Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राज्यातल्या
बचत गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर
स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल, तसंच बचतगटांना उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात
प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर
इथं आज राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशाच्या
उत्पन्नात महिलांचा वाटा असल्याखेरीज देश पुढे जाणार नाही, अर्थव्यवस्थेला चालना देण्याची
प्रमुख भूमिका बजावू शकतात, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं महिलांसाठींच्या वेगवेगळ्या
योजनांना आतापर्यंत ४२ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
आगामी
लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आज कार्यकर्ता
मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना सत्तेत राहून सरकारकडून जनतेची कामं करुन घेत असून,
आम्हाला सत्तेची हाव नाही, असं ते म्हणाले. राज्यभरात कार्यकर्ता मेळावे घेणार असल्याचंही
त्यांनी जाहीर केलं.
****
ऊस
उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर द्यावा, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं
आहे. सोलापूर इथं आज साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी परवाना देण्याबाबतच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना गाळप
परवाना देऊ नये, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्यामुळे या सूचनांचं साखर कारखान्यांनी
पालन करावं, असंही त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडुंशी
संवाद साधला. पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी एकाग्रतेनं कठोर मेहनत करण्याचं
आवाहन त्यांनी खेळाडुंना यावेळी केलं. सरकार खेळाडूंना पूर्ण मदत आणि सुविधा उपलब्ध
करुन देईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. या खेळाडुंनी आपापल्या गावात जाऊन मुलांना
खेळण्यासाठी प्रेरित करावं, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
बेनामी
व्यवहार कायद्याअंतर्गत खटल्यांच्या सुनावणीसाठी ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले
सत्र न्यायालयं, विशेष न्यायालयं म्हणून काम करतील, अशी अधिसूचना केंद्र सरकारनं जारी
केली आहे. बेनामी संपत्ती देवाणघेवाण प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानंतर विशेष न्यायालयांना ही अधिसूचना जारी केल्याचं सरकारनं
सांगितलं आहे.
****
आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत एका महिन्याच्या आत देशातल्या एक लाख लोकांनी गंभीर
आजारांसाठी उपचार घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी म्हटलं आहे.
या योजनेमुळे गरिबांचा उपचाराच्या खर्चाचा भार कमी झाल्याचं नड्डा यांनी ट्विटरवर म्हटलं
आहे. मध्य प्रदेशातल्या रिवा शहरातले एक ४६ वर्षीय रुग्ण या योजेनेचा एक लाखावा लाभार्थी
असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
जैन
धर्मीयांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातल्या
मांगीतुंगी इथं उद्या विश्वशांती अहिंसा संमेलन होणार असून, त्याचं उद्घाटन राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रंथाचं
प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होईल, तसंच मुरादाबाद इथल्या तीर्थंकर महावीर विश्व
विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला
जाणार आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी आज पाहणी केली. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे
करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाईल, असं लोणीकर यावेळी म्हणाले. रोजगार हमी
योजनेतून जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी भोकरदन
इथं आयोजित बैठकीत दिले.
****
८३
टक्के कोरडवाहू क्षेत्रातल्या कृषी उत्पादनात शाश्वतता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश
असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्यानं
बाजी मारली आहे. बुलडाणा जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं.
त्यापैकी चार हजार ८०० शेततळ्यांचं काम पूर्ण झालं असून, २०० शेततळ्यांचं काम प्रगतीपथावर
आहे.
****
डेन्मार्क
ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
महिला एकेरीच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात तैवानच्या ताई त्झू यिगनं सायनाचा पराभव
केला.
****
No comments:
Post a Comment