषित केलं असून, यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या एक्क्याण्णव टक्के इतक्या पावसाची
नोंद झाल्याचं जाहीर केलं आहे. हा पाऊस सर्वसाधारण श्रेणीच्या खालच्या श्रेणीचा असल्याचंही
हवामान खात्यानं म्हटलं आहे. पावसाळा संपला असला तरीही महाराष्ट्र आणि गोव्यात या आठवड्यात
पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
राज्यात असलेल्या प्लॅस्टिक बंदीचं उल्लंघन करून
अशा वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्याविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळानं आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या
प्लॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मुदत परवा संपल्यानंतर
मंडळानं हे निर्देश जारी केले आहेत. यावर्षीच्या २३ मार्चला राज्य सरकारनं प्लॅस्टिकच्या
वापरावर बंदी घोषित केली होती आणि ती २४ जूनपासून लागू झाली होती.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची बाजू घेतली नसल्याचं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार
यांनी फ्रान्सकडून ही विमाने खरेदी करताना देशाची लूट झाल्याचं सांगितलं. बीड इथं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात ते काल बोलत होते. यासंदर्भात सरकारनं राफेल
विमानांची किमत ६५० कोटी रूपयांवरून १६०० कोटी रूपयांपर्यंत कशी पोहोचली याबाबत संसदेत
माहिती द्यावी, अशी मागणी करत, बोफोर्स खरेदीवर टीका करणारे राफेल खरेदी बाबत गप्प
का आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला. अलिकडेच
पवार यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणा संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या हेतूबाबत लोकांना
शंका नसल्याचं वक्तव्य केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट
केली.
राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरल्याची टीकाही
पवार यांनी मेळाव्यात बोलतांना केली.
****
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती तसंच शेतकऱ्यांच्या
समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी आजपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं बेमुदत
उपोषण करणार आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आज महात्मा गांधी यांची जयंती. आजचा दिवस ‘स्वच्छ
भारत दिवस’ म्हणून पाळण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं
आयेाजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रभात फेरी, विविध शाळा-महाविद्यालयांच्या वतीनं
स्वच्छता रथ, तसंच विविध पक्ष संघटनांच्या वतीनं स्वच्छते संबंधी उपक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही
देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतिनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून संपूर्ण राज्यभर स्वच्छता पदयात्रेचं आयोजन
करण्यात आलं आहे, येत्या ३० जानेवारी पर्यंत ही पदयात्रा सुरू रहाणार असून राज्यातल्या
२८८ मतदारसंघात प्रत्येक रविवारी पक्षाचे कार्यकर्ते
दहा किलोमीटर पर्यंत पदयात्रा काढत स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती पक्षाचे
प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. आज
या पदयात्रेचं उद्धाटन होणार आहे. औरंगाबाद शहरातल्या पूर्व, पश्चिम, आणि मध्य मतदारसंघात
ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.
****
दरम्यान, गांधी जयंतिनिमित्त सुटी असल्यानं आज औरंगाबाद
शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय- घाटीचा बाह्यरूग्ण विभाग बंद
रहाणार आहे.
****
परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं,
या प्रमुख मागणीसाठी खासदार संजय जाधव यांनी सुरू केलेल्या सर्वपक्षीय आंदोलनाच्या
चौथ्या टप्प्यात कालपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात
आलं. या आंदोलनाचे धरणे, विद्यार्थ्यांचा घेराव आणि महिलांचं निवेदन, हे तीन टप्पे
याआधी पार पडले आहेत. या आंदोलनाची दखल घेत, शासनानं यासंदर्भातली पाहणी करण्यासाठी
नुकतीच एक समिती परभणीत पाठवली होती, आणि ही समिती लवकरच आपला अहवाल शासनाला सादर करणार
आहे, मात्र, महाविद्यालय मंजूर होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं जाधव यांनी
सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
राज्यात जास्तीत जास्त शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकरी पीकांचा विमा काढून नैसर्गिक संकटांमुळे
होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करत आहेत. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या पेठशिवणी
गावचे रहिवासी सुरेश शिनगारे यांनीही गेल्यावर्षी पिक विमा घेतला होता. ऐकू या त्यांचा
याबाबतचा अनुभव
मी सुरेश शिनगारे.
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या पेठशिवणी या गावचा रहिवासी आहे. प्रधानमंत्री
पीक विमा योजने अंतर्गत सन २०१७ या खरीप हंगामात पिक विमा भरला होता. पाऊस कमी पडल्यामुळे
शेती पिकाचे नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मला नुकसान भरपाई पोटी १६हजार
रूपयांचा लाभ झाला. हे सर्व ह्या योजनेमुळे झाले. त्या बद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार.
****
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन काल देशभर साजरा
करण्यात आला. वृद्ध जनांच्या मानवाधिकारांना आणि मूलभूत स्वातंत्र्याला प्रोत्साहन
देण्याबाबतची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी एक ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला
जातो. या वर्षी या दिवसाचं घोषवाक्य ‘मानवाधिकारांचे अग्रदूत वृद्धजन‘ असं होतं. या
दिनानिमित्त बीडच्या गोपिका ज्येष्ठ नागरिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
डॉक्टर द्वारकादास लोहिया आणि मेळघाटात आदिवासींसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते
डॉ रवी कोल्हे यांना प्रदान करण्यात आला.
नांदेड इथं
जिल्हा रूग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी अणि उपचार शिबीर घेण्यात
आलं. लातूर इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
ज्येष्ठांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचं सांगितलं.
****
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते काल जिल्ह्यातल्या धारूर आणि वडवणी तालुक्यात
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं डिजिटल भूमिपूजन धारूर इथं करण्यात आलं. यात धारुर तालुक्यातल्या आठ आणि वडवणी
तालुक्यातल्या १९ कामांचा समावेश आहे. या योजनेंअतर्गत जिल्ह्यात ३५० कामं मंजूर करण्यात आली असून त्यासाठी
७८१ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेत रेल्वेनं काही एक्सप्रेस
गाड्यांना काही स्थानकांवर थांबे देण्याचा तसंच काही गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय
घेतला आहे. यामध्ये, नांदेड ते पनवेल विशेष गाडीला गंगाखेड इथं तर ओखा-रामेश्वरम एक्सप्रेसला नंदुरबार इथं थांबा देण्यात आला आहे.
सध्या हे थांबे सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत. तसंच, नांदेड-मुंबई-नांदेड, तिरुपती-शिर्डी-तिरुपती
आणि मनमाड-धर्माबाद-मनमाड या गाड्यांमध्ये प्रत्येकी एक डबा येत्या एक नोव्हेंबरपर्यंत
वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
लातूर इथं येत्या ७ तारखेला राज्य शासनाच्या वतीनं
अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगानं
सहा तारखेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातर्फे रूग्णांची 'प्राथमिक पूर्वतपासणी करण्यात येणार
आहे. नागरीकांनी जवळच्या दवाखान्यात पूर्व
तपासणी करून घ्यावी यावी असं आवाहन लातूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment