Wednesday, 31 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटनीति आणि शिवाजी महाराजांच्या शौऱ्याचा संगम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वोच्च पुतळ्याचं, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यावर, विविध संस्थानं भारतात विलीन करून घेतली. आज आपण कच्छपासून कोहिमापर्यंत आणि कारगीलपासून कन्याकुमारी पर्यंत विनाअडथळा भ्रमण करू शकतो, त्याचं संपूर्ण श्रेय सरदार पटेलांना असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.



 कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरदार पटेल यांचा हा १८२ मीटर उंच भव्य पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.



 या पुतळ्याच्या परिसरात साकारण्यात आलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - पुष्पवाटिका तसंच वॉल ऑफ युनिटी - एकता भिंतीचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशभरातल्या विविध ठिकाणाहून आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर एक भारत श्रेष्ठ भारत हे वाक्य सतरा भारतीय भाषांमधून लिहिलेलं आहे.



 देशभरातून आलेल्या कलापथकांनी यावेळी देशाचं सांस्कृतिक वैविध्य दर्शवणारी नृत्यं सादर केली. सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला, देशभरातल्या विविध नद्यांचं जल तसंच पुष्प अर्पण करून, पंतप्रधानांनी या त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधून या सर्वोच्च पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

****



 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी देशभरात 'एकता दौड'चं आयोजन केलं जातं. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौड 'रन फॉर युनिटी' ला सुरुवात झाली.



 क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत आयोजित या एकता दौडमध्ये, लहान मुलांसह युवक-युवती तसंच अनेक नागरिक सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. महावीर चौक इथं एकता दौडचा समारोप झाला, विजेत्या स्पर्धकांचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

****



 भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं देशभरात ५३ शहरांमध्ये आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवर आधार नोंदणी आणि सुधारणा करण्यात येईल, असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भुषण पांडेय यांनी सांगितलं. पारपत्र सेवा केंद्रांच्या संकल्पनेवर आधारीत आधार सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना सहजरित्या आधारसंबंधी सेवा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 भारत आणि फ्रान्स यांच्यादरम्यान झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात विमानाची किंमत उघड करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं दहा दिवसात सादर करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या कराराविषयीची धोरणात्मक तसंच गोपनीय माहिती उघड करता येणार नाही, मात्र सार्वजनिक करता येईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी, असे निर्देशही सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती यु यु ललित आणि के एम जोसेफ यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १४ नोव्हेंबरला होणार आहे.

****



 नवी दिल्लीत काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि  विकास परिषदेची १९ वी बैठक झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक सद्य परिस्थिती आणि आर्थिक क्षेत्राच्या कामगिरिचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. चालू व्याजदर, सद्य स्थितीतली आर्थिक तरलता,  म्युच्युअल फंड आणि नॉन बँकिंग आर्थिक कंपन्यांमधल्या वित्तीय तरलतेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. या सर्व आर्थिक परिस्थितीवर नियंत्रक आणि केंद्र सरकार जातीने लक्ष ठेवून असेल तसंच आवश्यक ती पावलं उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, तसंच प्रतिभूती आणि नियामक महामंडळ - सेबीसह अन्य नियामक मंडळांचे अध्यक्ष तसंच वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

*****

***$F8B7D50A-C9BE-4C04-839F-1D0C7D00C1E5$ 

No comments: