Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v शहरांच्या शाश्वत विकासासाठी महापालिकांनी उत्पन्नाचे स्त्रोत
निर्माण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
v प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न केल्याबद्दल, महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळाला एक कोटी रूपयांचा दंड
v राज्य दिव्यांग कल्याण धोरण लवकरच जाहीर केलं जाणार- सामाजिक
न्याय मंत्री राजकुमार बडोले
v ऊसाला पहिली उचल, एक रकमी २ हजार ९२८ रूपये प्रतिटन देण्याची,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
आणि
v तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजकडून
४३ धावांनी पराभव.
*****
महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण
करुन, शहरांच्या शाश्वत विकासावर भर द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. नागपूर इथं काल अठराव्या महापौर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत
होते. २ हजार ३० पर्यंत इलेक्ट्रीक वाहन किंवा जैव इंधनावर आधारीत दळणवळण व्यवस्था
आणल्यास, शहरांचं प्रदूषण कमी होईल. सांडपाणी आणि दळणवळण व्यवस्थेच्या अभावी शहरांचं
वातावरण दूषित झालं असून, कमी कार्बन उत्सर्जन करणारी व्यवस्था उभी करणं आवश्यक असल्याचं
ते म्हणाले. यापुढे शहरांना कचरा साठवण्यासाठी जागा मिळणार नाही, मात्र घनकचरा व्यवस्थापन
प्रक्रिया उभारण्यासाठी जागा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या ग्रामीण भागातल्या बचत गटांच्या महिलांनी
तयार केलेल्या वस्तुंचं प्रदर्शन, आता थेट अमेरीकेत होणार आहे. यात विशेष करुन वारली उत्पादनं, हस्तकला
उत्पादनं, महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र, खाद्य संस्कृती, हातमाग इत्यादींचा समावेश असेल. राज्यातली बचत गटाची चळवळ ही आता फक्त बचती पुरती मर्यादीत
राहीली नसून, या चळवळीतून अनेक महिला लघुउद्योजक पुढे येत आहेत, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दौऱ्याविषयी
माहिती देताना सांगितलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि फिक्कीनं
हा दौरा आयोजित केला आहे.
****
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांचं
पालन न केल्याबद्दल, राष्ट्रीय हरित लवादानं, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला
एक कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा निधी येत्या एक नोव्हेंबरच्या आधी पर्यावरणाच्या
पुनर्वसनासाठी केंद्रीय प्रदुषण मंडळाकडे जमा करावयाचा आहे. राष्ट्रीय हरित लवादानं
प्रदूषणासाठी कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांनाही प्रत्येकी पाच लाख रूपयांचा दंड आकारला
आहे.
****
राज्यातल्या
सर्व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्य दिव्यांग कल्याण धोरण जाहीर केलं जाणार असल्याची
माहिती, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लातूर इथं काल दिव्यांगासाठीच्या दोन दिवसीय
कार्यशाळेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते.
दिव्यांगाना विविध साहित्य पुरवठा करणं, त्यांच्यासाठी योजना आखणं, याबरोबरच समाजात
दिव्यांग व्यक्ती निर्माण होऊ नये, यासाठी राज्यात शिघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु
केली जाणार असून, लातूरसाठी ही एक केंद्र मंजूर
करत असल्याचं बडोले यांनी यावेळी जाहीर केलं.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शिरुर ताजबंद इथं बडोले यांच्या हस्ते दिव्यांगाना
कृत्रिम अवयव साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
आगामी उसाच्या गळीत हंगामामध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी
शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिली उचल, एक रकमी ३ हजार १२७ रूपये, आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी, २ हजार ९२८
रूपये प्रतिटन दिल्याशिवाय एकही कारखाना सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या
जयसिंगपूर इथं सतराव्या ऊस परिषदेत ते बोलत होते. शेट्टी यांनी यावेळी ऊसदराचा सूत्रबद्ध
हिशोब मांडला, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारखानदार, शेतकरी संघटनेचे नेते यांची बैठक
बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या, ‘मन की
बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४९ वा भाग आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून जायकवाडीत
पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र या भागात दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा निळवंडे
धरणातून जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका काल अकोले तालुका शेतकरी संघर्ष
समितीच्या वतीनं घेण्यात आली. अकोले तहसील कार्यालयात काल संघर्ष समिती, पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, आमदार वैभव पिचड, डॉ अजित नवले यांच्यात झालेल्या
चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू
नये, या मागणीसाठी काल अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
****
नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी
धरणात सोडण्यात येत असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त
डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातल्या
धरण समुहातल्या जलाशयामधलं पाणी पैठण धरणात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत ते
काल बोलत होते. या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याचं
आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारच्या ‘सबके लिए सस्ते बल्ब - उजाला योजने’च्या माध्यमातून
एल ई डी बल्बची विक्री होते. या बल्बमुळे वीज बिलात कपात होऊन सामन्यांना दिलासा मिळत
आहे. सातारा जिल्ह्यातले रहिवासी दत्तात्रय सुपेकर यांनी वीज वितरण कंपनीकडून एलईडी
बल्ब खरेदी केले. या बल्बच्या वापरानं आपल्या वीज बिलात मोठी कपात झाली असल्याचं त्यांनी
सांगितलं. ते म्हणाले –
माझे स्वताःचे घर असून, त्यात विविध प्रकारचे बल्ब,
टूब लाईट मी वापरतो. त्यांच्या वापरामूळे मला दर महिन्याला वर्षमाठ बिल येत होते. केंद्र
सरकारच्या उन्नती योजनेची माहिती मला मिळाली. त्यात अत्यंत अल्प दरात एलईडी बल्ब देण्यात
येत असल्याचे समजले. त्यानुसार आधार कार्ड, भरलेले विजबिल घेऊन एम.ई.सी.बी मधून ते बल्ब घेतले. या बल्बाच्या आर्फरामुळे मला आता फारच
कमी विज बिल येत आहे. या योजनेमुळे माझ्या खर्चात कपात झाली आहे.
****
दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याचं पाणी आणि जनावरांना
चारा देण्यास शासनाचा अग्रक्रम असून, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना
करण्यात येणार असल्याचं, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी काल औरंगाबाद
इथं सांगितलं. दुष्काळ निवारणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यातल्या टंचाई निवारणाबाबतचा जून २०१९ पर्यंतचा आराखडा तयार असल्याचं ते म्हणाले.
पालकमंत्र्यांनी काल जिल्ह्यातल्या सटाणा, देवणी
वाहेगाव, जटवाडा, गाढे जळगाव ,ओहर, धोपटेश्वर या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद
साधला.
****
जालना इथं काल ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला
सुरूवात झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात
यांनी संमेलनाचं उद्धाटन केलं. यावेळी बोलताना थोरात यांनी, दलित, आदिवासी तसंच इतर
मागासवर्गीय या समाजातल्या मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहातून रोखण्यासाठी
नोकऱ्यांचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून आरक्षणाला मूठमाती देण्याचं काम सध्याच्या
सरकारकडून होत असल्याची टिका यावेळी केली.
****
‘अनंत भालेराव
स्मृती पुरस्कार’ सुप्रसिद्ध चित्रपट -नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना आज
औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार आहे. शहरातल्या
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम
होईल. ५० हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप
आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुणे इथं खेळल्या गेलेल्या, तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात,
काल वेस्ट इंडीजनं भारताचा ४३ धावांनी पराभव केला. प्रारंभी फलंदाजी करत वेस्ट इंडीजनं
भारतासमोर जिंकण्यासाठी २८४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ २४० धावातचं
तंबूत परतला. पाच सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडीजनं १-१ अशी बरोबरी केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काल या मालिकेत सलग तिसऱ्यांदा शतक झळकावलं.
****
लातूर इथं
सात ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या, अटल महाआरोग्य शिबीराच्या दुसऱ्या
टप्प्यात, एकूण सात हजार ४०० रुग्णांवर
शस्त्रक्रिया करण्याचं काम येत्या डिसेंबर
अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहेत. काल लातूर इथं आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्यांकडून जिल्ह्यातल्या दुष्काळसदृश परिस्थितीचीही
माहिती घेतली.
****
गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणारे तलाठी, विठ्ठल
शेळके यांच्यावर अवैध वाळू वाहतुकदरांनी कोयते तसंच लाकडानं प्राणघातक हल्ला केला.
त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गोळेगाव
इथं काल ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीं विरोधात औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment