Monday, 29 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ देण्याला नकार देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला, सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. यासंदर्भात राज्यशासनानं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही स्थगिती दिली असून, या प्रकरणातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं, या प्रकरणातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यां विरोधातला तपास अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांना जास्त वेळ घेण्याची अनुमती देण्याचा, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय नुकताच रद्द केला होता. राज्य पोलिसांनी पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना केलेल्या अटकेमध्ये दखल देण्याला, तसंच त्यांच्या अटके संदर्भात विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या मागणीलाही सर्वोच्च न्यायालयानं  याआधीच नकार दिला आहे.

****



 अयोध्येतल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद विवादातल्या जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातल्या, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.या याचिकांची तत्काळ सुनावणी घेणार नसल्याचं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

****

 भारतात उद्योग उभारण्यासाठी कमी पैशात मनुष्यबळ उपलब्ध असतं आणि भांडवलही कमी लागतं, यासाठी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज टोक्यो इथे मेक इन इंडिया चर्चासत्रात बोलत होते. ईझ ऑफ डुईंग बिझिनेस धोरणासह अन्य धोरणांमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारत ही सगळ्यात खुली अर्थव्यवस्था असल्याचं नमूद करत, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ताज्या यादीत भारताचं स्थान एकतीस क्रमांकांनी वर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****



 गुजरातमध्ये नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवरा समोर उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी - देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्या भोवती व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अर्थात वैविध्यपूर्ण फुलांचं उद्यान बनवण्यात येणार आहे. गुजरात सरकारचा वनविभाग या परिसरात शंभरहून जास्त प्रजातींचे वृक्ष, वनस्पती आणि हिरवळ लावणार आहे. जगातला सर्वात उंच पुतळा ठरलेल्या, सरदार पटेल यांच्या या पुतळ्याचं येत्या परवा एकतीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

****



 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पन्नासावी पुण्यतिथी आहे. अंधश्रद्धा आणि जातिभेद निर्मूलनासाठी खंजिरी भजन आणि कीर्तनाचा तुकडोजी महाराजांनी प्रभावी वापर केला. भारत हा खेड्यांचा देश असल्यानं, ग्रामविकास झाला तर राष्ट्रविकास होईल, अशी विचारसरणी असलेल्या आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रसंताचं समाजाच्या सर्वच स्तरातून आज स्मरण केलं जात आहे.

****

 बुलडाणा जिल्हयाच्या खामगाव शहरात डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. यासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात शहरातल्या ४८१ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली. डेंग्यूचा प्रसार होऊ नये, यासाठी या परिसरात आरोग्य विभागानं डास निर्मुलनासह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

****



 मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, या आणि इतर मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि सर्व शिक्षक संघटनांच्या औरंगाबाद विभाग शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं, येत्या दोन नोव्हेंबरला शैक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. पात्र शाळांना नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्यात यावं, सुधारित शिक्षकेतर आकृतीबंध लावण्यात यावा, सर्व विद्यार्थ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देऊ नये, आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

****



 देशभरात आजपासून दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनसामान्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा वाढावा, असा उद्देश यामागे असून, भ्रष्टाचाराचं निर्मूलन, नवभारताची निर्मिती, अशी या सप्ताहाची संकल्पना आहे. शासनाचे विविध विभाग, बँका आणि इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधी प्रतिज्ञेनं या सप्ताहाची सुरुवात होत आहे.

****



 भारत - वेस्ट इंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला, चौथा सामना आज मुंबईत ब्रेबॉर्न क्रीडा संकुलावर होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत, उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून, एक सामना बरोबरीत सुटला आहे.

*****

***

No comments: