Saturday, 20 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमध्ये ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्ये मतमोजणीसाठीची व्यवस्था केली आहे. या मतमोजणीत तीन हजारांहून अधिक उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये १३ वर्षानंतर या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका घेण्यात आल्या आहेत.

****



 पंजाबध्ये अमृतसर जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे पंजाब राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अमृतसरपासून दोन किलोमीटर अंतरावर जोडा फाटकाजवळ काल दोन रेल्वे रुळांवर उभं राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना पठाणकोट- अमृतसर रेल्वे आणि हावडा जलदगती रेल्वेनं चिरडल्यामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ७२ जण जखमी झाले. अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष मंत्रीगट नेमला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंग बदनोर आणि इतर नेत्यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

****



 अधिकारी आणि कर्मचारी यांनी परस्पर समन्वयानं काम करुन जनतेची सेवा करावी आणि विकासात आपलं योगदान द्यावं असं आवाहन माहिती संचालक यशवंत भंडारे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या भूजल उपसंचालक सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. कार्यालयातल्या  सौहार्दपूर्ण वातावरणामुळे उद्दिष्टं पूर्ण होण्यास मदत होते, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यात पावसाअभावी वाढ न झालेल्या खरीप पिकांची काल पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पाहणी केली. दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी कांबळे यांना देण्यात आलं.

*****

***

No comments: