Friday, 26 October 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.10.2018 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****

§   गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये - राज्यपालांचं आवाहन

§   स्वाईन फ्ल्यू वरील उपचारासाठीची मार्गदर्शक तत्वं राज्य सरकारकडून जारी

§   भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी विसर्ग सुरू

आणि

§   संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा - खासदार शरद पवार यांची मागणी

****

निवडणुकांचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबईत काल राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासकीय कारभारात महिलांच्या वाढत्या सहभागाबाबत राज्यपालांनी समाधान व्यक्त केलं.

****

राष्ट्रीय आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या २० हजार गावांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी पुरवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल वर्धा जिल्ह्यात सावंगी मेघे इथं पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र शासनानं आठ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या रुग्णांवर प्राधान्यानं करावयाच्या उपचारासाठीची मार्गदर्शक तत्वं राज्य सरकारनं जारी केली आहेत. या आजारावरील उपचारासंदर्भात अशा प्रकारची तत्त्व बनवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी सांगितलं. मुंबईत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या सर्व शासकीय, तसंच खासगी रुग्णालयांसाठी ही मार्गदर्शक तत्वं लागू आहेत. राज्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूमुळे २६८ रुग्ण दगावले आहेत.

****

लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि ॲमेझॉन ही ऑनलाईन विक्री करणारी  कंपनी यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून देणारा हा एक स्तुत्य उपक्रम असून या करारामुळे लघु उद्योजकांना उभारी मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

****

मराठवाड्यात जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मुळा धरणाच्या जवळ काल माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केलं.

दरम्यान, भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणीविसर्ग सुरू असून, प्रथम हे पाणी निळवंडे धरणात येईल, निळवंडे धरण भरल्यानंतर ते जायकवाडी धरणात सोडलं जाईल.

****

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून, दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे, ते काल औरंगाबाद इथं बोलत होते.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित १४ व्या वरिष्ठ वन अधिकारी परिषदेचं उद्घाटन वनमंत्री मुनगंटीवार यांनी काल केलं. पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षलागवडीचं उद्दीष्ट असून, ते साध्य करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

****

भीमा कोरेगाव हिंसाप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना चौकशीसाठी मुदतवाढ देण्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य शासनाच्या वकिलाची ताबडतोब सुनावणी घेण्याची मागणी, सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं मान्य केली.

****

तीन हजार कोटी रुपयांच्या एयरसेल मॅक्सिस प्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम्, त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम् यांच्यासह आठ आरोपींविरोधात काल आरोपपत्र दाखल केलं. चिदंबरम यांनी, अर्थमंत्री असताना, आपल्या अधिकाराच्या मर्यादेबाहेर जाऊन या कंपनीला गुंतवणुकीस परवानगी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

लैंगिक शोषण झालेल्या महिलांनी त्यांच्या तक्रारी ‘शी बॉक्स’ या ऑनलाईन तक्रार प्रणालीवर करण्याचं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केलं आहे. महिला आपल्या तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे किंवा एन सी डब्ल्यू डॉट मीटू ॲट जीमेल डॉट कॉम या ई- मेल वरही पाठवू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. जलसंवर्धनाच्या कोणत्याही कामाला आपला विरोध नाही, मात्र प्रत्यक्षात काम झालेलं दिसत नाही, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबतच्या जागा वाटपात औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास, पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीचे संकेत पवार यांनी यावेळी दिले.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणाली मुळे उद्योग क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं काल मराठा विकास मंडळाच्या वतीनं आयोजित चार दिवसीय उद्योग महाएक्सपोचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यात आज दुष्काळाचं आव्हान सर्वात मोठं असल्याचं, त्या म्हणाल्या.



दरम्यान, पक्षाचे नेते आमदार अजित पवार यांनी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेमध्ये कामं झाली नसल्याची टीका करत, या योजनेचे साडेसात हजार कोटी रूपये कुठे गेले असा प्रश्न त्यांनी केला.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं ऑनलाईन पध्दतीनं सादर केल्यानंतर, परीक्षा शुल्काचं एचडीएफसी बॅंकेचं चलनही ऑनलाईन तयार होणार आहे. हे चलन विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून, शिक्षण मंडळाकडे जमा करायचं आहे. मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.

****

मानवतावाद हाच थागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा पाया असल्याचं, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. हृषीकेश कांबळे यांनी म्हटलं आहे. ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त ओमानची राजधानी मस्कत इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ आंबेडकर यांनी जागतिक लोकशाहीला दिलेलं सामाजिक न्यायाचं तत्व जगभरातल्या वंचितांच्या हक्काची पताका फडकावत असल्याचं, डॉ कांबळे यांनी नमूद केलं.   

****

नांदेड जिल्ह्यातली ४०१ गावं संभाव्य पाणी टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचं काल जाहीर केलं.

****

लातूर इथल्या उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीनं अंधांना पांढरी काठी आणि दीपावली भेट वस्तूंचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. संस्थेच्या वतीनं दिव्यांग संकूल ते विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली.

****

नांदेड- दौंड -नांदेड ही रेल्वेगाडी उद्या तसंच तीन, १० आणि १७ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार असल्यामुळे परतीच्या प्रवासातली दौंड-नांदेड ही गाडी देखील परवा २८ तारखेला तसंच चार, ११ आणि १८ नोव्हेंबरला धावणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात मराठा मावळा संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय इथं निदर्शने करण्यात आली. आपल्या विविध मागण्याचं निवदेन यावेळी विभागीय आयुक्तांना देण्यात आलं.

****

औरंगाबाद इथल्या बापू सुधा काळदाते प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांचा जिल्ह्यातल्या कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आज सत्कार करण्यात येणार आहे. शहरातल्या सरस्वती भूवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात आज संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघांची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना पुन्हा संघात स्थान दिलं असून मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेतला तिसरा सामना उद्या पुणे इथं होणार आहे.

//************//

No comments: