Tuesday, 23 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø अहिंसेचा व्यापक अर्थ जगानं समजून घेणं आवश्यक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Ø एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; बोनसही जाहीर

Ø जल आराखड्यामध्ये समन्यायी पाणी वाटप करण्याची मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मागणी

आणि

Ø अहमदनगर-पुणे महामार्गावर बस अपघातात पाच जणांचा मृत्यू

****



 अहिंसेचा अर्थ खूप व्यापक असून, जगानं तो समजून घेणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नाशिक जवळ मांगीतुंगी इथं आयोजित विश्व अहिंसा संमेलनाचं उद्धाटन करताना ते काल बोलत होते. मांगी तुंगी इथं असलेली जैन तीर्थकर ऋषभदेवांची भव्य मूर्ती आपल्याला आपलं चरित्र्यं, व्यक्तिमत्वंही, असंच भव्य करण्याची शिकवण देते, महाराष्ट्रानं देशाला संत तुकाराम, संत नामदेव, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अशी महनीय व्यक्तिमत्वं दिली असून, महाराष्ट्रातला सद्भभाव, बंधुत्व आणि राष्ट्रभक्तीच्या परंपरेचा आपण आदर करतो, असंही राष्ट्रपती म्हणाले.



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, या कार्यक्रमाला उपस्थित होते.

****



 राज्य परिवहन - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या वेतनात, त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्याचा निर्णयही रावते यांनी काल जाहीर केला. चालू महिन्यापासून ही वेतनवाढ लागू होईल. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला. ही दिवाळी भेट तातडीनं देण्याच्या सूचनाही रावते यांनी संबंधितांना केल्या. एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतली मागील थकबाकीची पाच हप्त्यांची रक्कम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या एक नोव्हेंबर रोजी देण्याचे आदेशही महामंडळाला दिल्याचं रावते यांनी सांगितलं. 

****



 मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, राज्य शासनाच्या नियोजित जल आराखड्यामध्ये मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटप करण्याची मागणी मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे. औरंगाबाद इथं काल मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. वेळ पडल्यास यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. जायकवाडी धरणात सध्या वरच्या धरणांमधून अकरा दशलक्ष घनफूट पाणी तत्काळ सोडण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली. मराठवाड्याला पुरेसं पाणी मिळावं, यासाठी एक जल आराखडा शासनाला सादर करणार असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी सांगितलं.

****



 दरम्यान, नगर आणि नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काल पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जायकवाडी धरणात उतरून आंदोलन केलं.

****



 येत्या नऊ नोव्हेंबरला, भाऊबीजेच्या दिवशी राज्य शासनानं सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्य सरकारी कार्यालयं, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयं यादिवशी बंद राहतील.

****



 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लातूर, बीड तसंच औरंगाबाद इथं ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. लातूर इथं दगडोजीराव देशमुख सभागृहात सकाळी दहा वाजेच्या सुमारास, बीड इथं रामकृष्ण लॉन्सवर दुपारी एक वाजता तर, औरंगाबाद इथं श्रीहरि पॅव्हेलियन परिसरात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा मेळावा होणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती येत्या पंधरा दिवसात चालू करावी, असा ठराव काल औरंगाबाद इथं झालेल्या शिक्षण रोजगार हक्क परिषदेत करण्यात आला. या मुदतीत भरती सुरू न केल्यास, सर्व जिल्ह्यांत आंदोलनाचा इशारा परिषदेनं दिला आहे. प्राध्यापक जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत, तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात ३० हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी करणारा ठरावही संमत करण्यात आला.

****



 अहमदनगर-पुणे महामार्गावर काल झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. काल पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या आराम बसनं, उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण फाटा इथं ही दुर्घटना घडली.



 अन्य एका अपघातात, गुजरातहून औरंगाबादच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव मोटारीनं चिरडल्यामुळे सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. काल सकाळी पाच वाजेच्या सुमारास दौलताबादजवळ ही घटना घडली.

****



 आगामी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याची माहिती भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. ते काल परभणीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युतीसंदर्भात एम आय एम पक्षाशी चर्चा झाली, मात्र काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यातल्या गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली तर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुखेड आणि नायगाव भागातल्या गावांना भेटी देऊन दुष्काळ स्थितीची पाहणी केली.



 डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातल्या पाणीटंचाईच्या स्थितीचाही औरंगाबादमध्ये एका बैठकीद्वारे आढावा घेतला. 

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एक हजार ८९० अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातली बालकं, गरोदर माता, स्तन्यदा माता, किशोरवयीन मुली यांना नियमित पोषण आहार दिला जात आहे. अंगणवाडी परिसरात परसबागा जोपासल्या जात आहेत. या परसबागांमधल्या हिरव्या पालेभाज्या, फळं आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून दूध तसंच अंडी या बालकांना देण्यात येत आहेत. त्यामुळे बालकांचं आरोग्य सुदृढ आणि सशक्त राहण्यास मदत होत असल्याचा अनुभव कोमल माळी यांनी सांगितला. त्या म्हणाल्या…



माझं नाव कोमल ज्ञानेश्वर माळी. माझी दोन मुलं आहेत. ते अंगणवाडीत असतात. त्यांना महिन्यातून एकदा क्लॉशियम वाढावं म्हणून दूध दिलं जातं. तसंचं महिन्यातून दोन-तीन वेळेस अंडी दिली जातात. तसेचं महिन्याला सुकडी असते. त्यातून माझ्या मुलांचे वजन खुप सुदरूढ आहे. हि स्वच्छता हि पण खूप आहे.  आणि रोज भातातून मुलांना हिरव्या पालेभाज्या तसंचं शेवग्याच्या शेंगाचा पाला अश्या अनेक हिरव्या पालेभाज्य भातात टाकल्या जातात. त्यामुळे माझ्या मुलांचं क्लॉशियम वाढतं. आणि रक्तांची वाढ होते. तसंचं माझ्या मुलीचं आत तीनवर्ष वय आहे. तरी तिच वजन १५ किलो आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.



 गर्भवतींना नियमित चौरस आहार देण्याचा सल्ला अंगणवाडी स्तरावर देण्यात येत आहे. मोहिनी मगर यांनी या विषयी या आपली प्रतिक्रिया व्यक्त केली… त्या म्हणाल्या…  



माझं नाव मोहिनी विजय मगर. मी गर्भवती आहे. आणि मी जर आठवड्याला अंगणवाडीला येते. आणि अंगणवाडीत मला पैस्व काही माहिती देतात. कश्या प्रकारे आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेचं फळभाज्या, दूध, अंडी, भात-वरण व मोकळ्या खालल्या पाहिजे आणि त्यामुळे आपले जिवनसत्व वाढते. चौरस आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा यांची माहिती दिली जाते.



 राष्ट्रीय पोषण मिशनमुळे जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होत आहे. तसंच दवाखान्यात प्रसूती होण्याचं प्रमाण वाढलं आहे. महिला, मुलींना स्वच्छता, आरोग्य, तसंच पोषण आहाराचं महत्त्वही पटलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 वीज भार नियमन रद्द करावं तसंच पेट्रोल आणि डिझेल दर कमी करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्यावतीनं काल परभणी जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

****



 शिधा पत्रिका धारकांना अन्न धान्य न देता त्यांच्या बॅंक खात्यावर थेट सबसीडी हस्तांतरण करण्याच्या  शासन निर्णया विरोधात, स्वस्त धान्य केरोसीन परवाना धारक महासंघाच्या वतीनं काल लातूर इथं एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं.

****



 जालना जिल्ह्यातल्या ढगी गावचा सरपंच मारोती केंद्रे आणि अशोक चव्हाण या दोघांना काल दहा हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. गावातल्या जलसंधारण आणि पाझर तालावातला गाळ जेसीबीद्वारे काढण्याचं देयक अदा करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

*****

***

No comments: