Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंजाबमध्ये
अमृतसरजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेप्रकरणी, याठिकाणी दसऱ्याचा कोणता कार्यक्रम आयोजित
केल्याची पूर्वसूचना आयोजकांकडून रेल्वे विभागाला मिळाली नव्हती, असं रेल्वे मंडळाचे
अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी म्हटलं आहे. हा अपघात अमृतसर आणि मानवाला स्थानकांदरम्यान
झाला असून, रेल्वे क्रॉसिंगवर झाला नसल्यामुळे त्याठिकाणी पुर्वसूचना देण्यासाठी कोणता
कर्मचारी नसतो, असं त्यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. रेल्वे गाड्या
त्यांच्या निश्चित वेगानुसार धावतात, त्यामुळे नागरिकांनी रेल्वेरुळावर उभं राहणं अपेक्षित
नसल्याचंही ते म्हणाले. अमृतसरपासून दोन किलोमीटर अंतरावर जोडा फाटकाजवळ काल दोन रेल्वे
रुळांवर उभं राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना पठाणकोट-अमृतसर रेल्वे
आणि हावडा जलदगती रेल्वेनं चिरडल्यामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ७२ जण जखमी झाले.
या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अर्धन्यायिक चौकशी करण्याचे आदेशही
दिले आहेत.
दरम्यान,
रेल्वे विभागावर किंवा मोटरमनवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं रेल्वे राज्यमंत्री
मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.
****
छत्तीसगढ
मधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत
तीन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक झाली, या ठिकाणाहून पोलिसांनी तीन रायफल
हस्तगत केल्या.
****
समन्यायी
पाण्याचं वाटप करून मराठवाड्याच्या पाण्याची तूट भरून काढण्यासंदर्भात मराठवाड्यातल्या
लोकप्रतिनिधींची येत्या २२ ऑक्टोबरला औरंगाबाद इथं बैठक होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
गंगापूर मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही
माहिती दिली. मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आत्महत्या
करत आहेत. सद्य:स्थितीत मराठवाड्यातल्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी वरील धरणांमधून
जायकवाडीमध्ये १२ टीएमसी पाणी सोडणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार
अतुल सावे, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, इम्तियाज जलिल, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी
डोणगावकर उपस्थित होते.
****
मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव रोडवर
पालोद गावाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. दुष्काळ
जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष
मारूती वरदे आणि तालुकाध्यक्ष सुनिल सनासे यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातही आज संघटनेच्या
वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या मांजरा प्रकल्पात सध्या ४५ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा उपलब्ध असल्यानं
लातूर शहराला जून २०१९ पर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल, असं आश्वासन पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी दिलं आहे. लातूर इथं आज रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या इतर प्रकल्पातल्या पाण्याचही सूक्ष्म नियोजन
करण्यात आलं असून, नागरिकांनी पाणीटंचाईची काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
२००८
च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमाखाली लावण्यात
आलेले आरोप रद्द करावेत अशी मागणी करणारी आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका
मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे पुरोहितवर आता बेकायदा कृत्य
प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे.
****
यवतमाळच्या
पुसद तालुक्यातल्या सांडवा गावाजवळ राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांचं वाहन पलटून
झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंगोली इथून
गडचिरोलीकडे ही गाडी जात असताना हा अपघात झाला.
****
मुंबईत
कांदिवलीच्या पश्चिमेला एस.व्ही.रोड लगत असलेल्या मिलाप सिनेमा जवळील एका पेट्रोल पंपावर
सीएनजी गॅस भरत असताना टाकीचा स्फोट होवून तीन जण जखमी झाले. सकाळी साडे नऊच्या सुमाराला
ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मालाडच्या
तुंगा रुग्णालयात दाखल केलं आहे.
****
No comments:
Post a Comment