Wednesday, 24 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.10.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24  October 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø राज्यातल्या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर; आठ विविध सवलती लागू 

Ø फटाके विक्रीला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी, दिवाळीत फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच आतषबाजी 

Ø अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भेट

Ø राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपवर पुन्हा टीका

आणि

Ø जायकवाडी धरणासाठी आठ पूर्णांक ९९ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश

*****



 राज्यातल्या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुष्काळसदृष्य परिस्थितीवर उपाय योजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचं पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू देयकात साडे तेहतीस टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाचे निकष शिथील, आवश्यक तिथं टँकरद्वारे पेयजल पुरवठा आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणं, आदी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 दरम्यान, केंद्र सरकारचं पथकही दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पाहणी नंतर केंद्र सरकार राज्याला मदत जाहीर करेल असं ते म्हणाले.



 प्रधानमंत्री आवास योजनेला वेग देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या ३८३ स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांध्ये १९ लाख ४० हजार घर उभारणीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.



 मत्स्य व्यवसायासाठी फिरते वाहन ही योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मासळी विक्रीसाठी या फिरत्या वाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्यातल्या १० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून, ४४ शेतकरी गटांचा यामध्ये सहभाग असेल.

****



 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी -मनरेगा योजनेतून राज्यात मागणीनुसार ‘गाव तेथे तलाव’ ही योजना राबवण्यात येणार असल्याचं, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं आहे.  ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ही योजना राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दीड कोटी रुपयांप्रमाणे ३४ जिल्ह्यांना ५१ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिल्याचंही ते म्हणाले.

****



 सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली असून, फटाक्यांवर पूर्णपणे बंदी लागू करता येणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. मात्र निर्धारित आवाज मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाके उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, ऑनलाईन फटाके विक्रीवर मात्र पूर्णपणे बंदी राहील, असं सांगितलं आहे. दिवाळी सणात रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे, तर नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री अकरा वाजून ५५ मिनिटांपासून ते साडे बारा वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. कमी उत्सर्जनाचे पर्यावरणस्नेही फटाके देशभरात तयार करण्यासही न्यायालयानं परवानगी दिली आहे. हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी याचं पालन करावं असं न्यायमूर्ती ए.के.सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी निर्णय देताना म्हटलं आहे. ज्या ऑनलाईन कंपन्या या निर्णयाचं पालन न करता, फटाके विक्री करतील, त्यांच्यावर कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे.

****



 विद्यार्थ्यांनी परस्परांमधलं सौहार्द कायम राखत समाजासाठी कार्य केलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या सतराव्या दीक्षांत समारंभात बोलत होते. या समारंभात नऊ सुवर्ण पदकांपैकी सहा पदकं मुलींनी मिळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

****



 राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये बहीण बीज मंजूर केली असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असून जवळपास दोन लाख सात हजार ९६१ अंगणवाडी सेविकांच्या बॅंक खात्यात लवकरच ही रक्कम जमा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राम मंदिर बांधण्याच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर काल पुन्हा एकदा जोरदार टीका केली. येत्या २५ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार आहोत. तिथे जाऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "राम मंदिर केव्हा बांधणार' असं विचारणार असल्याचं ठाकरे म्हणाले. औरंगाबाद इथं कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.



 लातूर इथंही शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलतांना ठाकरे यांनी, सरकार अडचणीचे विषय न्यायालयाकडे ढकलून वेळ काढूपणा करत असल्याची टीका केली. तर बीड इथं आयोजित मेळाव्यात ठाकरे यांनी, दुष्काळाचा वणवा पेटला असताना, सरकार कागदी घोडे नाचवत असल्याची टीका केली.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणासाठी आठ पूर्णांक ९९ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी संबंधितांना दिले आहेत. या आदेशानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल. मुंबईत परवा झालेल्या राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.



 दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यावर्षी नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळं पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थीतीत जायकवाडीत पाणी सोडणं योग्य नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

****



 केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्यावतीनं काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून होणार आहे. एक नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या यात्रेदरम्यान लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात कॉंग्रेस नेत्यांच्या सभा होणार आहेत. आज लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा आणि लातूर इथं या सभा होणार आहे.

****



 साखर कारखान्यांनी पारदर्शक कारभार करून शेतकऱ्यांचं हित जोपासावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातल्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या ३५व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असून, रबी अशा मावळल्या आहेत. त्यामुळे शासनानं तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असंही पवार यावेळी म्हणाले.

****



 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब नागरिकांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोफत दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या गुळवंची इथल्या रहिवासी वैशाली खताळ यांची या योजनेमुळे चुलीच्या धुरापासून मुक्तता झाली. त्या म्हणाल्या..



मी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसची लाभार्थी आहे. या योजनेमुळे माझी चुलीच्या धुरापासून मुक्तता झाली. शिवाय या योजनेमुळे वृक्षतोड थांबून, पर्यावरणाची होणारी हानी थांबली. त्यामुळे मी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची आभारी आहे. धन्यवाद.

****



 राज्यातल्या सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार असल्याचं माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दिली आहे. नागपूर तसंच भंडारा जिल्ह्यातल्या  पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असंही यावेळी सांगण्यात आलं.

****



 लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या श्री संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पॅनलने विजय मिळवला आहे. १६ संचालकाच्या जागेसाठी एकूण ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

****



 भारत - वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम्‌ इथं होणार आहे. दुपारी दीड वाजेपासून हा सामना सुरू होईल. मालिकेत गुवाहाटी इथं झालेला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे.

*****

***

No comments: