Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
कोणत्याही सजीवाला न दुखवणे, हा अहिंसेचा अर्थ आहे,
असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मांगीतुंगी
इथं, तीन दिवस चालणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्त
आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. जैन धर्म आपल्याला निसर्गाशी कसं वागायचं याची शिकवण
देतो असं राष्ट्रपती म्हणाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे हे आहेत. उद्घाटनप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. बागलाण
तालुक्यातल्या भिलवाड गावाजवळ असलेल्या मांगीतुंगी गडाच्या पायथ्याशी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान
श्री ऋषभदेव यांची एकशे आठ फुटी मूर्ती साकारण्यात आली आहे. या तीर्थक्षेत्रावर साध्वी
ज्ञानमती माताजी यांनी हे संमेलन आयोजित केलं आहे.जागतिक महत्त्व प्राप्त झालेल्या
या सोहळ्याला जगभरातून भाविक आले आहेत.
****
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, राज्य
शासनाच्या नियोजित जल आराखड्यामध्ये मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटप करण्याची मागणी
मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे. औरंगाबाद इथं आज मराठवाड्यातल्या
सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. वेळ पडल्यास यासाठी
तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. सध्या उर्ध्व धरणांमधून अकरा दशलक्ष घनफूट
पाणी तात्काळ जायकवाडी धरणात सोडण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली. मराठवाड्याला पुरेसं
पाणी मिळावं, यासाठी एक जल आराखडा शासनाला सादर करणार असल्याची माहिती आमदार प्रशांत
बंब यांनी दिली.
संयुक्त महाराष्ट्रात राहून अन्याय होत असेल, तर
स्वतंत्र मराठवाड्याची मागणी का करू नये, असा प्रश्न नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी
केला, तर पाण्याच्या प्रश्नासाठी येत्या विधीमंडळ अधिवेशनात आंदोलन करणं गरजेचं असल्याचं
मत औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान, नगर आणि नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्याला
पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
जायकवाडी धरणात उतरून आंदोलन केल्याचं वृत्त आहे.
****
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक
जिल्ह्यातल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची एक शिखर संस्था स्थापन करण्याचं आवाहन वस्त्रोद्योगमंत्री
सुभाष देशमुख यांनी केलं आहे. रेशीम उद्योगासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत
होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकरही उपस्थित होते. महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योगाशी संबंधित काम करण्याचा
अधिकार तहसीलदारांऐवजी रेशीम उद्योग विभागाला देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून, पुंज निर्मितीसाठी प्रतिकिलो पन्नास रुपये तर रेशीम सूत निर्मितीसाठी प्रतिकिलो दीडशे रुपयांऐवजी अडीचशे रुपये अनुदान देण्याच्या
रेशीम उत्पादकांच्या मागण्यांवरही यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
****
येत्या नऊ नोव्हेंबरला, भाऊबिजेच्या दिवशी राज्य
शासनानं सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्य सरकारी कार्यालयं, राज्य
शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती
आणि ग्रामपंचायत कार्यालयं यादिवशी बंद राहतील.
****
भंडारा जिल्ह्यातल्या काही भागात कमी पाऊस झाल्यामुळे
झालेल्या धान पिकांच्या नुकसानाची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पाहणी केली.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाला देत,
प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
****
आगामी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून
लढवणार असल्याची माहिती भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर
यांनी दिली आहे. ते आज परभणीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युतीसंदर्भात एम आय एम पक्षाशी
चर्चा झाली, मात्र काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
//***********//
No comments:
Post a Comment