Thursday, 25 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø जायकवाडी धरणासाठी, नाशिक जिल्ह्यातल्या तीन धरणांमधून उद्यापासून पाणीविसर्ग

Ø २०२२ पर्यंत सगळ्या कृषी पंपांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Ø आशा कार्यकर्त्यांचा दैनंदिन भत्ता २५० रुपयांवरुन ३०० रुपये

आणि

Ø दुष्काळाच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका

****



 औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणासाठी, नाशिक जिल्ह्यातल्या तीन धरणांमधून उद्यापासून पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा  प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशानुसार नाशिक मधल्या गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून साडे तीन दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

     

 पाणी सोडण्याच्या या निर्णयाविरोधात नाशिकमधले भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर आज विचार करण्यात येईल, असं न्यायालयानं काल सांगितलं.



दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीनं काल नाशिक शहरातल्या रामकुंड इथं गोदावरी नदीत उतरून आंदोलन करण्यात आलं.

****



 ठाणे जिल्ह्यातल्या नद्या आणि दमणगंगेचं पाणी समुद्राला जिथे मिळतं, तिथे खाडीचं पाणी अडवून, प्रकल्प उभारण्याचं नियोजन असून, येत्या दोन आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं, कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. या प्रकल्पाचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येईल, त्यामुळे नाशिक आणि अहमदनगरमधल्या धरणांसह मराठवाड्यातलं जायकवाडी धरणही पूर्ण भरेल आणि पाण्यावरून होणारे वाद टळू शकतील, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

****



 हवामान आधारित शेतीसाठी, उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन दुप्पट करण्यासाठीचा खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पवई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. डिजीटल उपाययोजना शेतीसाठी वरदान ठरू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

****



 २०२२ पर्यंत संपूर्ण सगळ्या कृषी पंपांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावबकुळे यांनी सांगितलं. पुणे इथं काल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - महाऊर्जा मुख्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन बावबकुळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.  सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे. येत्या वर्षभरात सुमारे सात लाख ५० हजार कृषी पंपांना या योजनेद्वारे वीज पुरवठा सुरु होणार आहे, असं ते म्हणाले.

****



 राज्य सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रीमात वाढ करण्यात आली आहे. आता या कर्मचाऱ्यांना साडे बारा हजार रूपये इतकं अग्रीम मिळू शकेल.

****



 आशा कार्यकर्त्यांचा दैनंदिन भत्ता २५० रुपयांवरुन ३०० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्लीत काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली.



 सात हजार ५०० कोटी रुपयांच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधीलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

     

 शाश्वत विकास उद्दिष्टाच्या देखरेखीसाठी राष्ट्रीय निदर्शक आराखड्याचा कालबध्द रितीने आढावा घेण्यासाठी आणि पुनर्रचना करण्यासाठी एका उच्चस्तरीय सुकाणू समितीच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.



 बेनामी व्यवहार प्रतिबंध अधिनियमातर्गंत निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण तसंच अपिल प्राधिकरण स्थापन करण्याला आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर भारतीय कौशल्य संस्थांची स्थापना करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मूग आणि उडदाची हमी भावानं विक्री करण्यासाठी करावयाच्या नोंदणीला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत नजिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यासाठी नोंदणी करता येईल, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती  दिली.

****



 मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातले नसल्यानं त्यांना दुष्काळाचं दुःख कळत नाही, म्हणूनच राज्यात दुष्काळ नाही तर दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी टीका काँग्रेस समितीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा तसंच दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात करताना लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या पहिल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते. दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे निधीची कमतरता असल्यानं सरकार दुष्काळ जाहीर करत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.



 तत्पर्वूी काल सकाळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून काल या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली. यावेळी वार्ताहरांशी बोलतांना चव्हाण यांनी सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना सुरु करण्याची मागणी केली. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

****



 अरबी समुद्रात मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट, खडकावर आपटून अपघात झाला. या एका तरुणाचा मृत्यू झाला. नियोजित शिवस्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी ही बोट चालली होती, अपघातानंतर हा कार्यक्रम काल स्थगित करण्यात आला.

****



 प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या महिलांना मिळत असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. पालघर मधल्या आंबेडकर नगर इथल्या लाभार्थी रेखा गायकवाड यांनी या योजने अंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळालं असल्याचं सांगितलं. याविषयी त्यांचा अनुभव ऐकूयात….



उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मला भेटलेला आहे. आणि अगोदर मी चुलीवर जेवण करत होत, सकाळी लवकर उठायला  लागायचं,  चुलीवर जेवण करूण मला सगळ आवरूण कामावर जायला लागायचं. मुलांना त्रास व्हायचा, धुर व्हायचा घरामध्ये, सकाळची झोप पूर्ण नाही व्हायची. आता ही सरकारने योजना दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. तीपण मोफत आहे. त्यामुळे मला पैसे पण नाही खर्च करावे लागले. काहीच नाही.

****

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी शेत रस्ते, शेत तळे, विहीरी पुनर्भरण अशी कामं प्राधान्यानं करावीत. याचा जनतेला लाभ होईल असं, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पाटील यांनी मानवत, पाथरी, सोनपेठ, परभणी तालुक्यातल्या शेतातील पिकांची पाहणी केली.

****



 लातूर शहराला दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या यांत्रिकी कामासह महत्वाकांक्षी मलनिस्सारण प्रकल्पाला लातूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल असा विश्वास स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी व्यक्त केला आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड नगरपरिषदेचा स्वच्छता निरीक्षक नंदकिशोर चव्हाण याला तेवीस हजार रुपये लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. स्वच्छता कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदाराच्या चार महिन्यांचं वेतन अदा करून देण्यासाठी चव्हाण यानं ७३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २३ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना त्याला पकडण्यात आलं.

****



 औरंगाबाद इथल्या उस्मानपुरा भागात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एक महाविद्यालयीन तरूणी जागीच ठार झाली. वैभवी खिरड असं मृत तरूणीचं नावं असून ती आपल्या दुचाकीवरून महाविद्यालयात जात असतांना हा अपघात झाला.

****



 औरंगाबाद इथं आज मराठा विकास मंडळाच्या वतीनं चार दिवसीय राज्यस्तरीय उद्योग महाएक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी अकरा वाजता शहानूरमियाँ दर्गाजवळ श्रीहरी पॅव्हीलियन इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या महाएक्स्पोचं उद्घाटन होणार आहे.

*****

***

No comments: